बाई नावाचं नाट्यस्कूल!

मराठी रंगभूमीवर आपल्या समर्थ अभिनयाने, कल्पक दिग्दर्शनाने शेकडो नाटकांवर मोहर उमटविणाऱ्या सिद्धहस्त, प्रतिभासंपन्न विजयाबाई मेहता यांच्या रंगप्रवासामुळे मराठी नाटकांच्या कक्षा विस्तारल्या. रंगभूमीवरला त्यांचा ‘झिम्मा’ विलक्षणच! आधुनिक मराठमोळ्या रंगभूमीच्या प्रवर्तक म्हणून त्यांची स्वतंत्र ओळखच बनली आहे.

  रंगकर्मींच्या जीवनातले काही टर्निंग पॉइंट असतात. यावेळी सारंकाही भारावून सोडणारं. अगदी नाटक, सिनेमा पेक्षाही कलाटणी देणारं. तो कालखंड १९५६ चा. दुर्गाबाई खोटे यांनी दोन वेण्या घातलेल्या जेमतेम एकवीस वर्षाच्या एका तरुणीला विश्वासात घेऊन विचारले, ‘तुला यापुढे दिग्दर्शनाची जबाबदारी पत्करावी लागणार आहे. याबद्दल तू घरातल्या लोकांना विश्वासात घे. कारण अभिनयापेक्षा दिग्दर्शनात बराच वेळ जातो. त्यांची परवानगी घे आणि मग या नव्या कामाला सुरुवात करूया. आणि हो, तुझ्या लग्नाची बोलणी-बिलणी सुरू नाहीत ना झाली? नाहीतर तू लग्न करून पसार व्हायची’

  विजय तेंडुलकरांचं ‘श्रीमंत’ नाटक. वयाने आणि अनुभवाने सारे ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकार पण एकूणच नाटकांबद्दल असणारी समज ही त्या तरुणीमध्ये गच्च भरलेली. आणि तेंडुलकर हे तालमीच्या क्षणी म्हणाले ‘बाईss’ ही हाक जशी घुमत राहिली… -आणि वयाच्या एकवीस वर्षाची तरुणी थक्क झाली. चक्रावून गेली. ‘बाई’ ही सन्मानाची पदवीच बहाल झाली. एकवीस वर्षाच्या ‘बाई’ने आजवर केलेली रंगवाटचाल म्हणजे सिद्धहस्त अभिनेत्री, दिग्दर्शिका हिचा सुवर्ण नाट्यप्रवासच.

  विजया मेहता म्हणजे एक नाट्य झंझावातच!

  विल्सन कॉलेजच्या स्नेहसंमेलनात आणि नाट्यस्पर्धेतून १९५१ पासून सुरू झालेला हा नाटयप्रवास आचार्य अत्रे, वि. वा. शिरवाडकर, विल्यम शेक्सपियर, बर्नार्ड शॉ, विजय तेंडुलकर इथपासून सुरू झालेला संहितेचा त्यांच्यासोबतचा प्रवास जयवंत दळवी, महेश एलकुंचवार, गिरीश कर्नाड यांच्या शब्दांपर्यंत पोहचला. १९५१ ते १९९३ पर्यंतची ही नाट्यसफर जी एका प्रदीर्घ कालखंडातील साक्षीदार ठरली, प्रसंगी नाट्यलेखन, भूमिकापासून सुरू झालेला हा नाटय झिम्माच वाडा चिरेबंदीपर्यंत पूर्णत्वाला पोहचला. ‘वाडा चिरेबंदी’त नव्या पिढीच्या तरुण रंगकर्मीसोबत त्यांनी आईची भूमिका केली आणि दिग्दर्शनही केले. ‘कलावैभव’ची निर्मिती होती. आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रवर्तक म्हणून त्यांनी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे शेकडो रंगकर्मीना आकार दिला. आधार दिला.

  ‘राजकारणात इंदिराबाई आणि रंगभूमीवर विजयाबाई!’ असं म्हटलं जातं हे खरं आहे. कारण दोघींनी आपल्या स्वकर्तृत्वावर इतिहास उभा केला त्या नाट्यशिक्षिका होत्या. संवेदनशील रंगकर्मी होत्या. कल्पक दिग्दर्शिकाही होत्या. १७ वर्षे एनसीपीएचे कार्यकारी संचालकपद सांभाळून त्यांनी आपल्यात प्रशासकीय कौशल्यही सिद्ध केलं आणि मराठी आणि अन्य भाषिक नाटकांना सादरीकरणासाठी प्राधान्य दिलं. केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ या किताबाने त्यांना सन्मानित केलं.

