afganistan

सुमारे वर्षभरापूर्वी अमेरिकन सैन्य अफगाणिस्थानमधून गाशा गुंडाळून निघायच्या तयारीत होते. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अल-कायदा आणि तालिबानचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात घुसली. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आणि अब्जावधी डॉलर खर्च केल्यानंतरही अपेक्षित यश मिळेना झाल्यावर अमेरिकेने खुद्द तालिबानशीच वाटाघाटी करायला सुरुवात केली. ‘गुड तालिबान आणि बॅड तालिबान’ असे नवे शब्दही मग तयार झाले. कतार देशातील दोहा येथे अनेक वाटाघाटी झाल्या. या वाटाघाटीमध्ये अमेरिका, तालिबान, काही युरोपियन देश आणि पाकिस्तानचा सहभाग होता. त्यावेळच्या अफगाण सरकारला या सगळ्यापासून दूर ठेवलं गेलं. हा खरं तर अफगाणी जनता आणि सरकारचा विश्वासघात होता पण अमेरिकेला काही करून वाटाघाटी यशस्वी करून अफगाणिस्तानातून निघायचं होतं. त्यात अडथळा येईल अशी कोणतीही गोष्ट त्यांना नको होती.

  अमेरिकन सैन्य माघारी जाणार अशी शक्यता निर्माण होताच तालिबाननं मोठ्या प्रमाणात स्वतःची ताकद वाढवायला सुरुवात केली. पाकिस्तान मदतीला होताच. अफगाणिस्तानचे अनेक छोटे-मोठे प्रांत तालिबानच्या अमलाखाली येऊ लागले. इकडे अफगाणिस्तान सरकार आणि सैन्य तालिबानचा कसा मुकाबला करायचा, या पेचात असावे; कारण तालिबानशी लढण्याची त्यांची तयारी किंवा मानसिकता दिसत नव्हती. अनेक ठिकाणी तालिबानला लष्कराचा विरोध होताना दिसला नाही. १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानी दहशतवादी काबुलमध्ये घुसले. खुद्द राजधानीमध्येही त्यांना जोरदार विरोध झाला नाही. अध्यक्ष अश्रफ घनी हे हेलिकॉप्टरच्या मदतीने उसबेकिस्तान किंवा ताजिकिस्तानकडे पळाले. त्या अगोदर आठ दिवसांपूर्वीच ‘मेलो तरी अफगाणिस्थान सोडणार नाही’ असं जाहीरपणे बोललेले. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की ‘मला देश सोडून जायचंच नव्हतं पण काबुलवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळी मी रक्षा मंत्रालयात गेलो तर तेथील सर्वजण निघून गेलेले. संरक्षणमंत्री पळून गेल्याचं कळालं. अशावेळी तालिबानला रोखायचे सर्व मार्ग बंद झालेले. शेवटी अफगाणिस्तानचा अध्यक्ष तालिबानच्या हातून मारला गेला, अशी देशावर नामुष्की येऊ नये म्हणून मी देशाबाहेर पडलो.’ अश्रफ घनी पळून जाताना स्वतःबरोबर बराच पैसा अडका घेऊन गेले असा आरोप त्यांच्यावर होतो. घनी मात्र हे आरोप फेटाळून लावतात. माझी विश्वासार्हता घालवण्याचा, प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे असे सांगतात.

  तालिबान काबुलमध्ये घुसल्यावर काबुल सोडून जाण्यासाठी अफगाण नागरिकांची प्रचंड धावपळ सुरू झाली. विमानतळाचा ताबा त्यावेळी अमेरिकन सैन्याकडे होता. अमेरिका तिच्या सैनिकांना आणि काही निवडक अफगाण नागरिकांना देशाबाहेर नेत होती. भारत व इतर काही देश आपापल्या नागरिकांची सुटका करण्यात गुंतलेले. देशाबाहेर पडण्यासाठी विमानाच्या पंखांवर बसलेल्या विमानाच्या चाकांना लटकून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अफगाण नागरिकांची दृश्य दूरचित्रवाणीवरून सर्व जगभर दाखविली गेली. या अशा भयभीत निर्णायकी अवस्थेत प्रत्येक जण तालिबानपासून लांब पळून जाण्याच्या विचारात, प्रयत्नात असताना एक नेता मात्र ठामपणे तालिबानविरुद्ध लढा देण्यासाठी उभा होता; त्याचं नाव अमरुल्ला सालेह, अफगाणिस्तानचा उपराष्ट्राध्यक्ष.

