हा अंधार फिटायला हवा

दिपोत्सव .. तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा हा सण. झाकोळलेल्या भाव - भावना आणि भवताली साचलेला अंधःकार दूर व्हावा, यासाठी सदिच्छेने पुढील मार्गक्रमण करण्याची ऊर्जा देणारा हा सण. आजचे राजकीय अराजक, तरुणांना पडलेला अंमली विळखा आणि एकूणच अस्वस्थतेचा हा अंधार दूर व्हावा, तो फिटावा आणि नव्याने मार्गक्रमण करण्यासाठी तेजाचा एक कवडसा यावा, यासाठी आपण प्रयत्न करायला नकोत का?

  अंगणात दिव्यांची आरस आणि घरात धान्याची रास म्हणजे दिवाळी, हा सरळ – सरळ अर्थ होता, तेव्हापासून अंधःकाराचा तिरस्कार केला गेला. नव्हे प्रकाशाचे पूजक म्हणून नव्हे पण जीवन व्यापून टाकणारा, पुढे जाण्याचा मार्ग खुंटवणारा, उगाचच चाचपडत ठेवणारा अंधःकार नकोसा म्हणून खरंतर प्रकाशाचं कौतुक किंवा त्याची पूजा. रावणाच्या श्रेष्ठत्वात लपलेला त्याचा अहंकार नको म्हणून मर्यादा पुरुषोत्तमाची आराधना. अंधार, काळोख यात लपलेले दुःख, दारिद्र दूऱ व्हावे आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा, यासाठीचा हा दिपोत्सव. प्रकाशोत्सव. प्रकाशाची पूजा करण्याची संस्कृती आपली पण सध्या अंधारात उधळण करण्याची जणू अहमहमिका लागलीय. आयुष्याची धुळधाण करायची हा चंगच तरुणांनी बांधला आहे की काय, असा संशय यावा, इतका इथे अंधार दाटू पाहतोय.
  गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्रातील ड्रग्जचा कारभार पाहता अंधःकाराची पाळेमुळे किती खोलवर रुजू पाहताहेत याचे भान येईल. तरुणांना लक्ष्य करून व्यसनांच्या जाळ्यात ओढणे आणि त्या माध्यमातून त्यांची प्रचंड आर्थिक लूट करण्यास त्यांच्या जीवाशी या ड्रग्ज माफीयांनी खेळ मांडला आहे. एखाद्या देशाशी युद्ध पुकारावे त्या पद्धतीने हे नव्या युगातील युद्ध पेटलेले दिसू लागले असतानाच खूप मोठ्या आव्हानांशी आपला सामना होणार असल्याचा अंदाज त्यातून येतो. ड्रग्जचा व्यापार कोट्यवधी रुपयांची मर्यादा ओलांडून गेला आहे. व्यसनांच्या विळख्यात आजचे लाखो युवक अडकले आहेत. त्यांना सोडविण्याचा विचारही आजच्या वाढलेल्या या अंधारातील जगात होताना दिसत नाही. उलटपक्षी राजकीय आरोप – प्रत्यारोपातून या समस्येची धार बोथट करण्याचा प्रयत्न इथे सुरु आहे. कोण राजकारणी किंवा कोणत्या राजकीय नेत्याचा मुलगा ड्रग्जच्या जंजाळात अडकला आहे आणि समाज पोखरणार्‍या ऐल्वीश यादव याच्यासारख्यांशी कोणाची मैत्री आहे, इथेच हा प्रकार थांबतो. कारवाई पुढे लोटली जाते आणि त्यामुळे अंधःकार गडद झाल्याची जाणिव होऊ लागते.
  तोच प्रकार राजकीय अराजकाचा आहे. समाजकारण केव्हाच मागे पडून शंभर टक्के राजकारण आणि त्याही पुढे जाऊन त्याचे व्यावसायिकरण व त्यातून व्यावसायिक जीवघेणी स्पर्धा राजकीय व्यवस्थेवर विश्‍वास असलेल्यांना दिग्मुढ करते. राजकीय संस्कृतीचे गोडवे गाताना गेल्याकाही शतकांपूर्वीच्या चळवळींचे राजकारण संपले की काय, असे वाटून जाते. या राजकारणातून व्यापार आणि व्यापारी गब्बर होताना दिसतात. केवळ आणि केवळ एका विशिष्ट उद्देशाने राजकारणातून पैसा ओरबाडण्याची स्पर्धा सुरु होते. ही स्पर्धा इतकी वाढीस लागली आहे, की नेमकी कोणात स्पर्धा सुरु आहे, हेसुद्धा न सुचावे इतकी विचारशक्ती बधीर झाली आहे. दिवाळी भेट आणि सदिच्छा भेटींच्या माध्यमातून बधीर झालेल्या लोकांच्या, माध्यमांच्या विचारशक्तीला अजून बोथट करण्याचे प्रयत्नही थीटे वाटावेत, अशी स्थिती आहे.
