विशेष लेख : कोरोनाच्या संकटातही देशप्रेमाची भावना

संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर काही लोकं याचा सामना करत आहेत. परंतु अशा परिस्थितीतही कोरोनाचे संकट उभे ठाकलेले असूनही भारतीयांच्या मनातली देशप्रेमाची भावना कुठेही कमी पडलेली नाही. आज १५ ऑगस्ट म्हणजेच गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस. या दिवशी भारत ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. पारतंत्र्यातून लोकांनी लोकतंत्रामध्ये प्रवेश केला. परंतु यावर्षी आलेल्या कोरोनाच्या सावटामुळे हे स्वातंत्र्य अगदी पारतंत्राप्रमाणे वाटत आहे.   

दरवर्षीप्रमाणे अगदी आनंदी आणि उत्साहाने आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. मात्र कोरोना विषाणूमुळे तो आनंद आणि उत्साह पाहता आला नाही. देशाला स्वातंत्र मिळून आज ७४ वर्ष पूर्ण झाली. परंतु यावर्षी स्वातंत्र्य मिळूनही माणसाच्या जीवनात स्वातंत्र नाही. आहे ते फक्त पारतंत्र्य. या दिवशी विविध जाती-धर्माचे लोक एकत्र येतात आणि एकजूट होऊन ‘भारत माता की जय’ अशी घोषणा करतात. त्यामुळे अशा प्रकारची देशप्रेमाची भावना आज थोडी कमीच पाहायला मिळाली. देशाच्या कानाकोपऱ्यांत साजरा होणारा हा उत्साह कोरोनामुळे कुठेतरी कोलमडल्यासारखा वाटला. परंतु कोरोनाच्या संकटातही प्रत्येक माणसाच्या मनात आणि जीवनात देशप्रेमाची भावना आणि एकोपा अजून जागृत आहे. 

लाल किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सावावरही यंदा मर्यादा आली. अगदी तुरळक माणसे या कार्यक्रमास उपस्थित होती. शाळेतील विद्यार्थी आणि अन्य संस्थांकडून मोकळ्या मैदानात होणारे ध्वजवंदनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. कारण जर कोरोनाची लागण झाली तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७४  व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. तसेच देशाला संबोधित करून त्यांनी १३० कोटी देशवासियांसाठी ‘आत्मनिर्भर भारत’ हा मंत्र दिला. त्यामुळे कोरोनाने आत्मनिर्भर होण्यासाठी एक मोठी संधी निर्माण केली आहे.   

कोरोनाने माणसाच्या आयुष्यात जरी संचार केला असला. तरी त्याने कठीण प्रसंगात जगायचं कसं हे मात्र शिकवलं. देशात अनेक मोठे बदल होत गेले. आरोग्यसुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कायदा व सुव्यवस्था, अशा क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल होत गेले. अनेक सण-उत्सवांवर कोरोनाचे संकट गडद झाले. तरीसुद्धा देशातील नागरिकांची भावना आणि प्रेम तसूभरही कमी झालेली पाहायला मिळाले नाही. मात्र हे कोरोनाचं संकट कधी संपेल हे अद्यापही समजलेलं नाही…