केळव्याची स्वयंभू शितलादेवी

पालघर तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीच्या मध्यभागी सागर तीरावर निसर्ग हिरवळीत असलेले केळवे गाव. या ठिकाणी शीतला मातेचे स्वयंभू स्थान असून प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. नवरात्रीत मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात नऊ दिवस या ठिकाणी उत्सवाचे वातावरण अनुभवयास मिळते.

     

    केळवे हे बंदर होते इसवी सन ११९३ सालात महीकावती ही बिंबराजाची राजधानी असताना या बंदरावरून राजधानीचे संपूर्ण व्यापार उद्दीम चालायचा. मराठ्यांच्या राजवटीत तीन किल्ले बांधले असून त्यातील एक किल्ला केळवे बंदरात प्रवेश करतानाच लागतो.

    त्या काळात जकात नाका म्हणून त्या किल्ल्यास संबोधले जात असे. राजधानी माहिकावतीच्या संरक्षणाची जबाबदारी केळवा आणि माहीम इथल्या किल्ल्यावर होती. इ.स. ११४० ते इसवी सन १७४० या कालावधीत हीच राजधानी होती. या संपूर्ण प्रदेशाचे राज्यकारभार इथूनच चालायचा अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हे केळवे गाव शीतलादेवीच्या वास्तवाने पुनित झाले आहे.

    शीतलादेवी देवस्थानाच्या समोरच्या बाजूस बगलवाडी नावाची बागायतीवाडी आहे. शीतलादेवीचा गुप्त स्वरूपात वास होता. कारण त्यांनी गावातील एका शेतकऱ्याचे स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला, ही बातमी येथील गोपाळपंथीय लोकांना समजताच त्यांनी देवीचा शोध घेतला.

    देवीच्या निश्चित ठावठिकाण माहीत नसतानाही ते नेमके ज्या विवरात देवी होती तिथे गेले आणि तिकडे त्यांनी खणून आईची मूर्ती बाहेर काढली. सध्या देवी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तिची विधीपूर्वक स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली. गोपाळ पंथी नानांनी पुढाकार घेऊन लोकांच्या मदतीने लहानसे मंदिर बांधले, पुढे सोळाव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत या देवळाचा जीर्णोद्धार केला.

    होम कुंडात बकऱ्याचा व कोंबड्याचा बळी देऊन त्याचा प्रसाद साऱ्या गावभर ढोल- ताशे बडवीत देवीचा जयजयकार करीत वाटला जाई. परंतु ही प्रथा सन १९६५ पासून गावातील नागरिकांनी बंद केली. तेव्हापासून या दिवशी कोहळ्याचा बळी दिला जाऊन उस्तवाची सांगता केली जाते.

    पहिल्या रात्री शितलादेवी पुढे सुंदर आरास केली जाते नऊ प्रकारची धान्य देवी समोर पेरली जाऊन नऊ घट देवीसमोर रामकुंडातील पाण्याने भरून स्थापले जातात. झेंडूच्या दोन माळा दोन दिशेने एक-एक अशा प्रमाणे नऊ रात्रीत १८ माळा देवीसमोर टांगून चांगली आरास केली जाते. चार रात्री गेल्यावर देवी समोर पेरलेल्या धान्यांना मोड येऊन त्याची वाढ होते.

    पाचव्या रात्री विविध वस्त्रांनी देवीला सजवून गळ्यात हार घालून देवीची आद्य पूजा केली जाते. सहाव्या रात्री हातात दिवे घेऊन भक्त देवीसमोर नाचतो व देवीला जागे करतो. सातव्या रात्री बेल, पिंपळ, तुळस आदींसह नऊ पवित्र झाडाच्या फांद्या घेऊन त्याच्याभोवती फुलांची विविध प्रकारची आरास केली जाते. सप्तशती जप होमहवने व बळी देऊन गावकरी रात्रभर प्रसाद घेऊन फिरतात. सध्या बळी देण्याची प्रथा बंद केल्यामुळे गावभर आरोळी मारीत फिरणे बंद झाले आहे.

