वैजागचे ‘ऋषिकोंडा’

आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणमच्या विशाल समुद्र किनार्‍याच्या एका कोपर्‍यात वसलेला आणि १५-२० किलोमीटरवर असलेला ऋषिकोंडा हा स्वच्छ, नीटनेटका निसर्गरम्य आणि सुंदर 'बीच'. दूरवर पसरलेला ‘वैजाग’चा हा विलोभनीय वाळूचा किनारा. उंच उंच असलेली मनाला भुरळ घालणारी नारळाची झाडे आणि पर्यटकांनी लुटलेला आनंद याला तोड नाही.

  ऋषिकोंडाचा हा समुद्र किनारा म्हणजे विलोभनीय ठिकाणच. सुवर्ण वाळू आणि हळुवार समुद्रलाटांनी हा समुद्र किनारा पर्यटकांना कमालीचा आकर्षित करतो. अनेक प्रकारचे समुद्री जीव आणि दुर्मिळ वनस्पती येथे आढळतात. अनेक समुद्री खेळ, वॉटर गेम्स, सुंदर कॉटेजेस, विंड सर्फिंग, स्कीइंग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निसर्गरम्य असल्यामुळेच दक्षिण भारताच्या दिग्दर्शकांना आवडणारे फिल्मी शुटिंगचे आवडते ठिकाण म्हणजे सुरेख समुद्री किनार्‍यावरचे ऋषिकोंडा. ऋषिकोंडाचा अर्थ आहे ‘ऋषींचा पहाड’. समुद्रातटावरच्या या पहाडावर सात ऋषींनी शिवमंदिराची स्थापना करून त्याला ‘सप्तस्वरलयम’ हे नाव दिल्याने या पहाडाला ‘ऋषिकोंडा’ म्हणतात.

  उच्च दर्जाच्या प्रतिभाशाली कलावंतांनी काही विशिष्ट गोष्टी प्राणपणाने जपलेल्या असतात. त्या गोष्टींमध्ये त्यांचा जीव की प्राण असतो आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांचा श्वास त्यात कायमच अडकून असतो. दक्षिण भारताच्या चित्रपट सृष्टीतील व आंध्र प्रदेशातली अशीच प्रतिभा संपन्न व्यक्ति म्हणजे बहुभाषिक चित्रपटांचा निर्माता, दादासाहेब फाळके पुरस्काराने आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरविलेला कलावंत- दिग्दर्शक म्हणजे ‘रामा नायडू’. तेलगू देसम पक्षाचे माजी खासदार तथा तेलगू अभिनेता, निर्माता दग्गुबाटी रामा नायडू. समुद्राला लागून असलेल्या उंच पहाडावर वसविलेल्या ‘रामा नायडू’ या फिल्मी स्टूडियोचे जनक. साठवर्षापासून चित्रपट सृष्टीत वास्तव्य असलेले अद्भुत व्यक्तिमत्व.

  प्रत्यक्षात मर्यादित जागेत पडद्यावर अत्यंत मोठे दिसणारे विकसित केलेले शहर म्हणजे रामा नायडू चित्रनगरी – स्टुडिओ. या मोठ्या शहराची निर्मिती प्रत्यक्षात किती लहानशा मर्यादित जागेत आहे हे येथे प्रत्यक्ष भेट दिल्यावर कळते आणि पर्यटकसुद्धा या शहराचा एक भाग कधी बनतात हे कळतच नाही. पहाड कापून चित्रीकरणाकरिता यथे लहानसा वळणदार नॅशनल हायवे तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला ही चित्रनगरी हैदराबाद येथे होती. पण भरपूर नैसर्गिक सृष्टीसौंदर्य हवे असल्याने १८ ऑगस्ट २००८ पासून विशाखापट्टणमच्या या ऋषिकोंडा या पहाडावर ही चित्रनगरी वसविण्यात आली आणि दक्षिण भारतातल्या कलावंतांचे स्वप्न पूर्ण झाले. पहाडावरच्या या मर्यादित जागेत असलेल्या कृत्रिम शहरात रस्ते, गल्ल्या, बायपास रोड, मार्केट, पोलिस स्टेशन, कस्टडी, तलाव, हिल स्टेशन, मंदिर, वेगवेगळ्या आकाराच्या इमारती, व्हरांडा असलेले पारंपरिक कौलारू घर- गॅलरी, जुन्या काळातले छत, टेबल- खुर्च्या बंगले, बगीचे, टी-पॉइंट, मेन रोड, बसेस, बागेतल्या मूर्ती, हिल स्टेशन, लहानलहान लोकेशन्स आणि दोन्ही बाजूला उंच झाडे असलेल्या नागमोडी राष्ट्रीय महामार्गाचीसुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे. येथे चित्रीकरणाचे अनेक नैसर्गिक लोकेशन्स बघायला मिळतात. सोबतीला प्रत्यक्षात  विशाल समुद्र दर्शन आहेच. हे सर्व बघणे म्हणजे स्वप्नात जगण्यासारखे आहे.

