
खासदार सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत जी भाषणे केली, त्यांचे संकलन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले आहे. “सुनील तटकरे : अभिनंदन आणि अभिवादन” या पुस्तकात शरद पवारांच्या पंचाहत्तरी निमित्ताने केलेले अभिनंदनाचे भाषण, वसंतदादा पाटील यांच्या जन्म शताब्दीच्या सुरुवातीनिमित्त केलेले, बॅ अंतुलेंच्या निधनानंतर तसेच आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर केलेले अभिवादनाचे भाषण आले असून शेवटचे भाषण हे खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला व परिषदेचा निरोप घेतला तेव्हाचे केलेले निरोपाचे भाषण आहे. पण त्या प्रत्येक भाषणातून वक्ता म्हणून तटकरेंची नव्याने ओळख झाल्याशिवाय राहात नाही.
राजकीय नेता कसा घडतो याची जर कुणाला उत्सुकता असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठनच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभाची ध्वनीचित्रफीत अभ्यासायला हरकत नाही. एका चांगल्या पुस्तकाचा देखणा प्रकाशन समारंभ, इतकेच त्या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य नव्हते तर प्रफुल्ल पटेलांपासून, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अगदी अलिकडेच तुरुंगातून बाहेर आलेले वादग्रस्त माजी मंत्री अनिलबाबू देशमुखांपासून ते एकेकाळीचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राहिलेले सध्याचे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार भास्करराव जाधव यांच्यापर्यंत अनेक नवे-जुने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. बॅ अब्दुल रेहमान अंतुलेंचे पुतणे तथा जावई अशा दोन्ही नात्यांनी काँग्रेसचे मुष्ताक अंतुलेही होते. तसे म्हटले तर सर्वपक्षीय कार्यक्रम होता. पण प्रत्यक्षात रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या लहानथोरांचा उत्सव असाही तो कार्यक्रम झाला. सुनील तटकरे सध्या ६७ वर्षांचे आहेत. त्यांची दोन्ही मुले राजकारणात स्थिरस्थावर होत आहेत. मुलगा अनिकेत हा विधान परिषदेत सदस्य आहे, तर मुलगी अदिती तटकरे यांनी ठाकरेंच्या महाविकास आघाडी मंत्रीमंडळात रायगडचे पालकमंत्रीपद आणि पर्यावरण, उद्योग अशा खात्यांचे राज्यमंत्रीपद भूषवले होते. त्यांची रायगड पालकमंत्री म्हणून कामगिरीही वाखाणण्यासारखी होती, असे प्रशस्तीपत्र खा. सुप्रिया सुळे यांनी याच समारंभात देऊन टाकले.
सिनारमास कंपनीचा फार मोठा प्रकल्प रायगडमध्ये सुरु होतो आहे, त्यांना जागा देणे हे सारे काम अदिती तटकरेंनी पार पाडले आणि श्रेय सध्याचे भाजपा-शिंदे सरकार घेत आहे, अशी टीकाही सुळेंनी करून टाकली. सुनील तटकरेंच्या राजकीय जडण-घडणीविषयी त्यांचे निकटचे मित्र नेते अजितदादा पवारांनी आणि प्रफुल्ल पटेल, सुळे सर्वांनीच सांगितले.
अजितदादा पवारांनी अनेकांना माहिती नसलेला एक पैलु मांडला. तटकरेंचे वडील दत्ताजीराव हे रायगड जिल्हा परिषदेचे सभापती होते व त्यासाठी त्यांना जि. प. ची गाडी मिळत असे. त्या गाडीचे सारथ्य तरूण सुनीलने केले आणि त्यामुळे त्याचे रायगडचे राजकीय ज्ञान हे अधिक भक्कम झाले असा मुद्दा अजितदादांनी मांडला. ते म्हणाले की आपल्या गाडीचा जो ड्रायव्हर असतो त्याला तुमच्या सर्व बारीक मोठ्या गोष्टी माहिती असतात. हा बाबा कुठे गेला, कधी गेला, किती वेळ गेला, का गेला हे सारे ड्रायव्हरलाच समजत असते. त्यातील गमतीचा भाग सोडला तरी वडिलांच्या वाहनाचा चालक म्हणून काम करताना वडील लोकांशी कसे बोलतात, कसे भेटतात जिल्ह्याचे राजकारण नेमके कसे आहे अशी सारी माहिती व प्रशिक्षण सुनील यांना तेव्हाच मिळत गेले.
