गोंड साम्राज्याचे प्रवेशद्वार उमरेडचा किल्ला

गत सहाशे वर्षांपासून आपल्या इतिहासाची साक्ष् देत उभा असलेला हा किल्ला आज अतिशय जिर्ण अवस्थेत शेवटच्या घटका मोजत आहे. किल्ला तर काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या येथे केवळ चार बुरुजांसह लांबसडक भिंत उभी आहे. याच भिंतीने इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळ्यांचा वार आपल्या छातीवर झेलला होता. त्या युद्धाचे पुरावे आजही ही भिंत उमरेडकरांना चेतावत असते.

  • इ.स. 1425 मध्ये किल्ल्याची निर्मिती
  • ऐतिहासिक वारशाला जीर्णोद्धाची वाट
  • गांधीसागर तलावाचा परिघ 9 किमी लांब
  • शासन प्रशासनाचे उदासीन धोरणाचा बळी ठरतोय्

विनोद मेश्राम/ नितीन शेगावकर
उमरेड. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तालुका व ऐतिहासिक शहर म्हणून ख्यातीप्राप्त असलेला उमरेडला सांस्कृतिक, धार्मिक जसा वारसा आहे, अगदी तसेच ऐतिहासिक ओळख देखील शहराला लाभली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने शहरातील धरोहरांचा विकास करून प्रचार प्रसार केल्यास प्रशासनाच्या महसुलात पृनक्कीच भर पडू शकते; परंतु यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने नवयाने विचार करण्यास अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत संबंधितांचा या बाबतीत दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत हे बदल शक्य नाहीत. बदल, विकासाची वाट पाहत असलेल्या धरोहरांमध्ये अत्यंत महत्वाचे स्थळ म्हणजे उमरेड नगरीतील शतको न् शतके अभेद्यपणे उभा असलेला गोंडसाम्राज्य कालीन किल्ला.
गत सहाशे वर्षांपासून आपल्या इतिहासाची साक्ष् देत उभा असलेला हा किल्ला आज अतिशय जिर्ण अवस्थेत शेवटच्या घटका मोजत आहे. किल्ला तर काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या येथे केवळ चार बुरुजांसह लांबसडक भिंत उभी आहे. याच भिंतीने इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळ्यांचा वार आपल्या छातीवर झेलला होता. त्या युद्धाचे पुरावे आजही ही भिंत उमरेडकरांना चेतावत असते. मात्र या किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा धगधगता इतिहास उमरेडकरांच्या मनातून कायमचा नष्ठ होण्याच्या मार्गावर असताना शासन, प्रशानाने या किल्ल्याची दखल घेणे निकडीचे झाले आहे.

चंद्रपूरचे गोंड राजे कोंड्याशाह उर्फ करण शाह यांनी इ.स. 1425 च्या सुमारास या किल्ल्याची निर्मिती केली. नीती अनीतीचे राजकीय हेवेदावे, युद्धाची घोडदोड, सत्तासमीकरण अशा एक ना अनेक संघर्षाचे पुरावे या किल्ल्याच्या मातीत गेली सहाशे वर्षांपासून दडून आहेत. सुरुवातीला राजे भोसले व नंतर आधुनिक युगात इंग्रजांसोबत झालेल्या युद्धामुळे या किल्ल्याचे मोठे नुकसान झाले. भोसले असोत की इंग्रज यांचे वार या किल्ल्याने आपल्या अंगावर झेलले आहेत, त्या खुणा, तो भळभळता इतिहास आज नामशेष होण्याच्या मार्गावर असताना केवळ शासन प्रशासनच नव्हे तर सामाजिक संघटना व शहरवासीयांनी पुढे येऊन आपल्या इतिहासाचे पुरावे नष्ठ होण्यापासून वाचविण्याचे धारिष्ट्य दाखविणे आज आवश्यक आहे. कारण याच पुढाकारातून या ऐतिहासिक किल्ल्याचे जीर्णोध्दार व सुशोभीकरण होऊन पुन्हा किल्ल्याची तटबंदी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

किल्ल्याच्या भूगर्भात आहेत अनेक रहस्य
इ.स. 1425 मध्ये बांधलेल्या या किल्ल्याची लांबी 800 फुट तर रुंदी 20 फुटाच्या जवळपास आहे. किल्ल्याच्या 6 फुटाची उंची दगड व विटांच्या साह्याने उभी केली आहे. किल्ल्याला सहा बुरुज होते. यातील दोन बुरुज जमीनदोज झाले असून हे बुरुज 35 फुट उंच आहे. किल्ल्याची भंत 17 फुट रुंद आहे. पूर्व भागात मुख्य प्रवेशद्वार होते. आतील भागातील जनानखाना पूर्णत: नष्ट झाले असून आतील भागातच हेमाडपंथी शिल्पकलेचे साक्षीदार शिवमंदिर आहे. सध्याघडीला उमरेड नगरपालिकेने एक उद्यान बनविला आहे. या जुन्या उद्यानातील बुरुजाला लागून एक भुयारी मार्ग होते. ते पालिका प्रशासनाने दगड, माती टाकून पूर्णत: बंद केले आहे. या भुयारी मार्गाचे उत्खनन केल्यास गोंड राजाचे अनेक रहस्य पुढे येऊ शकतात.

