सिनेरंग : युद्धपट ‘बॉर्डर’ पंचवीशीचा!

‘बॉर्डर’ च्या प्रदर्शनास १२ जूनला यशस्वी पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. पंचवीस वर्षानंतरही या चित्रपटाचा प्रभाव कायम आहे हे विशेष कौतुकाचे आहे. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर मेट्रो होते आणि येथे खणखणीत रौप्य महोत्सवी यश संपादले. त्यामुळे दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे काहीही नसते. त्यामुळे तर या चित्रपटाचे यश पंचवीस वर्षानंतरही ताजेच आहे.

    आपल्या देशात हॉलीवूडच्या दर्जाचे अस्सल थरारक युध्दपट निर्माण होत नाहीत, असे म्हणणारा एक वर्ग आपल्या देशात आहे. पण असे असले तरी आपल्याकडे निर्माण झालेल्या काही युध्दपटानी समाजावर विशेष प्रभाव पाडला, चित्रपट रसिकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला असे दिसते. आणि तेच तर महत्वाचे असते. यशासह सामाजिक प्रभाव ही एक वेगळी गोष्ट आहे.
    चेतन आनंद दिग्दर्शित ‘हकीकत’ (१९६४) हा सर्वकालीन उत्तम युध्दपट आहे. भारत आणि चीन यांच्यात १९६२ साली झालेल्या युद्धाच्या पाश्वभूमीवरील या चित्रपटात युध्दाभूमीवरील समर प्रसंग, कधी घरची येणारी आठवण, कुटुंबाकडूनच्या पत्राची आठवण, तर कधी शत्रूच्या सैनिकाचा केलेला खातमा आणि त्याचा आनंद तर कधी दुर्दैवाने आपल्या एकाद्या सहकारी जवानाला आलेले वीरमरण आणि तेव्हाचे दुःख अशा अनेक गोष्टी कृष्ण धवल अर्थात ब्लॅक ॲण्ड व्हाईट स्वरुपात प्रभावीपणे साकारल्या होत्या. बलराज साहनी, विजय आनंद, धर्मेंद्र, प्रिया राजवंश, संजय खान, शेख मुख्तार, जयंत वगैरे कलाकारांच्या भूमिका चित्रपटाची आणखी एक महत्त्वाची बाजू. तर कैफी आझमी यांच्या गीताना मदन मोहनचे संगीत ही एक मोठी जमेची बाजू. होके मजबूर मुझे, मै ये सोचकर उसके घर से चला था, जरासी आहट होती है, मस्ती मे छेड के तराने तेरे प्यार का, अब तुम्हारे हवाले वतन साथीओ ही गाणी आजही हिट आहेत. प्रत्येक राष्ट्रीय सणाला अब तुम्हारे हवाले वतन साथीओ हे गाणे रेडिओपासून लाऊडस्पीकरपर्यंत हमखास असतेच.

    जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ (१९९७) हाही असाच एक माईलस्टोन युद्धपट आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ (२०१८) हा आजच्या मल्टीप्लेक्स युगातील लक्षवेधक आणि प्रभावी असा युध्दपट आहे. यात विकी कौशल, यामी गौतमी, कीर्ती कुलहारी, परेश रावल इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटांचा खास उल्लेख करायला हवा. याशिवाय अनेक युद्धपट पडद्यावर आले, येत आहेत. रामानंद सागर दिग्दर्शित ‘ललकार’ (१९७२), चेतन आनंद दिग्दर्शित ‘हिन्दुस्तान की कसम ’ (१९७३) अशी अनेक नावे घेता येतील.

    यातील ‘बॉर्डर’ (रिलीजची तारीख १२ जून १९९७) च्या प्रदर्शनास यशस्वी पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. पंचवीस वर्षानंतरही या चित्रपटाचा प्रभाव कायम आहे हे विशेष कौतुकाचे आहे. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर मेट्रो होते आणि येथे खणखणीत रौप्य महोत्सवी यश संपादले. त्यामुळे दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे काहीही नसते. म्हणून तर या चित्रपटाचे यश पंचवीस वर्षानंतरही ताजेच आहे.

