Importance Of Student Mental Health

अभ्यासाचा ताण, करीअरचं टेन्शन, परीक्षेतील गुणांची रस्सीखेच, पालकांच्या अपेक्षा आणि खूप काही! अशा वेगवेगळ्या ताण-तणावांची ओझी वाहणाऱ्या विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्याचं महत्त्व आता कुठे पटू लागलं आहे. याचं ठळक उदाहरण म्हणजे आयआयटी, मुंबईच्या विद्यार्थी कल्याण केंद्राने (SWC) नुकतीच जाहीर केलेली आकडेवारी! ही आकडेवारी सांगते की, समुपदेशन सेवांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. याचाच अर्थ तणावग्रस्त होण्यापेक्षा तणावमुक्त होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आली असून ते स्वतःहून यासाठी पुढाकार घेत आहेत. ही तर नक्कीच चांगली सुरुवात आहे(The importance of student mental health is now being realized).

    अभ्यासाचा ताण, करीअरचं टेन्शन, परीक्षेतील गुणांची रस्सीखेच, पालकांच्या अपेक्षा आणि खूप काही! अशा वेगवेगळ्या ताण-तणावांची ओझी वाहणाऱ्या विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्याचं महत्त्व आता कुठे पटू लागलं आहे. याचं ठळक उदाहरण म्हणजे आयआयटी, मुंबईच्या विद्यार्थी कल्याण केंद्राने (SWC) नुकतीच जाहीर केलेली आकडेवारी! ही आकडेवारी सांगते की, समुपदेशन सेवांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. याचाच अर्थ तणावग्रस्त होण्यापेक्षा तणावमुक्त होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आली असून ते स्वतःहून यासाठी पुढाकार घेत आहेत. ही तर नक्कीच चांगली सुरुवात आहे(The importance of student mental health is now being realized).

    इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,मुंबई येथे समुपदेशन सेवांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात वाढली असून मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत ती दुप्पट झाली. संस्थेच्या विद्यार्थी कल्याण केंद्राने ही आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. मात्र याचा अर्थ, तणावग्रस्त किंवा निराशेच्या छायेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि म्हणून ते समुपदेशनाकडे वळले असा अर्थ नसून, तणावाने त्रस्त होण्यापेक्षा त्याचं व्यवस्थापन कसं करावं किंवा तणावमुक्त कसं राहावं याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थी पुढे येत आहेत. ताण-तणावाविषयी मोकळेपणानं बोलत आहेत, असा त्याचा अर्थ आहे. मानसिक आरोग्याचं महत्त्व त्यांना कळलं असून गेल्या दोन वर्षांमध्ये या विषयाबद्दल जागरूकता वाढली आहे, याचा देखील हा परिणाम आहे. विद्यार्थी समुपदेशन सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत ही नक्कीच सकारात्मक बाब आहे.

    याबाबत जागरूकता फार महत्त्वाची असून आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होवूच नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सुजाणपणा विद्यार्थ्यांमध्ये दिसू लागला आहे. आयआयटी मुंबईने हा एक आदर्श घालून दिला असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत इतर शैक्षणिक संस्थांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थेत ‘विद्यार्थी कल्याण केंद्र’ सुरू करायला हवीत, जिथे त्यांना मानसिक ताण-तणाव दूर करण्याचे मंत्र आणि तंत्र शिकता येईल आणि विद्यार्थ्यांना तिथल्या तिथे मदत मिळेल.

    आयआयटीची प्रत्यक्ष आकडेवारी सांगायची झाली तर, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ३१० विद्यार्थ्यांनी समुपदेशनाचा लाभ घेतला होता, तर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात ही संख्या ६२६ वर पोहोचली. त्यापैकी सर्वाधिक २१० विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांचे आहेत तर पीएच.डी.चे विद्यार्थी २०३ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विद्यार्थी कल्याण केंद्राच्या म्हणण्यानुसार, समुपदेशनाचा लाभ घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली वाढ कोविड महामारीच्या काळात मानसिक आरोग्याबाबत आलेली जागरूकता दर्शवते.

    मानसिक आधारासाठी जिथे मंच उपलब्ध आहे तिथे जाऊन आपण मदत किंवा मार्गदर्शन मिळवू शकतो हे आता विद्यार्थ्यांना चांगले माहित झाले आहे. पूर्वी याबाबत देखील माहिती नसायची; त्यामुळे तणावात असलेले विद्यार्थी अधिकच गोंधळून जायचे. मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत असलेले गैरसमज लोप पावत चालले आहेत आणि शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचे संतुलनही महत्त्वाचं आहे हा विचार रुजतो आहे.

    आयआयटी, मुंबई येथील प्राध्यापक तपनेंदू कुंडू यांनी सुद्धा या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणतात, “समुपदेशनाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली म्हणजे ताण-तणावाची प्रकरणं वाढली असा अर्थ कृपया कोणी काढू नये. लोकांमध्ये वाढलेल्या जागरूकतेचा हा परिणाम आहे. भूतकाळातही अशी प्रकरणं असायची पण आता अधिक विद्यार्थी मदतीसाठी केंद्रापर्यंत पोहोचत आहेत, हे चांगलं लक्षण आहे.”

    मानसिक आरोग्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये सर्वदूर जागरूकता पसरवण्यासाठी विद्यार्थी कल्याण केंद्राने घेतलेल्या पुढाकारांचा उल्लेख करताना प्राध्यापक कुंडू म्हणाले, “साथीच्या रोगाच्या काळात जेव्हा विद्यार्थी घरी होते, कॅम्पसपासून दूर होते, तेव्हा अनेकांनी या केंद्राची मदत घेतली आणि ते निर्धास्त झाले. याव्यतिरिक्त, एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यानेआम्ही या सुविधांचा विस्तार केला, त्याचाही फायदाच झाला.”

