जिभांच्या घसरगुंड्या!

राज्यपाल कोश्यारी यांच्या ताज्या विधानावरून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आक्रमक झाले आणि त्यांनी राज्यपालांना हटविण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली. या मागणीत चुकीचे असे काही नाही. तथापि ती मागणी करतानाच सर्वच पक्षांनी आत्मपरीक्षण केले तर राजकारणाच्या या घसरत्या पोताला आपण सर्वांनीच पुरेसा हातभार लावला आहे याचा साक्षात्कार त्यांना होईल. मुळात लोकशाहीत राजकीय पक्ष परस्परांना विरोध करतात यात वावगे काही नाही; मात्र पातळी सोडून तो होता कामा नये ही पूर्वअट सर्वच राजकीय पक्षांचे नेते सोयीस्करपणे विसरले आहेत.

  लोकशाहीत (Democracy) मत व्यक्त करण्यास अथवा ते मांडण्यास सर्वांना मुभा असते हे खरे; मात्र ते मत व्यक्त करताना सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या जाणे आवश्यक असते याचे विस्मरण होऊ लागले आहे. विशेषतः समाजमाध्यमांवरून (Social Media) जी मुक्तपणे गरळ अनेकांकडून ओकली जाते त्यामुळे या माध्यमांना समाजमाध्यमे म्हणावे की असामाजिक माध्यमे म्हणावे असा प्रश्न पडावा. तथापि समाजमाध्यमांवरून होणाऱ्या या यथेच्छ चिखलफेकीचे मूळ हे समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांच्या मानसिकतेतच केवळ नसून समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी घालून दिलेल्या वस्तुपाठात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. नेतृत्व करू पाहणाऱ्यांना सभ्यता, सुसंस्कृतपणा, संयम यांचा विसर पडला की त्या नेत्यांच्या विधानांमधून वातावरण गढूळ होते आणि तीच कलुषितता समाजात झिरपत जाते. तेव्हा समाजाला (Society) अधिक सुसंस्कृत बनविण्याची पहिली जबाबदारी ही राजकीय-सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांची. दुर्दैवाने अलिकडच्या काळात अनेकांच्या जिभांच्या ज्या घसरगुंड्या झाल्या आहेत ते चिंता वाटावे असे वास्तव आणि वर्तमान आहे. त्यावर उपाययोजना करणे हे खरे तर निकडीचे; प्रश्न त्याची सुरुवात कोण करणार हा आहे.
  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल जे विधान केले ते टीकेचे लक्ष्य ठरले. वास्तविक कोणत्याही नेत्याने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावयास हवेच; कारण त्यांनी केलेल्या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत असतात. कोश्यारी यांनी यापूर्वीही काहीदा वादग्रस्त विधाने केलेली आहेत आणि वाद ओढवून घेतला आहे. कोश्यारी यांच्या ताज्या विधानावरून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आक्रमक झाले आणि त्यांनी राज्यपालांना हटविण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली. या मागणीत चुकीचे असे काही नाही. तथापि ती मागणी करतानाच सर्वच पक्षांनी आत्मपरीक्षण केले तर राजकारणाच्या या घसरत्या पोताला आपण सर्वांनीच पुरेसा हातभार लावला आहे याचा साक्षात्कार त्यांना होईल. मुळात लोकशाहीत राजकीय पक्ष परस्परांना विरोध करतात यात वावगे काही नाही; मात्र पातळी सोडून तो होता कामा नये ही पूर्वअट सर्वच राजकीय पक्षांचे नेते सोयीस्करपणे विसरले आहेत. ही व्याधी केवळ महाराष्ट्रातच वाढली आहे असे नाही; देशभर त्या व्याधीने हैदोस घातला आहे. द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल बोलताना काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन यांनी काढलेले अनुदार उद्गार निषेधार्ह असेच होते. तृणमूल काँग्रेस नेते तथा ममता बॅनर्जी मंत्रिमंडळातील मंत्री अखिल गिरी यांनी एका जाहीर सभेत बोलतानाराष्ट्रपती मुर्मू यांच्याबद्दल असेच आक्षेपार्ह उद्गार काढले. त्यावरून वादंग उठले आणि अखेरीस आपण त्या विधानाशी सहमत नसून मंत्र्यांना समज देण्यात आली आहे असे सांगत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना माफी मागावी लागली. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा आरोप असणारे आशिष मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यासंबंधी त्यांचे वडील तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना वार्ताहरांनी प्रश्न विचारले तेव्हा संयम सुटलेल्या अजय मिश्रा यांनी पत्रकारांना ‘चोर’ संबोधले होते. कर्नाटकात काँग्रेस आमदार के आर रमेश यांनी बलात्कारावरून थेट विधानसभेत जे अश्लाघ्य उदगार काढले होते. महाराष्ट्र विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली नक्कल विधिमंडळाच्या प्रतिष्ठेस नख लावणारी होती. जाहीर सभांमध्ये अशा नकला केल्या जातात आणि त्याही किती अभिरुचीपूर्ण असतात हा प्रश्न आहेच; मात्र गर्दीचे मनोरंजन हाच सभेच्या यशस्वीतेच्या मोजणीचा निकष ठरला की असे प्रकार होणारच; तथापि विधिमंडळ हे गर्दीचे मनोरंजन करण्याचे व्यासपीठ नव्हे याचे भान न राहणे चिंताजनक. बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालांसारखे करून दाखवू हे लालू प्रसाद यादव यांचे विधान वादग्रस्त ठरले होते. मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ अशीच सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना घसरली होती. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांना उद्देशून शब्दशः दिलेल्या ‘शिव्या’ अद्याप सर्वांच्या स्मरणात असतील. तेव्हा अशा उदाहरणांना अंत नाही; किंबहुना हा आजार अधिकच फोफावत आहे.
  वास्तविक सर्वच पक्षांना उत्तम, प्रभावी, सभ्य वक्त्यांची परंपरा लाभलेली आहे. विरोध करताना तो टोकदार अवश्य असावा; पण तो विखारी किंवा पातळी सोडून केलेला नसावा याचा वस्तुपाठ या नेत्यांनी घालून दिला आहे. मधू दंडवते यांच्यापासून अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अशा नेत्यांची मांदियाळी आहे; ज्यांनी प्रदीर्घ काळ राजकारणात राहूनही आपल्या जिभेवरील नियंत्रण जाऊ दिले नाही. विरोधकांना खिंडीत गाठण्यासाठी विनोद हेही शस्त्र आहे; मात्र विनोद हा निखळ असू शकतो याचे विस्मरण होऊन तो जितका सवंग होईल तितकी आपली सरशी जास्त; जितका थिल्लरपणा अधिक तितकी आपली उपद्रवक्षमता अधिक; जितके वादग्रस्त विधान तितकी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची क्षमता मोठी ही जी समीकरणे बनली आहेत अथवा बनू पाहात आहेत; त्याने तात्कालिक काही साध्य केल्याचा अनुभव मिळेलही. पण दूरगामी परिणाम हे घातकच असतील यात शंका नाही.
  विधिमंडळ अथवा संसदेत असंसदीय शब्द वापरले तर ते कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्याची तरतूद आहे. मात्र या व्यासपीठाच्या बाहेर राजकीय नेते अधिक वावरत असतात. तेव्हा तिथे अशा वादग्रस्त विधानांना लगाम घालणे आवश्यक. जिभांच्या घसरगुंडीवरून सार्वत्रिक आणि सामाजिक अधःपतन रोखण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे.
  – राहुल गोखले
  rahulgokhale2013@gmail.com