
मराठी नाटकांना दोनशे वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. या काळात रंगभूमीवर आलेल्या नाटकांचे जतन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बदलत्या नाटकांच्या वाटेवर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संदर्भ आहेत. उभ्या जगभरात चोवीस तास सुरु असणारी मराठी रंगभूमी ही एकमेव आहे. गाजलेल्या, दर्जेदार नाटकांचे चित्रिकरण करतांना याकडे परिपूर्ण नजरेतून बघण्याची वेळ आलीय. काल नाटक कुठे होते आज कुठपर्यंत पोहचले आहे आणि भविष्यात कसे काय वाट निवडेल, याचे वेध आहेत.
महाराष्ट्र शासनाने जुन्या गाजलेल्या मराठी नाटकांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय जाहीर केला असून सध्या १९६० च्या जवळपास असलेल्या सहा नाटकांचे चित्रिकरण करण्यात येणार आहे. मराठी रंगभूमीला संगीत नाटकांपासूनची वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे नाटकांची निवड करणे म्हणजे कठीण कामच ठरणार असून तूर्त १९६० हे वर्ष आणि त्यावर्षातली चर्चेतली नाटके घेतली आहेत.
राज्य सरकारतर्फे त्यासाठी ज्या सहा नाटकांची नावे निश्चित केलीत. त्यात चोरीचा मामला, कालचक्र, दुर्गा, डॉ. हुद्वार आणि चिन्ह – यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आलय. हा प्रकल्प स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हाती घेण्यात आलाय. त्यासाठी २९ लाख रुपयांच्या खर्चालाही मंजूरी देण्यात आलीय. या निमित्ताने नाट्यसृष्टीत अनेक चर्चांना एकच उधाण आल असलं तरी या उपक्रमाची कुठेतरी सुरुवात होतेय. आता यातील काही नाटकांवर एक नजर.
जयवंत दळवी यांची दोन गाजलेली नाटके यात आहेत. एक ‘दुर्गी’ आणि दुसरे ‘कालचक्र’ आणि योगायोग म्हणजे या दोन्ही नाटकांचे दिग्दर्शन हे दामू केंकरे यांनी केलय. ‘दुर्गी’ हे नाटक धि गोवा हिंदू असोसिएशनतर्फे १९८०च्या सुमारास व्यावसायिक रंगभूमीवर आले. अशोक पत्की यांचे संगीत, दिलीप कोल्हटकर यांची प्रकाश योजना आणि नेपथ्यकार द. गो. गोडसे यांचे नेपथ्य त्याला होते. सुधाताई करमरकर यांच्यासह यात अच्युत देशिंगकर, मोहनदास सुखटणकर अरविंद देशपांडे, ललिता केंकरे, मंगला पर्वते यांच्या भूमिका होत्या. ‘संध्याछाया’प्रमाणे याही नाटकात म्हातारपणाच्या दुःखाची बाजू मांडली आहे. प्रौढ वयात साथीदाराची साथ सुटून जर स्त्री-पुरुष एकटे होतात, तेंव्हाची त्यांची मानसिक अवस्था ‘दुर्गी’त प्रभावीपणे मांडली आहे. शेवटी प्रत्येकाला आयुष्याच्या संध्याकाळी हक्काचे विश्रांतीस्थान हवे असते हेच खरे !
कालचक्र हे देखिल जयवंत दळवी यांचे नाट्य. श्री सातेरी प्रॉडक्शनतर्फे या नाटकाची निर्मिती झालेली. १९८७ च्या सुमारास हे गाजलेले नाटक. दिग्दर्शनासह प्रकाशयोजनाही दामू केंकरे यांची होती. स्वतः त्यांनी यात भूमिकाही केल्याची नोंद आहे. यशवंत दत्त, उपेंद्र दाते, सुधाताई करमरकर, श्याम पोंक्षे, राधिका राव, किर्ती शरद- या कलाकारांची ‘टिम’ त्यात होती. संध्याछाया, दुर्गी यानंतरचे नाटककार दळवी यांचे हे नाट्य. पुन्हा ‘म्हातारपण’ हा विषय. ज्यातल्या बारकाव्यांवर दळवी यांची नाटककार म्हणून हुकमत होती. आई-वडील दत्तक घेण्याची विचित्र पण भविष्यात विचार करायला लावणारी कल्पना यात मांडलीय. वृद्धाश्रम हा निराधारांसाठी असतो पण दत्तक आईवडील हा एक चांगला पर्याय यात मांडला आहे.
