‘रामराज्य’ चित्रपटावर विशेष फोकस…

'रामराज्य' हा चित्रपट हिंदीत १९४२ साली, तर मराठीत १९४४ निर्माण झाला. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट काळातील हा चित्रपट आहे. दोन्हीतील बरेचसे कलाकार जवळपास सारखेच आहेत.

  आपल्या देशातील विविध भाषांतील (हिंदीसह सर्व प्रादेशिक भाषेतील) चित्रपटात एक महत्वाचा प्रवाह पौराणिक चित्रपट. मूकपटाच्या काळापासून याची निर्मिती होत आहे. आपल्या देशातील पहिला चित्रपट दादासाहेब फाळके दिग्दर्शित ‘राजा हरिश्चंद्र’ (मुंबईत प्रदर्शित ३ मे १९१३) हा पौराणिक मूकपट आहे.

  आपल्या देशात चित्रपट माध्यम व व्यवसाय रुजवण्यात सुरुवातीच्या अशा अनेक पौराणिक चित्रपटांचा खूपच मोठा सहभाग आहे. मूकपटाची ही वाटचाल सुरु असतानाच मराठीतील पहिला बोलपट व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ (मुंबईत प्रदर्शित ६ फेब्रुवारी १९३२) या पौराणिक चित्रपटापासून ‘आपला चित्रपट बोलू लागला’. त्या काळातील सर्वसामान्य रसिकांना पडद्यावर दिसणारी गोष्ट याचेच विशेष अप्रूप होते आणि मग पौराणिक, संतपट, पोशाखी, ऐतिहासिक, अद्भूतरम्य (फॅण्टसी) अशा पध्दतीचे चित्रपट निर्माण होत होते. याच वाटचालीत एक अतिशय महत्वाचा चित्रपट ‘रामराज्य’. या चित्रपटाची निर्मिती प्रकाश चित्र या चित्रपट निर्मिती संस्थेच्या वतीने करण्यात आली. दिग्दर्शन विजय भट्ट यांचे होते. त्या काळात अनेक चित्रपट हे एकाच वेळेस मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत निर्माण होत. ‘रामराज्य’ हा चित्रपट हिंदीत १९४२ साली, तर मराठीत १९४४ निर्माण झाला. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट काळातील हा चित्रपट आहे. दोन्हीतील बरेचसे कलाकार जवळपास सारखेच आहेत. पण मराठीतील चित्रपटावर तांत्रिक सोपस्कार काहीशे उशीरा झाले असा एक संदर्भ सापडतो.

