sunil dutt death anniversary the struggle of the individual within him is great nrvb

दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या 'संजू' (रणवीर कपूर) या चित्रपटाचा शेवट आठवतोय? आपल्या मुलांना संजू (संजय दत्तच्या वादग्रस्त आयुष्यावरचा चित्रपट) म्हणतो, तू माझ्या पित्यासारखा (सुनील दत्त) बन, माझ्यासारखा बनू नकोस... सुनील दत्तच्या आयुष्याचे यापेक्षा चांगले सार्थक ते काय? पण हे ऐकायला आता सुनील दत्त हयात नव्हता.

    सुनील दत्तच्या निधनाच्या वेळी (२५ मे २००५) श्रध्दांजलीचा लेख लिहिताना त्याची एकाच वेळेस अनेक रुपे डोळ्यासमोर येत होती. एकेकाळचा रेडिओ सिलोनवरचा निवेदक बलराज, दिग्दर्शक रमेश सैगलने त्याला ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ (१९५५) मध्ये नायकाची संधी देताना त्याचे ‘सुनील दत्त’ असे नामकरण केले. अभिनेता म्हणून वाटचाल करत असतानाच मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ (१९५७) च्या सेटला एकदा दुर्दैवाने लागलेल्या आगीतून नर्गिसना वाचवणे आणि या चित्रपटात आईची भूमिका साकारलेल्या, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आणि मुस्लिमधर्मिय नर्गिसशी लग्न करणे.

    एक मुलगा व दोन मुली यांचे पालनपोषण करताना मुलाने पित्याच्याच दिग्दर्शनातील ‘राॅकी’ (१९८१) चित्रपटसृष्टीत पाऊल टाकताच तो अफू चरस असा ड्रॅग ॲडिक्ट होणे. अशातच पत्नीला कॅन्सर होणे. मुलाचा पहिला चित्रपट प्रदर्शित व्हायच्या पाचच दिवस अगोदर (३ मे १९८१ रोजी) पत्नीचे निधन होणे… मुलावर अमेरिकेत उपचार करणे. तो बरा होत ‘स्टार’ म्हणून एस्टॅब्लिश होत असतानाच मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी म्हणून त्याला अटक होणे. कोर्ट केसमध्ये बराच वेळ आणि पैसा जाणे… सुनील दत्त या सगळ्यातून जाताना त्याची भावनिक, शारीरिक, मानसिक अवस्था, अस्वस्थता कशी असेल हे तोच जाणे. ‘सुनील दत्त होणे नको’ असं बरंच काही त्याच्या आयुष्यात घडलं. अभिनेता म्हणून त्याला अभिनयात फारशी उंची नसेलही. पण आपलं उंच रुपडं, सज्जनपणा, निर्माता व दिग्दर्शकांना सांभाळून घेणे, वादांपासून दूर राहणे यातून त्याने अनेक मान्यवर दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारल्या.

    चांगलं करिअर करण्यासाठीचे गुण त्याच्याकडे होते (नृत्य येत नव्हते. पण त्यावाचून अडलेही नाही.) साधना (१९५८), जाग उठा इन्सान (५९), सुजाता (५९), गुमराह (६३), यह रास्ते है प्यार के (६३), वक्त (६५), खानदान (६५), मेरा साया (६६), पडोसन (६७), हमराज (६७), मिलन (६७), चिराग (६९) इत्यादी चित्रपट अशी यशस्वी वाटचाल करतानाच त्याने आणखीन काही विशेष गोष्टी केल्या. वांद्र्याच्या पाली हिलवर प्रशस्त असा अजंठा बंगला. त्यात पोटमाळ्यात मिनी थिएटर, एडिटींग रुम असे बांधतानाच अजंठा आर्टस ही चित्रपट निर्मिती संस्थाही काढली. त्यात काही विशेष प्रयोगही केले.

    डाकूमधील माणसावर विश्वास व्यक्त करणारा ‘मुझे जीने दो’ (६३.. दिग्दर्शक मोनी भट्टाचार्य) नंतर त्याने आपल्या देशातील पहिला एकपात्री चित्रपट ‘यादें’ (६४) चे दिग्दर्शन व एकट्याची भूमिका असे केले. नर्गिस फक्त एका दृश्यात ओझरती होती. मात्र समिक्षकांनी कौतुक केलेला हा चित्रपट रसिकांनी नाकारला. ‘रेश्मा और शेरा’ (७१), डाकू और जवान (७८), दर्द का रिश्ता (८२), यह आग कब बुझेगी (९१) या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केली. यह आग कब बुझेगीचा मुहूर्त मला आठवतोय. अजंठा मिनी थिएटरच्या गच्चीत झाला असता डिंपल कापडिया नायिका होती.

    आपण हुंडा बळी या सामाजिक कौटुंबिक समस्येवर चित्रपट काढतोय असे सुनील दत्त आम्हा सिनेपत्रकारांना तो आवर्जून म्हणाला. पण काही दिवसांनी शूटिंग सुरु होताच डिंपलने नकार दिल्याने रेखाला विचारले. ती त्याची अनेक वर्षांपूर्वीची प्राण जाए पर वचन न जाए वगैरे चित्रपटांची नायिका. ती कितीही लहरी म्हणून ओळखली जात असली तरी तिने सुनील दत्तची अडचण ओळखून होकार दिला आणि त्यानेही ‘हा बदल प्रेक्षकांपर्यंत पोहचावा’ म्हणून आम्हा सिनेपत्रकारांना गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत आपल्या या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी बोलावले. अशा सुनील दत्तकडेही काही वर्ष कामाचा तुटवडा होता हे कदाचित तुम्हाला माहित नसेल.

    चित्रपटसृष्टीत ‘यश हेच चलनी नाणे’ असते. सुलतान अहमद दिग्दर्शित ‘हीरा’ (७३) हिट होताच सुनील दत्त पुन्हा ॲक्टीव्ह झाला. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जखमी’ (७५) च्या यशाने जबरा सपोर्ट सिस्टीम मिळाली. आता नायक ते चरित्र नायक असा प्रवास सुरु झाला. राजकुमार हिरानीच्या ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस. (२००५) मध्ये संजय दत्तचा रुपेरी पिता साकारला. आदर्श नायक ते डाकू, ग्रामीण नायक ते व्हीलन अशा बहुस्तरीय व्यक्तिरेखा साकारत सुनील दत्तचा रुपेरी प्रवास खूपच मोठा. राजकारणात इंदिरा काँग्रेसचा वायव्य मुंबईचा चारदा खासदार.

    १९८६ साली महाराष्ट्रात एक महिना ‘चित्रपटसृष्टी बंद’चे झालेले आंदोलन मिटवण्यात त्याचा महत्वाचा वाटा. अशा प्रगती पुस्तकाला एक किनार पत्नीला आजारपणात उत्कटपणे साथीची आहे, तर दुसरी किनार वात्रट मुलाच्या अतरंगीपणाची आहे. त्याचे दु:ख एक पिताच जाणो. सुनील दत्तच हे सगळं पेलू शकला. हे ऐरागबाळ्याचे काम नाही. अभिनेता सुनील दत्तपेक्षा व्यक्ती सुनील दत्त खूप विचार करायला लावणारा…

    दिलीप ठाकूर

    glam.thakurdilip@gmail.com