स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट म्हणजे उत्तम दिग्दर्शन कलेचा एक उत्कृष्ट नमुनाच

नुकताच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पुन्हा एकदा आपल्याला वीर सावरकर आणि त्यांच्या पुण्यकर्माची आठवण करून दिलेली आहे.

  नुकताच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पुन्हा एकदा आपल्याला वीर सावरकर आणि त्यांच्या पुण्यकर्माची आठवण करून दिलेली आहे. या चित्रपटाने जणू चारित्र्यपटाचा एक नवा मैलाचा दगडच प्रस्थापित केला आहे.चित्रपटाच्या सुस्पष्ट आणि सुटसुटीत सादरीकरणातून दिग्दर्शक, लेखक आणि पर्यायाने वि.दा. सावरकर आपल्या पर्यंत थेट पोहचतात. हा चित्रपट म्हणजे समर्पणाचा आणि उत्तम दिग्दर्शन कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कारण सावरकरांसारखे अफाट व्यक्तिमत्व एका पडद्यावर कमी वेळात मांडणे हे मोठ्या जिकिरीचे काम होते, जे की रणदीप हुडाने प्राणपणाने पार पाडले असे म्हणता येईल.

  रणदीप हुडा द्वारे का होईना आपल्या सावरकरांना एक ठळक आवाज आणि व्यक्तिमत्व भेटले ज्याने सावरकरांची देशप्रेम भावना आणि विचारधारा जाणीवपूर्वक समजून घेतली आणि ती योग्य आणि ठसठशीत पणे जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून त्यांच्या बद्दल असलेले अनाठायी आरोप आणि पूर्वग्रह दूर व्हावेत. या प्रामाणिक प्रयत्नाचे कौतुक तर व्हायलाच हवे असा आमचा आग्रह आहे. न झाल्यास पुन्हा असे धाडस करण्यास कोण धजावेल?

  चित्रपट कौतुकास्पद असण्याचे कारण की रणदीप हुडा ने तो चित्रपट फक्त छायांकित नाही केला तर तो चित्रपट आणि ते चरित्र जगले आहे आणि याचा प्रत्यय प्रत्येक क्षणोक्षणी येतो. एखादं पात्र साकारताना त्या व्यक्ती मधले गुणदोष ही थोड्या प्रमाणात नटाला अंगिकारावे लागतात. आणि इथे तर पात्र खुद्द सावरकर होते, जे त्यांच्या काळातील एक भक्कम प्रभावक होते, ज्यांच्या व्यक्तिमत्व आणि स्वभावाची झिंग एकदा चढली की मग ती सुज्ञ आणि जाणत्या माणसाची पाठ सोडणे नाहीच. तसच काहीस रणदीप सोबत ही झालं असावं…
  चित्रपटा मधील सावरकरांचे शपथग्रहण दृश्य फार पूरक होते ज्यामधून त्यांच्या अढळ निश्चयाचे प्रदर्शन झाले.

  सावरकरांच्या जीवनाचे मानसिक, शारीरिक, आत्मिक, सामाजिक अशे सगळे पैलू या चित्रपटामधून यशस्वीपणे व्यक्त करण्यात आलेले आहे. तारुण्यात पदार्पण करताना किंबहुना त्या आधी पासूनच सावरकरांचा व्यायाम आणि शारीरिक सुदृढता यावर असलेला ठाम विश्वास काही दृश्यांमध्ये अचूक टिपलेला आहे.सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध जो जनजागृतीचा वसा घेतला होता तो प्रत्यक्षात अनेक दृश्यामधून दिसतो मग ते फर्ग्युसन कॉलेज पुणे असो, लंडन असो किंवा काळे पाणी !! लंडन ला जाऊन स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र करण्याचे सावरकरांचे मनसुबे रणदीपच्या अनेक हालचाली, हावभाव आणि संपूर्ण अभिनयातून प्रखरपणे आपल्याला जाणवतात.