    कॅम्पसमध्ये वैयक्तिकरित्या समुपदेशन तर केलं जातंच पण त्या व्यतिरिक्त २४/७ ऑनलाइन समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आलंय. मानसिक आरोग्याविषयी चुकीची माहिती, अंधश्रद्धा, भीती किंवा गैरसमज मनात बाळगून असलेले विद्यार्थी काही वेळेस पटकन पुढे येत नाहीत. अशांसाठी संस्थेने माहितीचं व्यासपीठ देखील तयार केलं आहे, जेणेकरून गैरसमज किंवा अफवांना थारा मिळू नये.

    आजमितीला सुमारे ४८ टक्के विद्यार्थ्यांना भावनिक समस्यांचा सामना करावा लागतो, असं निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञ नोंदवतात. त्यापैकी सुमारे २० टक्के विद्यार्थ्यांना शैक्षणिक चिंता असतात, ज्याचा त्यांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम होतो आणि परिणामी त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर देखील परिणाम होतो. मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, हेच दुष्टचक्र आहे, जे भेदायला हवं. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या भावनिक किंवा शैक्षणिक चिंतेचं कोणतंही एक विशिष्ट कारण सांगता येत नाही. अनेक गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात, अशावेळी संवाद महत्त्वाचा आहे. तणावावर विद्यार्थ्यांना बोलतं करणं आवश्यक असतं आणि ते काम अशा केंद्रांमध्ये केलं जातं. बहुतांशी प्रकरणांमध्ये दोन-तीन वेळा नुसतं त्यांच्याशी बोललं तरी समस्येचं निराकरण होतं, असं समुपदेशिका रागिणी राव सांगतात.

    विद्यार्थी कल्याण केंद्राच्या प्रमुख प्राध्यापिका हिमा म्हणतात की, “या समस्यांचं एक वर्तुळ असतं आणि विद्यार्थी त्यात गोल-गोल फिरत राहतात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी शैक्षणिक वर्षात मागे पडू शकतो ज्यामुळे भावनिक दृष्ट्या खचतात. खचल्यामुळे पुन्हा विलंब होऊ शकतो परिणामी शिक्षणात अंतर पडत जातं किंवा याउलट, पूर्वी दुर्लक्ष केलेल्या, उपचार न केलेल्या भावनिक-मानसिक समस्या काहींना असतात, ज्या शिक्षणातील अडथळ्यांमुळे वाढतात आणि मग ती व्यक्ती निराश होऊ लागते. म्हणून अशी केंद्र असणं गरजेचं आहे जिथे विद्यार्थ्यांना लगेच पुढचा मार्ग सापडेल आणि त्या दुष्टचक्रात ते अडकणार नाहीत.” शैक्षणिक, भावनिक आणि इतर ताण-तणावांचा पाठपुरावा करण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन भिन्न असतो. मात्र प्रारंभिक टप्प्यावर त्यांना समर्थन अथवा मदत मिळणं महत्त्वाचं आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव हाताळण्याची प्रक्रिया सुलभ होते आणि त्यांच्या जीवाला धोका उद्भवत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

    मदतीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १०० टक्के वाढ झाली असताना, यशस्वीरित्या बंद झालेल्या प्रकरणांमध्येही वाढ झाली असल्याचं आयआयटी, मुंबई संस्थेनं म्हटलं आहे. हेही निश्चितच चांगलं चिन्ह आहे. याचाच अर्थ विद्यार्थी तणावातून पूर्णतः बाहेर आले असून मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि सशक्त होत आहेत असाही होतो. यशस्वीरीत्या बंद झालेल्या प्रकरणांपैकी अनेक प्रकरणं ही अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच समस्येचं निराकरण झालं अशातली होती.

    विद्यार्थी मार्गदर्शक, विभागातील प्राध्यापक, मानसोपचारतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचं कुटुंब अशा समुदायाच्या मदतीने काही प्रकरणं यशस्वीपणे हाताळण्यात आली तर काही मोजक्या प्रकरणांमध्ये पुढच्या उपचारांची गरज भासली. मात्र उपचार केल्याने समस्या दूर होण्यास वेळीच मदत झाली.विद्यार्थ्यांमधील ताण-तणावाची प्रकरणं हाताळताना संबंधित व्यक्तींना लवकरात लवकर हस्तक्षेप करता यावा यासाठी कल्याण केंद्राने विशेष प्रयत्न केले होते.

    विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज आहे का हे तपासण्यासाठी ६०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत समुपदेशक पोहोचले. संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये आशावादाची भावना वाढवण्यासाठी आभासी मानसिक आरोग्य सप्ताह देखील साजरा करण्यात आला होता. असे उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात आणि शाळांमध्ये सुद्धा राबवता येतील. आयआयटी, मुंबई संस्थेने तर विद्यार्थ्यांशी व्यापकपणे संपर्क साधण्यासाठी युट्यूब चॅनेलदेखील सुरू केलं होतं.

    विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा एवढा विचार यापूर्वी क्वचितच झाला असेल. आयआयटी, मुंबई संस्थेने आता या मार्गावर आपला आदर्श ठेवला असून इतरांसाठी हा आदर्श नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आता इतर शैक्षणिक संस्थानीही असा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, ती नक्कीच एक चांगली सुरुवात असेल!

    — मनीषा नित्सुरे-जोशी

    manisha.nitsure@gmail.com