अर्ध प्रामाणिकपणाचे दुष्परिणाम

कोणतेही नैतिक मूल्य व्यक्तीसापेक्ष कधीच बदलत नाही. मात्र वैयक्तिक भूमिकांना न्याय्य ठरवत असताना मुल्यांमध्ये व्यक्तीसापेक्ष लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जातो, आणि तो फसतो. मुल्य पाळायचे ते इतरांनी, आपण - आपल्यांनी ते पाळले नाहीत कारण त्यांचा काहीतरी नाईलाज होता, ही सर्वसामान्य आणि सार्वत्रिक भूमिका एकतर त्या मुल्यांवरील विश्‍वास संपविण्यास कारणीभूत ठरते किंवा वैयक्तिक नुकसान तरी करते. सध्या असेच अर्धप्रमाणिकपणाचे दुष्पपरिणाम काहीजण भोगत आहेत.

  राजकीय भूमिका बदलत असतात. उलट त्या सोयीनेच बदलायच्या असतात. आज काही बोललेले किंवा घेतलेली भूमिका ही आपल्या पक्षासाठी, अनुयायांसाठी किती महत्वाची होती, हे नेत्याने पटवूनही द्यायचे असते. पुन्हा त्याच भूमिकेपासून घुमजाव केल्यानंतरसुद्धा ते अनुयायांच्या फायद्यासाठी किती अपरिहार्य होते, हेसुद्धा पटवून द्यायचे असते. त्यामुळे राजकारणाकडून फारशी अपेक्षा कोणाची असत नाही. पण राजकीय क्षेत्रात नसलेल्यांनी सामाजिक मुल्यांची चाड राखावी, ही अपेक्षा असते.

  वैयक्तिक पातळीवरसुद्धा या मुल्यांची जपणूक करावी, अशी सगळ्यांचीच एकमेकांकडून अपेक्षा असते. आपल्याशी इतरांनी खरे बोलावे, प्रामाणिक असावे, निष्ठावान असावे असे प्रत्येकाला वाटत असते. अगदी चार – सहा वेळा पक्षांतर केलेल्या नेत्यालासुद्धा कार्यकर्ता मात्र निष्ठावान असावा, असे वाटत असते. या अपेक्षांना अंत नाही. पण समाज म्हणून आपले मुल्यमापन होत असताना आपण ठरविलेल्या काही मुल्यांवर आपण खरे उतरावे, याची अपेक्षा असतेच. असंच एक मुल्यमापन काही महिन्यांपूर्वी मुंबईकरांचे झाले आणि मुंबईकर त्यात अर्धे नव्हे पाऊण प्रमाणात म्हणजे ७५ टक्के खरे उतरले.

  त्याचे झाले असे, एका संस्थेने जगातील काही देशांच्या मुख्य शहरांमध्ये सर्वेक्षण केले. कोणत्या शहरातील लोक किती प्रामाणिक आहेत, याचा त्यांना अभ्यास करायचा होता. हा अभ्यास त्या संस्थेच्या माध्यमातून अधून – मधून होत असतो. लोकांचा प्रामाणिकपणा तपासून पाहण्याची त्यांची पद्धत सोप्पी आहे. तीन हजार ६०० रुपये, काही कागदपत्र आणि एका व्यक्तीचा पूर्ण पत्ता, फोन नंबरसह ते काही पाकिटे गर्दीच्या वेगवेगळ्या ठिकाणी टाकतात.

  वाटेत पडलेले किंवा कुठेतरी सहज विसरलेल्या या पाकिटांपैकी किती पाकिटे परत आली, त्यावर ते त्या शहरातील आणि देशातील लोकांचा प्रामाणिकपणा जोखतात. अर्थात कोणत्या देशातील लोक प्रामाणिकपणाच्या बाबतीत जगात कितव्या क्रमांकावर आहेत, हेसुद्धा ते जाहीर करतात. तीन – साडेतीन हजार रुपयांच्या लालचेपोटी लोक अजाणतेपणी का असेना पण आपल्या देशाला चक्क अप्रामाणिकपणाच्या यादीतसुद्धा लोटू शकतात. असेच सर्वेक्षण भारतात करण्यात आले.

  मुंबईत सर्वेक्षण करणार्‍या संस्थेने १२ पाकिटे गर्दीच्या ठिकाणांवर टाकली. या १२ पाकिटांपैकी नऊ पाकिटे त्यात असलेल्या पत्त्यावर मुंबईकरांनी पोहचवून दिली. तर तीन पाकिटांचा शोध लागलाच नाही. त्यावरुन या संस्थेने मुंबईकरांच्या प्रामाणिकपणाचे मुल्यमापन केले. आता नेमकी त्या १२ पैकी तीन पाकिटे अप्रामाणिक लोकांच्या हाती लागली, असे म्हणता येऊ शकेल किंवा आपल्या हाती असे पाकिट लागले असते, तर तातडीने परत केले असते हे ज्याला ते पाकिट मिळाले नाही, तो सहजच म्हणू शकतो.