सुनील तटकरेंनी नंतर आपल्या छोटेखानी समारोपाच्या भाषणात सांगितले की वडिलांचे निधन १९८४ मध्ये झाले तेव्हा कार्यकर्त्यांनी मला लगेचच राजकारणात आणले. जिल्हा काँग्रेस कमिटीचा सचिव, नंतर जिल्हा परिषदेचा सदस्य आणि अध्यक्ष अशा जबाबादाऱ्या येत गेल्या. काँग्रेसच्या राजवटीत, रायगड जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या, सर्व विषयांच्या शासकीय सल्लागार समित्यांवर, मला सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी उद्योग, पर्यटन, पाटबंधारे, वीजमंडळ, नियोजन अशा जिल्ह्यातील समित्यांवर सदस्य राहिलो. मला नंतरच्या वाटचालीत उद्योग मंत्री, अर्थमंत्री, ऊर्जामंत्री, पाटबंधारे मंत्री अशा सर्व खात्यांत मंत्री म्हणून काम करता आले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम केल्यामुळे नंतरच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामे करून घेताना कधीच अडचण जाणवली नाही. ते प्रशिक्षण महत्वाचे होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की एक नेता असा पटकन तयार होत नाही. त्यासाठी खूप काळ, कष्ट करावे लागतात. ज्याचा अभ्यास आहे, ज्याच्याकडे वक्तृत्व आहे, त्याचे कर्तृत्व झळाळते. सुनील तटकरेंनी प्रामाणिकपणाने जे कष्ट केले, जो अभ्यास केला, त्यातून त्यांचे नेतृत्व उभे राहिले. आज ते देशस्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात होणाऱ्या निवडणुकीच्या तिकीट वाटपात जे ए बी फॉर्म पक्षाकडून दिले जातात, त्यावर सुनीलजींची सही असते, असे त्यांनी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना बजावले.
हे जे पुस्तक परवा प्रकाशित झाले त्याचे नाव आहे, “सुनील तटकरे : अभिनंदन आणि अभिवादन”. त्यात सुनील तटकरे यांनी विविध निमित्तांनी विधान परिषदेत जी भाषणे केली त्यांचे संकलन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले आहे. या पुस्तकात शरद पवारांच्या पंचाहत्तरी निमित्ताने केलेले अभिनंदनाचे भाषण, वसंतदादा पाटील यांच्या जन्म शताब्दीच्या सुरुवातीनिमित्त केलेले, बॅ अंतुलेंच्या निधनानंतर तसेच आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर केलेले अभिवादनाचे भाषण आले असून शेवटचे भाषण हे खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला व परिषदेचा निरोप घेतला तेव्हाचे केलेले निरोपाचे भाषण आहे. पण त्या प्रत्येक भाषणातून वक्ता म्हणून तटकरेंची नव्याने ओळख झाल्याशिवाय राहात नाही. ओघवती भाषा, शब्दभांडार, अचूक शब्दफेक आणि हातात कोणताही कागद, चिठ्टी न घेता केलेले अमोघ वक्तृत्व याचा प्रत्यय ती भाषणे देतात. त्या भाषणांच्या विधिमंडळाने उपलब्ध करून दिलेल्या व्हिडिओ क्लीपचे काही अंश समारंभात दाखवण्यात आले. ते पाहून सुप्रिया सुळे म्हणाल्या की आता तंत्रज्ञानाचे युग आहे. अदिती व अनिकेत तटकरेंनी या पुस्तकाचे ऑडिओ बुक तर करावेच, पण व्हीडिओ बुक स्वरुपातही हे पुस्तक लोकांच्या हाती देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हे तरुणाईपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचेल.
या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली ती भास्कर जाधवांनी केलेल्या खासदारकीच्या उल्लेखाने. त्याचा तोडा संदर्भ अजितदादांच्या आधीच्या भाषणाकडेही होता. दादा म्हणाले की तटकरे जर आमदार असते तर गेल्या अडीच वर्षांत नक्कीच मंत्री राहिले असते. तो धागा पकडून भास्करराव म्हणाले की माझी आणि सुनीलजींची राजकीय वाटचाल समांतर राहिली आहे. ते जिल्हा परिषदेत अध्यक्ष होते तेव्हा मी विरोधी पक्ष नेता होतो. ते जेव्हा आमदार होते, तेव्हा मी मंत्री होतो. आता मीही आमदार आहे. जर तटकरेंची इच्छा विधानसभेत परतण्याची असेल तर माझी तयारी दिल्लीत खासदार म्हणून जाण्याची राहील. तटकरेंचे व जाधवांचे जिल्ह्याच्या राजकारणात कधीच पटले नाही, पण तरी लोकसभा निवडणुकीत जाधवांनी तटकरेंना मदतच केली. कभी खुषी, कभी गम अशा या नात्याला खासदारकीची नवी फोडणी भास्कररावांनी दिली आहे. राज्यात कोणीही मुख्यमंत्री असले तरी त्यांच्याशी सुनीलजींचे मधुर संबंध राहिले असा एक चिमटाही त्यांनी काढला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की पवार साहेबांनी एखाद्या नेत्याला म्हटले की “तुम्हाला लोकसभा लढवावी लागेल”, तर तो नेता सायंकाळी घरी येऊन बसत असे व म्हणे, “साहेब, माझे काय चुकले? ! ” लोकांना दिल्लीत यायचे नसते. जर भास्करराव तयार असतील तर कोकणातून दोन जागा आहेत. एक तटकरेंचीच राहील तिथे आम्ही बदल करणार नाही. पण जाधवांची इच्छा असेल तर महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत विचार करता येईल असे सांगून सुप्रिया सुळेंनी जाधवांची पंचाईत करून टाकली.
– अनिकेत जोशी
aniketsjoshi@hotmail.com