ही प्रथा जुनीच, दोन पिढ्यांची जोडणी – गदर पुन्हा आला…

डिजिटल युगाने केवढी तरी जुनी-नवीन माहिती आणि अनेक प्रकारचे मनोरंजन यांच्या केलेल्या स्फोटात एखादा जुना पिक्चर, जुने गाणे पहावेसे वाटले रे वाटले, आपण गुगलवर गेलोही... अशा झटपट युगात अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर एक प्रेमकथा' (रिलीज १५ जून २००१) बावीस वर्षानंतर पुन्हा प्रदर्शित झालाय. फरक इतकाच की, तेव्हा सिंगल स्क्रीन थिएटर्सचे युग होते, आता मल्टीप्लेक्स आहेत. ओटीटी स्थिरावतेय.

  जुना पिक्चर नव्याने रिलीज हा फंडा तसा खूपच जुना. सोशल मीडियाच्या युगात तो कालबाह्य झाला का? प्रत्येक पिढीत जुने चित्रपट पाहणारे असतातच आणि मागची पिढीही (आणि त्यामागचीही पिढी) जुने चित्रपट पुन्हा पुन्हा पाहू इच्छिते. त्यांचा आपला चित्रपट पाहिल्याच्या आठवणींचा सुवर्ण काळ असतो. मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’, व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘दो ऑखे बारह हाथ’, के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’, राज कपूर दिग्दर्शित ‘आवारा’, विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’, गुरुदत्त दिग्दर्शित ‘प्यासा’ या चित्रपटांपासून ते सुरु आहे. ही हिट लिस्ट अशीच वाढत वाढत जाईल. अनेक फिल्मदीवाने तर काळ कितीही पुढे गेला तरी आजही तेच जुने चित्रपट सतत पाहत असतात आणि जुन्या आठवणीत छान रमतात. फार सुखावतात. पूर्वी असे जुने चित्रपट मॅटीनी शो आणि रिपिट रनला येत. फिल्मदीवाने त्यावर लक्ष ठेवून असत. ती एक सवयच झाली होती आणि आवडही होती. दूरचित्रवाणी, व्हिडिओ, चॅनेल असे एकेका दशकाच्या अंतराने आगमन होताच जुने चित्रपट अधिक प्रमाणात आपल्यासमोर येऊ लागले. अगदी जवळ येत आहेत.

  जुने चित्रपट कालच्या आणि आजच्या पिढीसमोर राहण्याचा हुकमी फंडा, त्यातील सदाबहार गीत संगीत. गुणगुणावेत असे मुखडे. त्या गाण्यांनी रेडिओ ते यू ट्यूब असा श्रवणीय प्रवास करताना प्रत्येक वेळी दोन तीन पिढ्यांना जोडले. गंमत म्हणजे, प्रत्येक काळात मागच्या काळातील चित्रपटाचे संगीत ऐकावेसे वाटत राहिले. तिसरी मंझिलपासून एक दुजे के लिएपर्यंत आणि आराधनापासून सागरपर्यंत अनेक चित्रपट गाण्यांसाठी पुन्हा पुन्हा पाह्यले जातात. आवर्जून पहावेत. एकदा चित्रपटगृहातून पिक्चर गेला म्हणजे त्याचा प्रवास संपतो, ते डब्यात जातात असे पंचवीस टक्के पिक्चरबाबत घडत असले तरी अगणित पिक्चर्स अनेक लहान मोठ्या कारणाने जणू सुरुच असतात. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) हा कायमच न्यूजमध्ये आहे. देशात कोणत्याही दूरवरच्या गावातील कोणी वीरु पाण्याच्या टाकीवर चढतो आणि आपली कसली तरी मागणी पूर्ण करा; अन्यथा उडी मारण्याची धमकी देतो ही बातमी ‘शोले’च्या संदर्भातून येते.

