कोरोना आणि गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप

‘कोरोना’ हा सद्यस्थितीत परवलीचा शब्द झाला आहे. किंबहुना सगळ्या जगात याचे सावट घोंगावत आहे. याने माणसाच्या जगण्याला एक वेगळा आयाम प्राप्त करून दिला आहे. त्याने त्याच्यासोबत जगायचं कसं हे शिकवायला सुरुवात केली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर याच कोरोनामुळे अनिवार्य झाला आहे.

‘कोरोना’ हा सद्यस्थितीत परवलीचा शब्द झाला आहे. किंबहुना सगळ्या जगात याचे सावट घोंगावत आहे. याने माणसाच्या जगण्याला एक वेगळा आयाम प्राप्त करून दिला आहे. त्याने त्याच्यासोबत जगायचं कसं हे शिकवायला सुरुवात केली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर याच कोरोनामुळे अनिवार्य झाला आहे.

कोरोनामुळे जीवाभावाच्या नात्यामंध्ये अंतर पडलेलं पाहायला मिळत आहे. कारण या कोरोनाने सर्वांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं तगडं आवाहन उभं केलं आहे. माणूस माणसाच्या जवळ गेला की, दोघांपैकी एकाला जरी याची लागण झालेली असेल तर हाच कोरोना दोघांसाठीही घातक ठरू लागला आहे. यामुळे माणसं एकमेकांसोबत वावरताना तनाने सोशल डिस्टन्सिंग पाळू लागली आहेत. त्यातच यंदा साजरे होणारे सण उत्सवही मर्यादित स्वरुपात साजरे होताना दिसत आहेत. गणेशोत्सवाची तर पार रयाच गेली आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आनंदाला आलेलं उधाण यावर्षी दिसत नाही. ना गणपतींची मिरवणूक, ना सजावट, ना या उत्सवाच्या निमित्ताने होणारी गर्दी कुठेच पाहायला मिळत नाही. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेश मूर्तींची कमी ठेवायला सांगितली असल्याने काही मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी गणपतीची उंची कमीत कमी ठेवून हा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी लोकोपयोगी समाजकार्य करण्यावर भर दिला आहे.

मुंबईत ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही यावर्षी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी गणपतीच्या मूर्तीची उंची कमी ठेवून रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात हा परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो पण कोरोनामुळे मंडळाने स्थानिक रहिवाशांशिवाय अन्य कोणालाही दर्शनासाठी प्रवेश न देण्याचे निश्चित केले आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये हाच त्यामागचा प्रामाणिक हेतू आहे. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ गणेशोत्सव मंडळाने यंदा नेहमीसारखी मूर्ती आणण्याऐवजी लहान आकाराच्या चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे या कोरोनामुळे माणसाच्या आनंदावर यावर्षी विरजणच पडलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारात गणेशोत्सवासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठीही लोकांनी फार गर्दी केल्याचे चित्र कुठेच पाहायला मिळाले नाही कारण लोकांनी आपापल्या घरात राहूनच कोरोनाला हरवायचं ठरवलं आहे. दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे दरवर्षी थाटात होणारे विसर्जन यंदा साध्याच पद्धतीने झाले. यावेळीही नेहमीसारखा उत्साह जाणवला नाही. ना ढोल-ताशे, ना मिरवणूक ना काही. घरातून गणपतीची मूर्ती घेऊन बाहेर पडल्यानंतर थेट विसर्जनस्थळी आणि पुन्हा घरी परत असाच प्रवास दीड दिवसांचे गणपती असणाऱ्या प्रत्येकाने केला आहे.

सो, हे गणपती बाप्पा माझं तुझ्याकडे हेच मागणं आहे की, सर्व विश्वावर घोंगावत असलेलं हे कोरोना विषाणूचं महाभयंकर वादळ तू लवकरात लवकर शमविण्याचा प्रयत्न कर आणि आम्हाला आमचं पूर्वीसारखं आनंदी आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी शक्ती दे कारण आम्हाला पुढच्या वर्षीचा येणारा गणेशोत्सव त्याच दणक्यात आणि त्याच थाटात साजरा करायचा आहे, पण यावर्षी सर्वांना एकच विनंती आहे की, सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा आणि या गणेशोत्सावाचा आनंद घ्या. गणपती बाप्पा मोरया!