पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचा इतिहास आणि यंदा कोरोनामुळे बदलेले स्वरूप

पुणे : १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती गणरायाचे आगामन झाले असून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचे संकट साऱ्या जगावर घोंघावत आहे मात्र तरीसुद्धा आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत गणेशभक्तांनी तितक्याच उत्साहात केले. ज्या पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी सुरु केली होती त्या पुण्यात प्रत्येक वर्षी लाखो भाविकभक्त हे आकर्षक देखावे व दिमाखदार गणेशोत्सव आगमन व विसर्जन सोहळा पाहण्यास येत असतात. परंतु यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव पुणेकरांना कोरोनामुळे काळजीपूर्वक साजरा करावा लागत आहे. पुण्यातल्या पाच मानाच्या गणपतींनी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळून भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी खास ऑनलाईन दर्शन, आरती, तसेच इतर धार्मिक विधी ऑनलाइन पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर जाणून घेऊयात मानाच्या पाच गणपतींचा इतिहास आणि यावर्षी त्यांनी केलेली तयारी….

श्री कसबा गणपती – मानाचा पहिला गणपती

पुण्याचे ग्रामदैवत म्हणून कसबा पेठेतील कसबा गणपती प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्यानंतर ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला अग्रस्थान दिले. मानाचा पहिला गणपती असलेले हे मंडळ दरवर्षी पारपंरिक पद्धतीने आणि अतिशय साधेपणाने उत्सव साजरे करतात. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायिका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासूनच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो.

 

यावर्षी कोरोनामुळे बदलेले स्वरूप : पुण्याचे वैभव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव करोना विषाणूचा धोका पाहता यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय या मंडळाने घेतला असून लोकांनी गणपतीच्या दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. १२८ वर्षेच्या परंपरतेत अस पहिल्यांदा घडले आहे की मंडळाच्या पदाधिकारांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच यंदा मंडळाने भाविकांना कसबा गणपतीच्या १२१ प्रतिकृती दिल्या.


श्री तांबडी जोगेश्वरी गणपती – मानाचा दुसरा गणपती

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती. तांबडी जोगेश्वरी हे पुण्याचे ग्राम दैवत आहे. हे मंदिर पुण्यातील पुरातन मंदिर असून या मंदिरातील देवीची मुर्ती स्वंयभू आहे. या मुर्तीचे वैशिष्टय म्हणजे दरवर्षी या मुर्तीचे विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी पुन्हा नव्याने स्थापना करण्यात येते. पितळी देव्हाऱ्यात या गणपतीची स्थापना केली जाते. येथे चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात.

 

यावर्षी कोरोनामुळे बदलेले स्वरूप : यंदा कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्राणप्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पुण्यातील मानाच्या पाच गणपती मंडळांनी गणपती हे मंडपातच विराजमान करण्याची भूमिका घेतली असून हा मंडप १० बाय १५ फुटांचा आहे. तर, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे देखील या मंडळांनी सांगितले आहे


श्री गुरुजी तालीम गणपती – मानाचा तिसरा गणपती

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीच म्हणजे १८८७ ला सुरुवात झाली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही.

यावर्षी कोरोनामुळे बदलेले स्वरूप : श्री गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या शुभहस्ते करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन दर्शन, ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांतून पुढील दहा दिवस गणपती मंडळांतर्फे हा उत्सव आरोग्योत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.

श्री तुळशीबाग गणपती – मानाचा चौथा गणपती

पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली. या मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.

यावर्षी कोरोनामुळे बदलेले स्वरूप : यावर्षी कोरोनाचं सावट असलं तरी यंदाही या बाप्पाची सुरेख आरास केली आहे.श्री तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या वंशजातील केसरी वाडा गणपतीचे डॉ. दीपक टिळक यांच्या शुभहस्ते करण्यात आली. कोरोनामुळे श्रींचे प्रत्यक्ष दर्शन भाविकांना शक्य होणार नसले तरी त्यांच्यासाठी ऑनलाइन दर्शनाची खास व्यवस्था केसरी गणेशोत्सवाने केली आहे. गणेशोत्सवात दरवर्षी होणारा पानसुपारी समारंभ रद्द करण्यात आला आहे.

श्री केसरी गणपती – मानाचा पाचवा गणपती

पुण्यातला पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.

यावर्षी कोरोनामुळे बदलेले स्वरूप : केसरी वाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना व आरती तुळशीबाग मंडळाच्या पदाधिका-यांच्या शुभहस्ते करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाचा केसरी गणेशोत्सव यावर्षी अतिशय साधेपणाने साजरा केला जाणार असून भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी केसरी गणेशाच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था केली आहे. सध्याच्या संकटाच्या काळात अनेक रक्त पेढ्यांना रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. हे लक्षात घेऊन गणेशोत्सवात रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहेत. सामाजिक अंतर पाळून आणि व्यक्तिगत सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेऊन महिलांसाठी केसरीवाड्यात पाककृती स्पर्धा होतील, अशी माहिती केसरी गणेशोत्सवाच्या संयोजिका डॉ. गीताली टिळक यांनी दिली. वेदमूर्ती परशुराम परांजपे आणि त्यांच्या सहकार्यांयकडून होणारा गणेश याग हे यंदाच्या केसरी गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.