भारतीय हॉकीला विजयाचा परिसस्पर्श!

आजतागायत भारतीय हॉकी संघ बऱ्याच तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर पूर्वार्धात वर्चस्व गाजवायचा. परंतु दुसऱ्या अर्धामध्ये फिटनेसमुळे जिंकत आलेल्या लढती गमावायचा. भारतीय हॉकीपटूंकडे तेव्हाही अप्रतिम कौशल्य होते आणि आजही आहे. मात्र नैसर्गिक हिरवळीच्या मैदानावरून हॉकी हा खेळ कृतिम पृष्ठभागाच्या मैदानावर आला आणि गुणवत्तेने फिटनेसच्या पुढे मान तुकविली. बऱ्याच वेळा फिटनेस कमी असल्याने आपण जिंकलेली हॉकी युद्ध हरलो आहोत. यावेळी मात्र तसे घडले नाही.

  भारतीय हॉकी संघाने एशियन चॅम्पीयनशीप स्पर्धा सलग चौथ्यांदा जिंकली. सलग चार विजेतीपदे, म्हटली की पूर्वीचा भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ आठवतो. अलिकडे तर आशिया खंडातच फक्त पाकिस्तानच नव्हे तर मलेशिया, जपान, कोरिया आदी आव्हानवीर तयार झाले आहेत. भारतासाठी हा विजय, येत्या महिन्याभरातच चीनमध्ये होणाऱ्या ‘एशियाड’ स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा विजय अंतिम सामन्यात मलिशियाकडे ३-१ अशी आघाडी असताना मिळविला आहे; हेही विशेष. निर्णायक सामन्यात, पराभवाच्या दारातून परतत भारताने मिळविलेला हा विजय महत्वाचा आहे. भारतीय हॉकीची शैली अजूनही जिवंत आहे. मात्र या शैलीला फिटनेसची अभूतपूर्व जोड आणि साथ मिळाल्यामुळे हा विजय साध्य झाला आहे.
  स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय हॉकी संघाच्या कौशल्याची रसभरीत वर्णने आपण नेहमीच ऐकतो. अलिकडच्या काळात ते क्षण फार काळ वाट्याला येत नसत. परंतु चेन्नईच्या राधाकृष्णन स्टेडियमवर दोन आठवड्यांच्या कालावधीत हॉकी रसिकांनी एक वेगळीच हॉकी अनुभवली.

  भारतीय हॉकीपटूंचे अद्भूत पदलालित्या पाहिले. सफाईदार पासेस पाहिले. सफाई-सहजता पाहिली एखाद्या प्रवाहीत नदीतील पाण्याचा वेग, पाहिला, जो भारतीयाच्या खेळात कायम राहीला. अंतिम सामन्यात १-३ अशा पिछाडीवर असतानाही न खचलेला भारतीय संघ पाहिला. ज्या संघाने बाजी अलेशियावरच ४-३ अशी उलटविली. या भारतीय संघात भारताच्या काही सर्वोत्तम हॉकीपटूंसारखे हिरोज नव्हते. प्रतिपक्षाचा बचाव भेदत जाणाऱ्या महंमद शाहीदसारखे पदलालित्य असलेल्या मोहोरा या संघात नव्हता. पण या संघातला मनप्रीतसिंगही काही कमी नव्हता. बचावफळीला हुलकावण्या देत, त्यांचा बचाव सहजपणे भेदत जाणाऱ्या मनप्रीतची चेंडूवरील हुकूमत कमालीची होती. आणि हे सारं तो हवं तेव्हा तेवढ्या वेळेत करीत होता. धनराज पिल्लेच्या वेगाशी कदाचित सुसंगत नसेलही; पण चेंडूसाठी वेगात पळणारे मनदीप आणि आकाशदीप सिंग इतरांच्या आधीच चेंडूवर झडप घालताना दिसायचे.
  संघातील तरुण कोवळा वेगवान सेल्वम कराथी याच्या फिटनेसलाही दाद द्यावी लागले, असा झंझावात पाहिला.

  आजतागायत भारतीय हॉकी संघ बऱ्याच तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर पूर्वार्धात वर्चस्व गाजवायचा. परंतु दुसऱ्या अर्धामध्ये फिटनेसमुळे जिंकत आलेल्या लढती गमावायचा. भारतीय हॉकीपटूंकडे तेव्हाही अप्रतिम कौशल्य होते आणि आजही आहे. मात्र नैसर्गिक हिरवळीच्या मैदानावरून हॉकी हा खेळ कृतिम पृष्ठभागाच्या मैदानावर आला आणि गुणवत्तेने फिटनेसच्या पुढे मान तुकविली. बऱ्याच वेळा फिटनेस कमी असल्याने आपण जिंकलेली हॉकी युद्ध हरलो आहोत. यावेळी मात्र तसे घडले नाही. जेटलॅगला मागे टाकत भारताने चीनविरुद्ध लढतीत सहज विजय मिळविला खरा; पण जपानविरुद्ध विजयासाठी डोके फोड करावी लागली. कोरियाविरुद्धचा कठिण पेपर सोडविला. मात्र तोपर्यंत संघाला सूर गवसला होता. पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामन्यापासून भारताला सूर गवसायला लागला. खरं तर पाकिस्तान संघात पूर्वीचा जोश राहिलेला नाही. मात्र या संघाविरुद्ध खेळताना कोणत्याही खेळात भारतीय खेळाडूंवर दडपण हे असतेच. उपांत्य सामन्यात मात्र भारतीयांचा उंचावलेला दर्जा स्पष्ट दिसायला लागला होता.