    दहाव्या दिवशी सीमोल्लंघनसाठी देवी गावाबाहेर निघते, असा विश्वास आहे. धनधान्य, फळे, फुले त्याचे सागरात विसर्जन केले जाते. नवरात्रीच्या उत्सवात देवी देवतांबरोबर युद्धात गुंतलेली असल्यामुळे देवतेची आंघोळ न करता तिचे पाय धुतले जातात. विजयादशमीला देवीला आंघोळ घालतात, कारण ती दैत्याला मारून शांत झालेली असते, अशी प्रथा आजतागायत सुरू आहे.

    शीतलादेवी मंदिरासमोर रामकुंड आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या बाणाने हे रामकुंड निर्माण केल्याची आख्यायिका आहे. राम-रावणाचे युद्ध जरी लंकेत चालू होते तरी रावणाची कित्येक रक्षक फार दूरवर पसरले होते. रावणाच्या मदतीसाठी महिकावतीनगरीचे अधिपती रावण बंधू अहिरावण आणि महिरावण हे लंकेत गेले असता त्यांनी राम-लक्ष्मणाला महिकावती नगरीत पळवून आणून महिकावती देविस बळी देण्याचा घाट रचला होता. रात्रीच्या वेळी राम-लक्ष्मण हे हनुमंताच्या संरक्षणात मोठ्या शिळेवर निद्रिस्त अवस्थेत असता अही आणि मही यांनी राम-लक्ष्मणांना भुयारमार्गे महिकावतीनगरीत पळून आणण्यात यश आले. परंतु ही गोष्ट हनुमानाच्या ध्यानात येताच महीकावती नगरीत त्वरित दाखल झाला.

    महिकावाती देवीला लाथ मारून आडवे पडून तिच्या जागेवर स्वतः बसून राम-लक्ष्मणाचा बचाव केला. राम-लक्ष्मणांनी हनुमंताच्या साह्याने अहिरावण आणि महिरावणाचा निपात करून लंकेत प्रयाण करण्यापूर्वी ते कदलिवह म्हणजे आजचे केळवे या गावी सागर किनाऱ्यावर विश्रांतीसाठी थांबले.

    श्रीरामांनी बाण जमिनीवर मारताच तिथे एक सुंदर तलाव निर्माण झाला. त्यालाच आज रामकुंड म्हणून ओळखले जाते. अशी आख्यायिका या रामकुंडाची आहे. प्रभू रामचंद्र त्या तिथे कुंडाच्या समोर ध्यानस्थ झाले, त्या त्यांच्या तपश्चर्येतून हळूहळू शिवलिंग वाळूतून गंगेसह पृथ्वीवर उतरले.

    वाळूतून निर्माण झालेले हे स्वयंभू शिवलिंग फक्त भारतात एकच आहे. म्हणून त्यास भवानी शंकर वाळूकेश्वर ही संज्ञा प्राप्त झाली. या शिवलिंगावर अभिषेक करून प्रभू रामचंद्र ने त्याची शास्त्रोक्त पूजा केली. त्यानंतर त्यांनी लक्ष्मणासह पवनसुताच्या साह्याने लंकेकडे गमन केले अशी आख्यायिका या वाळूकेश्वर शिवलिंगा बाबत आहे.

    शीतलादेवी हे जागृत देवस्थान आहे. नवरात्रीमध्ये गुजरात, मुंबईसह कोकणातील भक्तगण दर्शनासाठी येतात. दोन वर्ष नवरात्रीचा उत्सव कोरोनामुळे साजरा करता आला नाही. मात्र यावर्षी मोठ्या संख्येने भक्तगण दर्शनासाठी येतील असे वाटत आहे. या काळात कुठलीही गडबड गोंधळ होऊ नये याकरिता शीतलादेवी देवस्थान ट्रस्टकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.

    – हितेंद्र राऊत, अध्यक्ष शीतलादेवी देवस्थान ट्रस्ट

    संतोष चुरी

    santoshachuri@gmail.com