    खरंतर दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी ‘गुलामी’ (१९८५) पासून चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले तेव्हा उत्तर प्रदेश (विशेषतः आग्रा, फतेहफूर सिकरी येथील आऊटडोअर्सचा भाग), राजस्थान (विशेषतः बिकानेर, जोधपूर वगैरे भागातील वाळवंटी प्रदेश) यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. गमतीत असे म्हटले जाई की जे. पी. दत्ता अगोदर लोकेशन्स ठरवतो आणि मग मध्यवर्ती कथासूत्र ठरवून मग पटकथा संवाद लिहून घेतो. ‘गुलामी’च्या खणखणीत यशानंतर त्याने एकामागोमाग एक अशा ‘यतिम’, ‘हत्यार’ आणि ‘बटवारा’ या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन हाती घेतले आणि एकेका चित्रपटासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान येथे दीर्घकालीन शूटिंग सत्रांचा डेरा टाकला. योगायोगाने हे तीनही चित्रपट १९८९ या एकाच वर्षी प्रदर्शित झाले आणि तीनही चित्रपटांना रसिकांनी नाकारले. अपयशाची हॅटट्रीक करणारा जे. पी. दत्ता आता काय बरे करणार असा प्रश्नच होता. अशातच एक दिवशी हाती आमंत्रण आले की, जे. पी. दत्ता दिग्दर्शित आणि ए. के. नाडियादवाला निर्मित ‘बन्दुआ’ या चित्रपटाचा नटराज स्टुडिओत मुहूर्त! आणि त्यावर फक्त प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन इतकेच होते. तोपर्यंत अमिताभने आम्हा सिनेपत्रकारांवरचा बॅन उठवला नव्हता त्यामुळे त्याची भूमिका असलेल्या अशा अनेक चित्रपटांच्या मुहूर्ताना आम्ही सिनेपत्रकार आवर्जून हजर राहत असू. या ‘बन्दुआ’चा मुहूर्त आजही आठवतोय. प्रचंड गर्दीत धर्मेंद्रने मुहूर्त क्लॅप दिला आणि वहिदा रहेमानची खास उपस्थिती होती. हा चित्रपट त्या मुहूर्तालाच बंद पडला.

    जे. पी. दत्ता सहजी हार मानणारा नव्हता. महत्वाचे म्हणजे त्याच्या अतिशय शिस्तबद्ध दिग्दर्शनाखाली भूमिका साकारण्यास अनेक स्टार तयार होते. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘क्षत्रिय’ (१९९३) ला चांगले यश लाभले आणि एक प्रकारे जे. पी. दत्ताचा कमबॅक झाला. खरंतर गुणवत्ता कायम असते, फॉर्म टेम्पररी असतो. चित्रपटाचे यशापयश प्रेक्षकांच्या हाती असले तरी खुद्द चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकाची क्षमता, त्याला दृश्य माध्यमाची असलेली जाण आणि कलाकारांकडून काम करुन घेण्याची पध्दत या गोष्टी चित्रपटसृष्टीला ज्ञात असतात. हे सगळे चित्रपटाच्या यशापयशाच्या पलीकडे जात असतात. ‘क्षत्रिय’च्या यशानंतरचा जे. पी. दत्ताचा चित्रपट कोणता असेल याची उत्सुकता वाढली. हे एका गुणवान दिग्दर्शकाचे यश आहे.

    जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ची घोषणा झाली तेव्हा एका गोष्टीची खात्री होती, आपल्या प्रत्येक चित्रपटावर अधिकाधिक मेहनत घेणारा हा दिग्दर्शक यावेळीही आपल्या थीमला अधिकाधिक प्रमाणात न्याय देईल.

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९७१ साली झालेल्या युद्धावर आधारित चित्रपट. या युद्धातील लोंगोवाल करार, भारतीय सैन्याचा विजय, जवानांना येत असलेली घरची आठवण, पत्रातून मनमोकळेपणाने भावना व्यक्त करण्याचं माध्यम, युद्ध भुमीवरचे वातावरण याभोवती हा चित्रपट आहे. जे. पी. दत्ताने एकूणच या संदर्भात भरपूर माहिती मिळवली. त्या युद्धाशी संबंधित हयात असलेल्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ही एक मोठी प्रक्रिया असते. प्रत्यक्ष घटनेवर आधारित चित्रपट असल्याने तर अधिकाधिक योग्य ती माहिती, तपशील, संदर्भ मिळवणे आवश्यक होते. अशा कलाकृतीत पूर्णपणे झोकून दिल्याशिवाय हे शक्य नसते. पूर्ण फोकस ठेवावाच लागतो. पटकथेवर १९९५ च्या सप्टेंबरमध्ये काम सुरु केले आणि ते १९९६ च्या एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे सात महिने चालले. हे सगळे होत असताना चित्रपटासाठी तंत्रज्ञ आणि कलाकारांची निवड याची प्रक्रिया सुरु होते. महत्वाचे होते ते कला दिग्दर्शन आणि छायाचित्रणकार. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण राजस्थानातील बिकानेर आणि जोधपूर येथे करायचे होते. कला दिग्दर्शन रत्नाकर फडके यांचे तर छायाचित्रण ईश्वर बिरदी आणि निर्मल जानी यांचे आहे. या सगळ्यात भले मोठे युनिट. असा खूपच मोठा पसारा असतो. त्यासाठी टीम चांगली लागते. हे सगळे होत असताना भारतीय लष्कर आणि हवाई दल यांच्याकडून बरीच मदत झाली. थीमनुसार अनेक तपशील, गोष्टी, संदर्भ तर मिळालेच. पण युद्धातील वाहने, रायफल, मशीनगन, गणवेश यांची बरीच माहिती मिळाली. १९७१ च्या युद्धावर आता पंचवीस वर्षानंतर चित्रपट आकार घेत होता.