  जातीचे वास्तव आता विस्तवात रुपांतरीत झालेय. त्याचे चटके सगळ्यांनाच लागू लागले आहेत. लोकांची दिवाळी आनंदात जावी म्हणून स्थगित होणारी आंदोलने आणि आंदोलने स्थगित झाल्यानंतर पुढचे पुढे पाहू म्हणणारी निर्ढावलेली राजकीय मानसिकता सर्वसामान्यांच्या आणि समाजाच्या काहीही उपयोगी नाही. पण तरीही या व्यवस्थेला खतपाणी घातले जातेय. जाती पोसल्या आणि वाढवल्या जाताहेत. जातीय अस्मितांच्या निखार्‍यांना विझू न देता त्यांच्यावर फुंकर घातली जातेय. आणि तीसुद्धा केवळ आणि केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी. आपल्या आंदोलनाने दिवाळी चांगली जाणार नाही, हे माहिती असूनही दररोज नवा हट्ट मांडायचा आणि त्याच नेटाने सरकारने त्याकडे दुर्लक्ष करायचे, हा खेळ सुरु आहे. त्या खेळाच्या, स्पर्धेच्या निकालापुढे काय तर केवळ अंधःकार अधिक गडद होतोय, हाच इशारा मिळतोय.
  कदाचित सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर विषयांतराचा धोका असला तरीही इथे बाजारपेठेचा विचारही सर्वसामापन्यांनी करायला हवा. देशांतर्गत व्यापार वृद्धी सुरु झाली आहे. व्होकल फॉर लोकल, हा विचार सरकारने सर्वसामान्यांना दिल्यानंतर बर्‍यापैकी लोकल उद्योजकांना चांगले दिवस आले आहेत. यंदा दिवाळीच्या काळातही चीनी वस्तुंची निर्यात 40 टक्क्यांपर्यंत घटली आहे, असे एक आकडेवारी सांगते. ती समाधानकारक म्हणावी लागेल. दिवाळीतील सजावटीच्या वस्तू, फटाके सगळे काही भारतीय बनावटीचे दिसू लागलेत, असा दावा नाही. पण चिनी बनावटीच्या वस्तुंची संख्या आणि बाजारपेठ व्यापणार्‍या या ड्रॅगनचे आकारमान तुलनेने लहान झाले. बाजारपेठेवर अधिराज्य गाजवण्याच्या प्रयत्नात अख्खी बाजारपेठच गिळंकृत करू पाहणार्‍या या संकटाला एकजुटीने थोपवता येईल, वाढणारा अंधःकार थोडासा रोखता येईल.
  जाता – जात
  प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आणि शासकीय रुग्णालयांमध्ये श्‍वसन विकारासाठीचे विशेष वॉर्ड सुरु करावे लागले. प्रचंड गाड्या, बांधकामे आणि नैसर्गिक संकटामुळे प्रदूषणाने श्‍वास कोंडला आहे. ही समस्या केवळ दिल्ली -मुंबईची नाही. ती सर्वत्र पसरतेय. सर्वसामान्यांच्या जीवनात अंधार आणणारा हा धोका वेळीच ओळखता आलेला नाही. एकट्या मुंबई शहरात 6 हजार बांधकाम प्रकल्प सुरु आहेत. त्यांच्याकडून सगळ्याच यंत्रणांची काळजी घेतली जात असल्यामुळे उडणारा धुराळा गोड मानून त्याकडे यंत्रणा दुर्लक्ष करतात. उच्च न्यायालयाच्या सुनावणीत ज्यावेळी बांधकाम प्रकल्प बंद करावे लागतील, असे न्यायालय म्हणते, त्यावेळी सरकारच्या दोन – तीन यंत्रणांच्या प्रमुखांच्या वतीने बाजू मांडली जाते. हे निश्‍चित शुभ चिन्ह नाही. गरीब, श्रीमंत सगळ्यांनाच या प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढायचे तर जबाबदारी कोणाची? म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अंधार वाढतोय, वाढलाय. प्रकाशाचा एका किरणाची प्रतीक्षा आहे. पण तो किरण दाखवावा कोणी? मग पुन्हा बुद्धची वाट खुणावू लागते, आणि म्हणते ’अत्त़ दीप भव ’
  – विशाल राजे