  पण ज्या तिघांनी ती पाकिटे परत केली नाहीत, त्यांच्या भूमिकेसाठी त्यांच्याकडेही काहीतरी न्याय्य कारण असू शकते. म्हणजेच ज्यांना अप्रामाणिकपणा करून लाभ मिळविण्याची संधी मिळाली नाही, ते प्रामाणिकतेचे मुल्य अधिक जोरकसपणे मांडू शकतील. कौतुक त्या ९ लोकांचे करायला हवे, ज्यांनी संधी मिळूनही प्रामाणिकपणा दाखविला. संधी मिळाल्यानंतर प्रामाणिकपणाचे मुल्य जपणारे ७५ टक्के लोक होते. किंवा ७५ टक्के लोक प्रामाणिक आहेत, असे म्हणून आपल्या मनाचे समाधान करून घ्यायला हरकत नाही. पण हे ७५ टक्के प्रामाणिक लोक किती प्रसंगांमध्येे आपला हा प्रामाणिकपणा कायम ठेऊ शकतील, याचीही शंका घेता येऊ शकते.

  अर्थात आपल्या व्यक्तीसापेक्ष मुल्य बदलताना आपल्याला हल्ली खूप अधिक प्रमाणात दिसतात. देशातील लोकशाही संकटात येत असते ती ठराविक काही लोकांवर कारवाई झाल्यानंतर. तसेच देशात जातीयवाद वाढत असतो. देश अष्मयुगाकडे वाटचाल करीत असतो, या सगळ्या प्रतिक्रिया व्यक्तीसापेक्ष किंवा प्रसंगानुरुप येत असतात. काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्याबाबतही अशाच काही प्रतिक्रिया आल्यात.

  दीड वर्षापूर्वीपर्यंत ७५ टक्के प्रामाणिक असलेल्या अधिकार्‍यांपैकी एक असलेल्या समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे रहावे लागले. अमली पदार्थांचा व्यापार आणि व्यवहाराची बेधडक चौकशी करीत असल्याचे किमान टीव्हीच्या पडद्यावर दाखविणारे समीर यांचेही पाय मातीचे असतील? हा प्रश्‍न सीबीआय चौकशीच्या निमित्ताने समोर आला.

  शाहरुख खान, नबाव मलिक न्याय व्यवस्थेवर विश्‍वास व्यक्त करत होते, समीर यांच्या शर्टाच्या किमती आणि उच्च राहणीमानावर प्रश्‍न उपस्थित करीत होते, आज त्यांच्या भूमिकेत समीर वानखेडे आहेत. त्यांना न्यायालयाने माध्यमांशी काहीही बोलण्यास मनाई केली असली तरीही त्यांच्या वतीने पत्नी क्रांती रेडकर सोशल मिडियावर बर्‍यापैकी संदेश पेरत असतात.

  समीर वानखेडे त्या ७५ टक्के लोकांमधील आहेत, हे समाजमनावर ठासविणारे नेते आता एकदम मूग गिळून बसले आहेत. कोणीच त्यांच्या समर्थनासाठी जाहीररित्या पुढे येताना दिसत नाही. मग अचानक समीर त्या १२ पैकी तीन जणांसारखे भासू लागतात. ’तू पुढे चाल रे गड्या..’ म्हणत समीर यांच्या कारकिर्दीचा धांडोळा घेणार्‍या व्हिडीओमधून तो गोसावी आणि आर्यन खानचे छायाचित्र नेमके गायब असते.

  ज्या डझनावारी अभिनेते आणि अभिनेत्र्यांना चौकशीसाठी बोलावले त्यांचे पुढे काय झाले, याची आठवण अचानक या सगळ्या प्रकरणानंतर येते. समीर यांच्या कपड्यांचा फॉल, बुटांचे ब्रॅण्ड अचानक दिसू लागतात. कारण सीबीआय या तपास यंत्रणेवर आणि त्यांच्या निष्पक्षतेवर आपल्याला विश्‍वास ठेवावा लागेल. समीर यांना सच्चा ’भारतीय’ ठरवणारे, मलिक किंवा इतरांवर तुटून पडणारे कुठे आहेत, याचा शोध हरवलेल्या आणि अप्रामाणिक लोकांच्या हाती लागलेल्या तीन पाकिटांसारखा कदाचित लागणार नाही.

  वानखेडे यांचे हे एकमेव प्रकरण नाही. असे अनेक अधिकारी कधी त्या १२ पैकी नऊंच्या गटात तर कधी त्या तिघांच्या गटात असल्यासारखे भासत असतात. त्यामुळेच खुर्चीवर असताना नैतिकतेच्या गप्पा करणारे संजय पांडे निवृत्तीच्या दिवशीच कोठडीत जातात. तर कोठडीत जाता – जाता परमबीर एकदम स्वच्छ होऊन परत येतात. वानखेडे कोणत्या गटातील असतील, याची मात्र आता उत्सुकता लागली आहे, एवढे मात्र खरे.

  विशाल राजे

  vishalvkings@gmail.com