राजे भोसलेंनी रोवली भगवी पताका
चंद्रपूरचे गोंडराजे करणशाह यांचे साम्राज्य उमरेडपर्यंत विस्तारले होते. उमरेडच्या गढ किल्ल्याच्या संरक्षणासाठी करणशहाने किल्ल्यालगत 9 किमीच्या परीघ व पाऊण किमी रुंद असलेल्या तलावाची निर्मिती केली होती. असेही म्हटल्या जाते की, याच तलावाच्या खोदकामातून निघालेल्या दगड व मातीच्या विटा बनवून किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. या किल्ल्याला गोंड राजाचया साम्राज्याचा उमरेड दरवाजा वा प्रवेशद्वार असेही संबोधल्या जाते. येथूनच नागपूर, भंडारा, चंद्रपूरकडे जाण्यासाठी मुख्यमार्ग होता. रघूजी राजे भोसले यांच्या पाटणसावंगीच्या युधद्धानंतर त्यांनी सैन्यासह भंडाऱ्याकडे आगेकुच केली. तेव्हा उमरेडचा किल्ला गोंड राजाच्या ताब्यात होता. इ.स. 1738 राजे भोसलेंनी आक्रमण करून उमरेडचा किल्ला ताब्यात घेतला होता. त्यानंतर पवनीचा किल्ला सुध्दा भासलेंनी आपल्या साम्राज्यात विलीन केला. इ.स. 1751 साली भोसलेंनी गोंड राजा निलकंठ शहावर चंद्रपूरच्या किल्ल्यावर आक्रमण करून गोंड साम्राज्याचा पराभव केला. व मराठा साम्राज्याची भगवी पताका रोवली.

इंग्रजांच्या विरोधातील बंडात उमरेडचाही सहभाग
दरम्यान इ.स. 1817 साली इंग्रज मराठ्यांमध्ये झालेल्या नागपूर येथील युद्धात अप्पासाहेब भोसले यांचा पराभव झाला. या पराभवानंतर इंग्रजांनी अप्पासाहेबांना कैद करून ठेवले होते. त्यानंतर विदर्भात इंग्रजांविरुध्द बंड भडकला होता. या बंडात उमरेड शहराचाही समावेश होता. नागपूरचे सुपरीटेंडेंट रिचर्ड जेकीन्सने उमरेड किल्ल्यावर फौज रवाना केली होती. याच दरम्यान मरोठे व इंग्रजांमध्ये युध्द झाले. याच युद्धाच्या आठवणी किल्ल्याच्या भिंती आजही मिरवित आहेत.


ऐतिहासि पर्यटनास्थळ बनण्याची वाट
सुमारे सहा शतके पाहिलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याचे पर्यटनस्थळात रूपांतर व्हावेत अशी वाट आहे. तसे पाहता किल्ला परिसरात असलेल्या तलावाला गांधी सागर म्हणून नव्याने ओळख दिली गेली. शिवाय तलावाच्या काठावरच पुन्हा एका उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. तर शेजारीच खवैय्यासांठी खाऊ गल्लीची उभारणीही करण्यात आली. या खाऊ गल्लीत उमरेड सावजीचा तडका मिळाला नाही तर नवलच. शिवाय काही दिवसांपूर्वी तलावात नौकानयन सुरू करण्यात आली होती. नौकानयनासह रंगीत प्रकाशयोजना व पाण्याचे फवारेही सुरू करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे परिसराच्या संपूर्ण सौंदर्यीकरणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. याच दुर्लक्षितपणामुळे किल्ल्याच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यांवर मोठमोठे वृक्ष उभे झाले आहे. शाळेजवळील भिंतीवरील वटवृक्ष कोसळले असून भिंत उद्ध्वस्त झाली.आज किल्ल्याचे अस्तीत्व नामशेष होण्याच्या मार्गावर असताना या ऐतिहासिक धरोहर असलेल्या किल्ल्याची अभेद्यता कायम राखणे अत्यंत आवश्यक आहे.