  हा चित्रपट ‘वाल्मीकी रामायण’ याच काव्यावर आधारित आहे. त्यावरुन चित्रपटासाठीची दृश्य कथा, पटकथा व संवाद विष्णुपंत औंधकर यांची आहे. गीते राजा बढे, संगीत शंकरराव व्यास, छायाचित्रणकार पी. जी. कुकडे आणि संकलन प्रताप दवे यांचे आहे. या चित्रपटात हिंदी आवृत्तीत राम प्रेम अदीब यांनी साकारला तर मराठीत चंद्रकांत यांनी साकारला. दोन्हीत शोभना समर्थ यांनी सीता साकारलीय (हा चित्रपट पूर्ण होईपर्यंत प्रेम अदीब आणि शोभना समर्थ यांनी सिगारेट अथवा दारु पिऊ नये असा त्यांच्याशी करार करण्यात आला होता अशी बरीच चर्चा रंगली. त्या काळात एकूणच चित्रपटनिर्मिती अतिशय भक्तीभावनेने केली जात असे.) या चित्रपटात विनय काळे, बंडोपंत सोहोनी, यशवंत केळकर, मधुसूदन, व्ही. डी. पंडित, अमीराबाई कर्नाटकी, रंजना, शांताकुमारी, लीला पवार, बेबी तारा, बेबी कल्पना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण दहा गाणी आहेत. मराठीतील काही गाण्यांचे मुखडे असे, रामराज्य नांदले भूवरी, सुवर्णरथ दिव्य तो रवीचा, त्यागमयी सीता सती. या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण मुंबईत प्रकाश स्टुडिओत करण्यात आले. त्या काळात स्टुडिओत अनेक प्रकारचे सेट लावून सगळे चित्रीकरण केले जाई. पण असुविधांचा पाढा वाचण्यापेक्षा चित्रपट निर्मितीवर सगळा फोकस असे. हा चित्रपट मुंबईत दक्षिण मध्य मुंबईतील ग्रॅन्ड रोड येथील सुपर टाॅकीजमध्ये प्रदर्शित झाला. (हे चित्रपटगृह आजही कार्यरत आहे.) दिवसा दोन खेळ हिंदीचे, तर एक खेळ मराठीचा असे. या चित्रपटाने अभूतपूर्व लोकप्रियता संपादल्याने सुपर थिएटरमध्ये या चित्रपटाने १०२ आठवड्यांचा मुक्काम केला. हा चित्रपट सुरु होण्यापूर्वी प्रेक्षक अतिशय भक्तीभावाने पडद्यासमोर नारळ फोडून नमस्कार करत. विशेष उल्लेखनीय गोष्ट, ५, ६ व ७ मे १९४७ रोजी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या आधुनिक कला संग्रहालयात या चित्रपटाच्या आयोजित करण्यात आलेल्या खेळाना उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आयुष्यात पाहिलेला एकमेव चित्रपट अशी तात्कालिक मुद्रित माध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली आणि अगदी आजही या विशेष गोष्टीची नोंद घेतली जाते.

  ‘रामराज्य’ या चित्रपटाची दिग्दर्शक विजय भट्ट यांनी १९६७ साली त्याच नावाने रिमेक निर्माण केली. आता रंगीत चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाण वाढत होते, त्यामुळे हा चित्रपटही इस्टमनकलर होता. मुंबईत मेन थिएटर ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात हा चित्रपट १ डिसेंबर १९६७ रोजी प्रदर्शित झाला. पण विशेष उल्लेखनीय गोष्ट, या ‘रामराज्य’चा मेट्रो या आलिशान प्रतिष्ठित चित्रपटगृहात भव्य दिमाखदार प्रीमियर रंगला. मेट्रोत प्रीमियर झालेला हा पहिला आणि एकमेव पौराणिक चित्रपट. या चित्रपटात कुमार सेन यांनी राम तर बीना राॅय यांनी सीता साकारली. याशिवाय या चित्रपटात बद्री प्रसाद, कन्हैयालाल, फरिदा, अनिल कुमार, जय विजय, स्नेहलता, गोपीकृष्ण, जीवनकला इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची गीते भरत व्यास यांची तर संगीत वसंत देसाई यांचे आहे. छायाचित्रणकार प्रवीण भट्ट यांचे आहे.

  पहिला मराठीतील ‘रामराज्य’ या चित्रपटाचे विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या भूमिकेमुळे ते राम म्हणून गाजले. गंमत म्हणजे, १९६४ साली आलेल्या होमी वाडिया निर्मित व मधुकर पाठक दिग्दर्शित ‘स्वयंवर झाले सीतेचे’ या चित्रपटात त्याने रावण साकारला. तोपर्यंत आपल्या चित्रपटातील रावण कधीच गायला नव्हता. पण या चित्रपटातील रावण भीमसेन जोशी यांच्या आवाजात ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ हे गाणे पडद्यावर गायला.
  मग हिंदीत सातत्याने रामायण, महाभारत यावर चित्रपट आणि कालांतराने छोट्या पडद्यासाठी मालिका निर्माण होत राहिल्या. पौराणिक कथानकांची यशस्वी वाटचाल सुरु झाली. त्यात ‘रामराज्य’ हा चित्रपट खूपच महत्वाचा!

  – दिलीप ठाकूर