  चित्रपट रसिकांत ‘शोले’ची खेळी वेगळी आहे. ‘आम्ही शोलेपूर्वीचा चित्रपट पाहतो, त्यानंतरचे चित्रपट क्वचितच पाहतो’ असे सांगणारे बरेच. के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ (६०) मूळचा ब्लॅक अँड व्हाईट तरी त्याचा प्रभाव रंगतदार. फक्त मधुबालाच्या नृत्याने खुललेले ‘प्यार किया तो डरना क्या’ हे भव्य काचमहालातील नृत्य गीत रंगीत होते. असं एकादे गाणे वा दोन गाणी रंगात हा त्या काळातील एक फंडा होता. २००४ साली हाच ‘मुगल ए आझम’ आधुनिक तांत्रिक सोपस्काराने पूर्ण रंगात न्हाऊन पुन्हा थाटात रिलीज केला. इतका की, पहिल्या वेळी वाजत गाजत हत्तीवरुन त्याची प्रिन्ट मराठा मंदिर थिएटरला आणली (याच्या गोष्टी मागील पिढीकडून माझ्या पिढीला अगदी रंगवून सांगितल्या जात.) आता रंगातील या चित्रपटाची प्रिन्ट अशीच ढोल-ताशांनी वाजत इराॅस थिएटरवर आणली हे मी सिनेपत्रकार म्हणून अनुभवले आणि तसे लिहिलेही. जुना पिक्चर पुन्हा प्रदर्शित होताना असं काही घडत असते. वीस वर्षांत चोरी चोरी, नया दौर असे अनेक जुने ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असेच रंगले.

  जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असतानाची इकाॅनाॅमी हा आणखीन एक ‘आखड्याचा खेळ’ चित्रपटाचे वितरक आणि चॅनेलचा व्यवहार यात जुन्या चित्रपटाचे कला मूल्य नव्हे तर व्यवहार महत्वाचा. ते चित्रपट जुने आहेत हे त्यांचे ‘मूल्य’ आणि आता ते पुन्हा प्रदर्शित होत आहेत हा व्यवहार झाला. आज पैशाची किंमत बदललीय. ओ. पी. रल्हन अभिनित व… दिग्दर्शित ‘तलाश’ (१९७०) हा आपल्याकडचा पहिला एक कोटीचा महागडा चित्रपट. पडद्यावर आला तोच पडला. राज कपूर दिग्दर्शित ‘जोकर’ (१९७०) पडद्यावर आला तोच पडला, बोअर करता है अशा अफवा घेऊनच. दोन मध्यंतरचा ‘जोकर’ काही गाण्यांसह कापून एक मध्यंतरचा झाला आणि काही वर्षांनी मॅटीनीला, रिपिट रनला सतत प्रदर्शित होताना असं ॲप्रिशिएशन मिळाले की, आर. के. फिल्मच्या इतिहासातील तो सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरल्याचे रणधीर कपूरने एका मुलाखतीत म्हटलं. श्याम रल्हन दिग्दर्शित ‘पाच दुश्मन’ या चित्रपटाच्या बाबतीत कम्मालच झाली. काही वर्षांनी हाच पिक्चर ‘दौलत के दुश्मन’ नावाने प्रदर्शित झाला. पहिल्या वेळी फ्लाॅप झाल्यानेच ही खेळी शक्य झाली. विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, मनू नारंग, अजित आणि प्राण हे ते पाच दुश्मन होते. ‘गदर’ आता फोर के या आधुनिक तांत्रिक सोपस्काराने आलाय. सनी देओलच्या सिक्स पॅक पिळदार शरीराचे आणि जोरदार डायलॉगबाजीचा तडका यात जोरात आहे. काळ पुढे सरकला तरी काही जुने चित्रपटही असे पुढील पिढीत येतात, ते यायलाच हवेत. रसिकांच्या दोन पिढ्यांना जोडणारा तो सही फंडा आहे.

  -दिलीप ठाकूर
  glam.thakurdilip@gmail.com