  त्यातच लंडनमध्ये असताना सावरकरांना जे पुत्रविरहाला सामोरे जावे लागले होते त्या घटनेच्या चित्रीकरणात सावरकरांच्या मनात असलेला आक्रोश आणि अमाप सागराशी असलेले एकतर्फी भांडण दिसून येते. अशे कोणतेही बारकावे रणदीपच्या दिग्दर्शनातून सुटलेले नाही. कारण प्रत्येक ठळक जीवन घटनेला समर्पक आणि प्रतीकात्मक एक तरी दृश्य चित्रपटात समाविष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेलेला आहे. सावरकरांच्या पुस्तकांनी केलेली क्रांती दर्शवण्यासाठी भगत सिंग सोबत ची हितगुज अधिक आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या कीट मध्ये समाविष्ट असलेले पुस्तक दाखवण्यात आले आहे.

  काळ्यापाण्याच्या शिक्षेत असताना मोठा भाऊ सोबत असूनही नसणे याचे दुःख आणि तो किती वर्षांनी दिसताच झालेला आनंद किती अवर्णनीय असेल ते नेमके रणदीप अभिनयातून साकारले गेले आहे. १० वर्षांनी कुटुंबीय भेटायला आले असताना आपली वाईट अवस्था त्यांना दिसू नये या साठी केलेले बालिश प्रयत्न आणि भेटल्यावर आईसमान वहिनी ची मृत्यूवार्ता कळता काही क्षण पसरलेले अनामिक मौन. बाबाराव यांचे बलिदान ही कसे थोडे दुर्लक्षित राहले हे देखील एका मिरवणुकीच्या दृष्यातून दाखवण्यात आले आहे. हे सगळे लहान लहान बारकावे दर्शकाला अंतर्मुख करतात.

  सावरकर सागर पोहून फ्रान्स किनाऱ्याला लागले तेव्हाचा त्यांचा थकवा, मानसिक तारांबळ आणि स्वतः ला देशासाठी वाचवण्याची अगतिक तळमळ काळजाचे पाणी करते.
  काळ्या पाण्याच्या शिक्षा काळात घालवलेला एक एक दिवस आणि तिथे त्यांच्या सोबत झालेले अनेक अन्याय बऱ्याच दृष्यामधून दाखवले गेले आहे. जसे की निकृष्ट दर्जाचे अन्न आणि वैद्यकीय सोयी, क्षमतेपलिकडे शारीरिक मेहनत करून घेणे, वॉर्डनचे अत्याचार, जेलर बॅरीने उगवलेला शिक्षारुपी सूड हे सगळे च अगदी चित्तथरारक पद्धतीने साकारले आहे.

  थोडक्यात काय तर या चित्रपटामधून सावरकर जैसे थे आपल्यापर्यंत पोहचतात. हा चित्रपट म्हणजे आताच्या तरुण पिढी साठी जुन्या लादलेल्या मतांचे आणि विचारांचे ओझे झुगारून देऊन स्वतः सत्य पडताळणी करून आपल्या देशाचा खरा इतिहास जाणून घ्यायची एक नामी संधी आहे आणि ती पण सोपी कारण या मध्ये इतिहासाचा तपशीलवार अभ्यास तर दिग्दर्शक आणि कलाकार यांनी आधीच केलेला आहे.

  सावरकरांसारखा संयमी माणूस जो देशप्रेमापोटी निरपेक्ष झटत राहला. अशा महामेरू ला तर आमचा सलाम आहेच !! पण सोबत च त्यांच्या चारित्र्याला उजाळा देणारा चित्रपट बनवणारा आणि त्यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या रणदीप हुडा ला ही आमचा सलाम.
  हा चित्रपट बनवण्यासाठी आणि सावरकरांची योग्य ती आणि जशी आहे तशी छबी उभी करण्या साठी आम्ही रणदीप चे शतश: ऋणी आहोत. तेव्हा ही संधी न सोडता प्रत्येक देशभक्त भारतीयाने हा चित्रपट नक्की बघावा असे आमचे निवेदन किंवा आग्रहच समजावा.

  नमन अशा त्या भूमिपुत्रांना आणि त्यांचा इतिहास जिवंत ठेवणाऱ्या कलाकारांना !!

  – नेहा केदार