नाटककार विजय तेंडुलकर यांचे ‘विठ्ठला’ हे नाटक १९८५ साली रंगभूमी आलेलं. त्याचे दिग्दर्शन सदाशिव अमरापूरकर यांचे होते. दिलीप प्रभावळकर यांची नामा शिंपीची मध्यवर्ती भूमिका ही आजही स्मरणात आहे. त्याच्यासह सखाराम भावे, ज्योती सुभाष, शशिकांत कारेकर, अनंत वेलणकर यांच्या भूमिका त्यात होत्या. इंडियन नॅशनल थिएटरची ही निर्मिती होती. अमरापूरकर यांचे दिग्दर्शन कौशल्य, तेंडुलकरांची आव्हानात्मक संहिता आणि प्रभावळकर यांचा जबरदस्त अभिनय ही जमेची बाजू होती. या तिघा’करांनी’ नाटकाला एका वळणावर पोहचविले. एक सशक्तनाटक पण शुभारंभी ११ प्रयोगानंतर संस्थेने थांबविले. त्याची कारणे ही शेवटपर्यंत कुणालाही कळली नाही. पण या निमित्ताने हे नाटक पुन्हा एकदा प्रकाशात येईल!
वसंत सबनीस यांचे ‘चोरीचा मामला’ या नाटकाचीही निवड या प्रकल्पात करण्यात आलीय. विनोदी नाटकाचे १९८५ सालात प्रयोग सुरू होते. दौऱ्यावर ‘हुकमी एक्का’ ठरलेले हे नाट्य. याचेही दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केलेले. कलाकार संस्थेतर्फे याची निर्मिती झालेली. १९६८ च्या सुमारास ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य सबनीस रांनी लिहून एक महाविक्रम रंगभूमीवर पार केला. शाहीर दादा कोंडके यांनी त्यामुळे इतिहास रचला. शरद तळवळकर, अश्विनी देसाई यांच्या मूळ चोरीचा मामला’ यात भूमिका होत्या. पूढे हे नाटक अनेक प्रयोगात नव्या हौशी मंडळींनी रंगभूमीवर आणले. ‘दमदार संहिता’ ही जमेची बाजू ठरली. नवऱ्याला मुठीत ठेवणारी पत्नी – ही यात गाजली! कौटुंबिक विषयाची मजेशीर हाताळणी होती. आजही ही संहिता नव्या रंगारुपात वेगळेपण सिद्ध करु शकेल.
एकेकाळी गाजलेल्या नाटकांचे चित्रिकरण करून त्याचा संग्रह हा भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची संकल्पना लाख मोलाची आहे. जी काळाची गरजच जशी म्हणावी लागेल. पण रंगभूमीवर अनेक प्रकार शैली, विषय-आशय याची नाटके आजवर झालीत. त्याचाही विचार व्हावा, कारण यात एकही संगीत नाटक नाही. बोलीभाषेतले नाट्य नाही. प्रायोगिक नाटक नाही. त्याचाही समावेश असावा. शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेने प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीला अनेक नाट्यकृती दिल्यात. तसेच बालनाटकांचेही दालन आहे. त्याचाही विचार होणं गरजेचे आहे. हा प्रकल्प फक्त या निवडक नाटकांपूरता मर्यादित न राहाता त्याच्या कक्षा अधिक वाढविल्या पाहिजेत! कुठेतरी याची सुरुवात झालीय, हे ही नसे थोडुके! नाटकांचा मंतरलेला भूतकाळ जिवंत होतोय. वर्तमानकाळातून तो भविष्याकडे वेध घेतोय. नाटकांचे हे कालचक्र यशस्वी भव !
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com