    त्याबरोबरच तेव्हाच्या युध्दातील सामुग्रीची माहिती महत्वाची होती. भारतीय लष्कराने पाकिस्तानी टाईप – 59 सारख्या टी.55 टाक्या, ब्रेन मशीनगन, एसएलआर सारखी शस्रे, हॉकर हॅटर्स, मिग-21 याची माहिती दिली आणि मग त्यानुसार बरीच तयारी करावी लागली. इतका मोठा युद्धपट सहजी आकाराला येत नाही हेच खरे. त्यात पुन्हा अनेक कलाकारांची निवड करताना कोण कसे उपलब्ध आहे, कोणी होकार अथवा नकार देतेय हे सगळे होत होत चित्रीकरण सुरु झाले. त्यानंतर मात्र कामाने वेग घेतला. एक दर्जेदार चित्रपट घडत गेला. त्यामागचा खूप मोठा प्रवास पुढे चालत आला.

    चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला असताना सर्वप्रथम गाजले ते जावेद अख्तर लिखित आणि अन्नू मलिकने स्वरबद्ध केलेल्या ‘संदेसे आते है, हमे ले जाते है’ हे गाणे. आजही हे गाणे लोकप्रिय आहे. युद्ध सीमेवरील जवान आणि त्यांचे दूरवर राहत असलेले कुटुंबीय यांच्यातील संपर्काचे महत्वाचे माध्यम म्हणजे पत्र. हे एकमेकांची ख्याली खुशाली विचारणारे आणि कळवणारे पत्र म्हणजे कमालीची भावनिक ओढ. उत्कट नाते. मनमोकळ्या होत असलेल्या भावना.

    ‘बॉर्डर’च्या पूर्णतेची आणि कॅसेट रिलीजची जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील जंगी पार्टी मला आजही आठवत आहे. एक अतिशय भव्य युद्धपट येतो आहे हे यावेळी याची गाणी पाहताना (त्या काळात नवीन चित्रपटाची अशी गाणी दाखवण्याची प्रथा होती.)

    या चित्रपटात सनी देओल (मेजर कुलदीपसिंह चांदपुरी), जॅकी श्राॅफ (विग कमांडर एंडी बजवा), सुनील शेट्टी ( कॅप्टन शेखावत), अक्षय खन्ना (सेकंड लेफलन्ट धरमवीर) यांच्यासह राखी गुलजार, तब्बू, पूजा भट्ट, कुलभूषण खरबंदा, सुदेश बेरी, पुनीत इस्सार, राजीव गोस्वामी, अमृत पाल इत्यादींच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण इश्वर बिदरी आणि निर्मल जानी यांचे आहे तर संकलन दीपक विरकूड यांचे आहे. या चित्रपटातील ‘मेरे दुश्मन मेरे भाई’, ‘हमने जबसे मुहब्बत’ इत्यादी गाणीही लोकप्रिय आहेत. लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतील चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही हिट असतोच. आजही या चित्रपटाचा सामाजिक प्रभाव कायम आहे हे विशेषच आहे. या चित्रपटाला वीस वर्षे पूर्ण झाली तेव्हा एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मी तेव्हा त्या सोहळ्याचा अनुभव घेतला असता चित्रपटाशी संबंधित सगळेच जुन्या आठवणीत रमल्याचे आणि थोडेसे भावूकही झाल्याचे जाणवले. एकाद्या कलाकृतीशी असे जोडलेले असणे या ग्लॅमरस क्षेत्रातील एक प्रकारचे माणूसपण आहे.

    ‘बॉर्डर’नंतरच्या दिग्दर्शक जे. पी. दत्ताच्या चित्रपटातील ‘एलओसी कारगील’(२००३) आणि ‘पलटण ’(२०१८) या युद्धपटांवर प्रचंड मेहनत घेतली, खूप खर्च केला. पण त्यांना ‘बॉर्डर’ची उंची गाठता आली नाही…
    ‘बॉर्डर’ हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक प्रभावी युद्धपट आहे. पंचवीस वर्षानंतरही त्याचा प्रभाव कायम आहे….

    दिलीप ठाकूर

    glam.thakurdilip@gmail.com