  अमरुल्ला सालेह काबूलच्या उत्तरेला सुमारे दीडशे किलोमीटरवर असलेल्या पंजशीर व्हॅली परिसरात दाखल झाला. राष्ट्राध्यक्ष घनी देश सोडून गेलेले असल्याने सालेहने स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले. सालेहच्या जोडीला होता ३२ वर्षांचा युवक अहमद मसूद, हा अहमदशहा मसूद या अफगाणिस्तानातील फार मोठ्या लढाऊ नेत्याचा मुलगा. अहमदशहा मसूदला पंजशीरचा शेर म्हटलं जातं. अहमदशहा मसूदच्या नावाचा आणि पंजशीर व्हॅलीचा दबदबाच असा मोठा की हळूहळू इथे तालिबान विरुद्ध लढणारे गट एकत्र येऊ लागले.

  अहमदशहा मसुद हा मुजाहिदीन नेता. रशियन सेना अफगाणिस्तानात घुसली होती तिच्याविरुद्ध लढणारा. १९८५ मध्ये रशियन आणि अफगाण सेनेनं पंजशीर व्हॅलीवर कब्जा मिळवायचा आटोकाट प्रयत्न केला होता, पण मसूद मागे हटला नाही. पुढे १९९० नंतर अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आलं त्यावेळी ही अहमदशहा मसूदने पंजशीर व्हॅलीत त्यांना घुसू दिले नाही. पंजशीर व्हॅली अनेक वर्षे अजिंक्यह राहिलेली. पंजशीर दर्याघ डोंगरांनी भरलेला भाग. यातून आरपार जाणारा एकच रस्ता. भौगोलिक परिस्थितीचा मसूदने पुरेपूर उपयोग करून घेतला. हा अहमदशहा मसूदही तालिबानप्रमाणे इस्लामला मानणारा पण स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अनेक स्वातंत्र्य देणारा प्रगत इस्लाम मांडणारा मसूद. यामुळे पाश्चिमात्य देशांची मदत त्याला नेहमी मिळत आली. भारतानेही अहमद शहा मसूदला अनेकदा मदत केली.

  अमेरिकेवर हल्ला करण्याच्या दोन दिवस अगोदर अल कायदाने अहमदशहा मसूदचा खून केला. त्यांचे मारेकरी ट्युनिशियन अरब पत्रकार बनून त्याच्या भेटीला गेले होते. २०२१ मध्ये वीस वर्षानंतर त्याचा मुलगा परत पंजशीर व्हॅलीमध्ये तालिबानला टक्कर देऊ पाहत होता.

  अमरुल्ला सालेहदेखील अहमदशहा मसूदच्या तालमीत तयार झालेला. दोघेही ताजिक वंशाचे. सालेह पूर्वी अफगाण गुप्तचर संस्थेचा (एनडीएफ) प्रमुख होता. त्यानंतर अफगाणिस्तानचा अंतर्गत सुरक्षा प्रमुख झाला. सालेह पाकिस्तानचा कट्टर विरोधक. पाकची अफगाणिस्तानातील लुडबुड त्याला बिलकुल पसंत नाही. तालिबानबरोबर कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याच्याही तो विरुद्ध होता. त्यामुळे तो तालिबान आणि आयएसआय या पाकच्या गुप्तहेर संघटनेच्या ‘हिटलिस्ट’वर नेहमीच असतो. सालेहवर अनेक जीवघेणी हल्लेही झालेत.

  तालिबानने काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर देखील जवळपास महिनाभर त्यांना पंजशीर व्हॅलीमध्ये शिरता आलं नाही. सालेह व अहमद मसूदने निकराचा प्रयत्न केला खरा पण शेवटी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. अमेरिका, युरोप, रशिया, चीन, भारत अशा कोणत्याच देशाकडून त्यांना मदत मिळू शकली नाही. ताजिकिस्तान मसूदच्या सेनेला मदत करणारा देश पण तालिबानने ताजिकिस्तानपासून पंजशीरपर्यंत पोहोचणारे सर्व रस्ते पूर्ण बंद करून टाकले. पाक सैन्याच्या मदतीने ड्रोन हल्ले केले गेले. अखेर सालेह आणि अहमद मसूदला पंजशीर सोडावे लागले. आज ते कुठे आहेत ते माहित नाही. कदाचित ताजिकिस्तान, उसबेकिस्तान किंवापंजशीरच्याच एखाद्या डोंगरकपारीत लपून तालिबान विरुद्ध पुन्हा नव्याने सैन्याची जमवाजमव करत असावेत. सालेहचे योद्धे तालिबानवर गनिमी हल्ले करत असतात. त्याच्या चित्रफिती सोशल मीडियावर अनेकदा दिसतात. गेल्या वर्षभरात तालिबान दिवसेंदिवस बळकट होतोय. विरोध करणाऱ्यांना थेट यमसदनाला पाठवलं जातंय. गेल्या ४२ वर्षांचा सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सामान्य अफगाण माणूस खचून गेला आहे. त्याला पुन्हा तालिबान विरुद्ध लढायला उभा करणं हे मोठं आव्हान सालेह आणि मसूद समोर आहे. अफगाणिस्तानात उषःकाल होता होता काळ रात्र झाली आहे.

  -सचिन करमरकर

  purvachebaba@gmail.com