  मलेशियाविरुद्ध लढतीत भारतीय संघ एखाद्या परिपूर्ण संघासारखा खेळला. सुरुवातीपासून आघाडी घेऊन कुणीही लढत जिंकू शकते. अंतिम फेरीत मात्र तसे घडले नाही. भारताच्या पहिल्या गोलनंतर मलेशियाने यजमानांना हादरविले. चक्क ३-१ अशी आघाडी घेऊन पिछाडीवरून आघाडी घेत सामना जिंकायला निधडी छाती लागते. कौशल्य लागतेच; परंतु अभूतपूर्व दमछाकही लागते. आघाडी घेतल्यानंतरचा अधिक भक्कम बचाव भेदणे म्हणजे महाकठीण काम असते. पण भारतीयांनी ते केले. प्रतिपक्षाच्या गोलक्षेत्रात वारंवार धडका मारीत राहीले. ४५व्या मिनिटाला तो क्षण अखेर आला. गुरजंतसिंगने गोलमुखावरील गर्दीतही लक्ष्य अचूक साधले. पेनल्टी स्ट्रोकने भारताला बरोबरी साधण्यात मदत केली होतीच. त्यानंतर मात्र अखेरचा पंच भारतीयांनी मलेशियाला मारला. सलग चौथ्या आशिया कप हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

  ही तर सुरुवात आहे. केवळ फिटनेस या एकमेव भांडवलावर भारताने स्पर्धा जिंकली नाही. आणि हा फिटनेस देखील एका रात्रीत मिळविलेला नाही. त्यापाठी डेव्हिड जॉन, लोम्बार्ड, रॉबीन आर्केल आणि अॅलन टॅन यांची गेल्या कित्येक महिन्यांची मेहनत आहे. अखेरच्या क्षणी बाजी उलटविण्यासाठी फिटनेसबरोबरच खेळाची गुणवत्ताही लागते. तीच या भारतीय संघाकडे आहे; हे विशेष. मिळालेल्या संधीचा अचूक लाभ उठविण्याचे कौशल्य आहे. बचाव भक्कम करून आघाडी टिकविण्याची क्षमता या संघात आहे. आणि गरजेचे असेल तेव्हा आक्रमणाच्या तोफा डागायची कुवतही या संघाची आहे. मधली फळी संघाचा प्रमुख आधार आहे. बचाव फळी गोलपोस्टचे रक्षण करण्याइतपत सक्षम आहे; ज्यामुळे गोलरक्षकावरचे दडपण कमी होईल.

  संघाचा कप्तान हरमनप्रीतसिंग म्हणतो की, “प्रशिक्षक क्रेग फुलटन यांची संघाच्या ढाच्यातच बदल केला. त्यांनी आपण जिंकू शकतो, हा विश्वास आमच्यात निर्माण केला. आखलेल्या योजनांच्या बाबतीत विश्वास दिला. मैदानावरील चुकांचे स्वत:च अवलोकन करण्याची दृष्टी दिली. त्या चुका सर्वोत्तम खेळाडूकडूनही होऊ शकतात. त्यामुळे त्या विसरून लगेचच सामन्याच्या उर्वरित भागावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण प्रशिक्षक फुलटन यांनी दिली.
  अर्थातच फुलटन यांच्यासारखे कसलेले, अनुभवी प्रशिक्षक या विजयाने हुरळून जाणार नाहीत, याची खात्री आहे. खेळाडूंचेही पाय जमिनीवरच राहतील याचीही ते काळजी घेतील. कारण महिन्यानंतर ‘एशिया’ हॉकी स्पर्धा अधिक चुरशीची, अधिक कठीण असणार आहे याची जाणीव त्यांना आहे. चीनमधील स्पर्धेत यजमान चीनदेखील अधिक बलवान असणार आहे. पराभवानंतर त्वेशाने उसळून प्रतिस्पर्ध्यांवर अधिक ताकदीने स्वारी करण्याची पाकिस्तानची परंपराच आहे.

  एशियाड हॉकी त्यांच्यासाठी अधिक प्रतिष्ठेची असेल. त्यामुळे यावेळप्रमाणे पाकिस्तानला अंगावर घेणे सहज सोपे नसेल; हेही फुलटन जाणून आहेत. जपानने, या स्पर्धेत आपल्यापेक्षा वरचे रॅन्कींग असलेल्या कोरियाला हरवून आपण आपले एशियाड हॉकीचे विजेतेपद राखण्याइतपत सक्षम असल्याचे सूचित केले आहे. आशियाई हॉकीत पदक पटकावू न शकलेल्या कोरीयाला हे अपयश अधिक सलत असेल. त्यामुळे नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेतील यशाने हुरळून न जाता भारतीयांनी यापुढील आव्हानांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. मलेशियाविरुद्ध अंतिम सामन्यातील पिछाडीवरून पुढे येत मिळविलेला विजय ही मोठी जमेची बाजू आहे. मात्र एशियाड हॉकीमध्ये आव्हाने यापेक्षा कठीण असणार आहेत. कारण सर्वच संघांनी या स्पर्धेसाठी काहीतरी राखून ठेवले आहे. काही संघांनी प्रमुख खेळाडू या स्पर्धेत उतरविले नव्हते. त्याशिवाय परिस्थितीही वेगळी असणार आहे. चीनमधील हॅगशू येथील हवामान, आहार आणि बदललेली समीकरणे याचाही विचार व्हायला हवा.

  – विनायक दळवी