  दूरवर बघितले तर एक विशाल आणि श्रीमंत तीन मजली, एकत्रित तीन भागात विभागलेला कौलारू रंगीत बंगला दिसतो. जो प्रामुख्याने लाल आकर्षक रंगाचा आहे. आपण अनेकदा या भव्य बंगल्यात घडलेल्या घटना आणि हा बंगला अनेक चित्रपटात बघितलेले आहे. अनेक जुन्या चित्रपटात हा बंगला हमखास बघायला मिळतो. चित्रपटाल्या अतिश्रीमंतांच्या कुटुंबाच्या राहणीमानाचे चित्रीकरण या बंगल्यात झालेले आहे. एक गर्भश्रीमंतीची एक ‘रौनक’ या बंगल्याने कधी काळी अनुभवलेली होती. प्रसिद्ध नायक- नायिकांच्या  गाजलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झालेले आहे. येथील चित्र प्रदर्शनात हे सर्व बघायला मिळते. असंख्य पुरस्कारांचे प्रदर्शनसुद्धा आहे. पण आज या बंगल्याची लया पूर्णपणे गेलेली आहे. इमारतीचा रंग उधडलेला आहे. भितींना जागोजागी भेगा पडलेल्या दिसतात. तीनही मजल्यावर प्रवेश मिळत नाही. वरच्या मजल्यावर जाणे हे धोकादायक आहे. इमारतीच्या आत जाऊन जमिनीवरून या विदीर्ण झालेल्या बंगल्याचे निरीक्षण करता येते. याच इमारतीच्या आवारातल्या चित्र प्रदर्शनात दक्षिण भारतातल्या अनेक नायक, नायिका, अवॉर्ड, समारंभ, भेटी यांची अनेक छायाचित्रे बघायला मिळतात. पुढे गेल्यावर अजुन एक सुरेख चित्रपदर्शनी दिसते. येथे चित्रपटांचे मोठमोठे पोर्ट्रेट, विविध कॅमेरे, रिळे आणि चित्रपट चित्रीकरणाचे साहित्य बघायला मिळते आणि जुन्या स्मृति जागविल्या जातात. दक्षिणेतल्या बर्‍याच चित्रपटांचे शूटिंग येथे झालेले आहे इतका आकर्षक हा ‘सिनेटिक पॉइंट’ आहे. गत वैभवाची साक्ष असलेला हा परिसर आता भूतकाळ झालेला असून आता येथे फक्त लहान सहान मालिकांचे शूटिंग येथे होते. या ठिकाणी भारतातल्या भोजपुरी सोडून प्रमुख तेरा  भाषांमध्ये चित्रपट तयार झालेले  आहेत. यात ४० तेलगू, २० बंगाली, १५ ओडीशा, ५ हिन्दी, ४ तामील असे अनेक चित्रपट आहेत. थोडक्यात डी. रामानायडू हे  एक  बहुभाषिक चित्रपट निर्माते होते. एका व्यक्तीने दीडशेपेक्षा जास्त चित्रपट बनविले म्हणून गिनीज बुक रेकॉर्डमध्ये डी.रामा नायडू यांच्या नावाची नोंद झालेली आहे. ६ जून १९३६ चा जन्म असलेले भारतीय चित्रपटातले ते अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होते. सोबतच त्यांनी पंचवीसपेक्षा जास्त दिग्दर्शक निर्माण केले, ही त्यांची फार मोठी उपलब्धी आहे. तेलगू देसम या पक्षाचे जरी खासदार असले तरी राजकरणात त्यांना फारसा रस नसल्याने ते राजकारणापासून अलिप्तच होते. या प्रचंड कारभाराचा व्याप मोठा होता. त्यातच त्यांना कॅन्सर झाला आणि १७ फेब्रुवारी २०१५ ला त्यांचा हैदराबाद येथे मृत्यू झाला. आता हा संपूर्ण कारभार त्यांचा मोठा मुलगा सुरेश बघत असून त्यांची ‘सुरेश प्रॉडक्शन’ ही कंपनी आहे. येथे सुरेश प्रॉडक्शनच्या अनेक बसेस बघायला मिळतात. त्यांचा लहान मुलगा व्यंकटेश याने दक्षिण भारतात ‘हीरो’ स्वरुपात चांगलेच बस्तान बसविले असून १९९३ साली आलेल्या ‘अनाडी’ या हिंदी चित्रपटातला व्यंकटेश हा करिश्मा कपूरचा नायक होता. असा हा ऋषिकोंडा पहाडावरचा डी.रामा नायडू स्टुडिओ. सर्वसामान्यांना येथील प्रवेशदर कॅमेर्‍यासहित चाळीस रुपये असून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्टुडिओ सुरू असतो. व्यावसायिक चित्रीकरणाचा प्रवेश दर एक हजार रुपये आहे. अनेक जाहिरातीचे आणि लहान मालिकांचे अर्थात दक्षिण भारतीय भाषांचे शूटिंग सुरू असलेले दिसले. एका चित्रनगरीतल्या स्वप्नवत दुनियेच्या बाहेर आम्ही निघत होतो.

  सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना आमची गाडी नारळातल्या झाडांच्या पहाडाच्या रस्त्यावरून खाली उतरून विशाल समुद्राजवळून धावत होती. विजनवासात गेलेली रामा नायडू ही अज्ञात चित्रनगरी आता दूर जात होती. खूप काही मिळाल्याचे समाधान होते. दूरवर समुद्राकडे बघितले. सूर्यास्ताची तांबडी आभा आता समुद्रावर आणि ऋषिकोंडा पहाडावर पसरलेली होती.

  – श्रीकांत पवनीकर