  विद्यापीठांनी त्यांना ‘डॉक्टरेट’ बहाल केली. ‘रंगायन’ या नाट्य चळवळीच्या सुवर्णकाळाच्या त्या साक्षीदारही ठरल्या. त्यामुळे नाट्यसृष्टीला एक दिशा मिळाली. आपल्या कारकिर्दीचा मागोवा घेणारे ‘झिम्मा’ या आत्मकथनपर ग्रंथाचंही लेखन त्यांनी केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार व समीक्षक अंबरीश मिश्र यांनी याकामी बाईना लेखनसहाय्य केलं. २०१२ साली राजहंस प्रकाशनने या ग्रंथाची निर्मिती केली.

  नाना पाटेकर, रिमा लागू, विक्रम गोखले, दिलीप कोल्हटकर, मंगेश कुलकर्णी, नीना कुलकर्णी…असे एकापेक्षा एक रंगकर्मी विजयाबाईंनी घडविले. अभिनयाचे संस्कार त्यांच्यावर केले. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीतला त्या एक दुवा म्हणून सामोऱ्या आल्या. अगदी एकांकिकांपासून ते पूर्ण नाट्यापर्यंत त्यांनी वापर केला, जो विलक्षणच म्हणावा लागेल.

  विजय तेंडुलकर यांची केशव प्रधान, थिफ पोलीस, चार दिवस, अंधेर नगरीतील कंटाळ दिन, आवाजाचे अपचन, चार दिवस, विठ्ठल तो आला (या तीन हिंदीत), चित्रगुप्त अहो चित्रगुप्त, बळी अशा किमान डझनभर एकांकिकांतून तेंडुलकरांना त्यांनी साथसोबत केली. एक ‘प्रयोग’ म्हणून एकांकिका विश्वातला हा जणू सुवर्णकाळच होता. पुलंच्याही अनेक एकांकिका त्यांनी केल्या, म्हणजे प्रामुख्याने दिग्दर्शन. सारे कसे शांत शांत, सदू आणि दादू, मोठे मासे छोटे मासे, नवे गोकुळ यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. गिरगावातील मुंबई मराठी साहित्य संघ म्हणजे त्याकाळी बाईची एकांकिकांची कार्यशाळाच बनली होती.

  १९५७ ते १९६० हा तो काळ. ‘विजया जयवंत’ त्यातून घडत गेली. गंगाधर गाडगीळ यांची वेड्याचा चौकोन, दोन शून्य आणि एक, या एकांकिका जयहिंद आणि विल्सन कॉलेजसाठी त्यांनी स्पर्धेकरिता दिग्दर्शित केल्या. १९५८ चा तो सुमार, बीईएसटीचे १९५९ साली त्यांनी पूर्ण नाटक ‘उद्धव’ दिग्दर्शित केलं. त्यावेळी त्या विजया जयवंतऐवजी विजया खोटे झाल्या होत्या. एक समर्थ, परिपक्व आणि रंगभूमीचे पक्के भान असणारी कल्पक दिग्दर्शिका म्हणून एका मजबूत पायावर त्या उभ्या ठाकल्या.

  पुलंच्या दिग्दर्शनाखालीही त्यांनी भूमिका केल्या. ‘सुंदर मी होणार’ यात दीदीराजे आणि मेनका या त्यांच्या भूमिका गाजल्या. चिं. त्र्यं. खानोलकर यांचे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक ‘रंगायन’तर्फे करण्यात आलं. त्याचं दिग्दर्शन आणि गौरीची प्रमुख भूमिकाही त्यांनी साकार केली. ‘रंगायन’ कार्यशालेत महेश एलकुंचवार, वृंदावन दंडवते, शं. गो. साठे यांच्या संहितेलाही ‘त्यांनी’ विजया मेहता या नव्या चष्म्यातून आकार दिला. एव्हाना बाईचं एक स्कूल चांगलंच आकाराला आलं होतं. रसिकांनाही नाट्यजाणिवा देण्याचे कसब त्यांनी आपल्या दिग्दर्शनातून, अभिनयातून दिलं.

  ‘मला उत्तर हवंय’मध्ये ‘मीना’ची मध्यवर्ती भूमिका विजयाबाईनी केली होती तर दिग्दर्शक होते नंदकुमार रावते. त्याच वर्षी ‘एका घरात होती’ रंगभूमीवर आलं. त्याचं दिग्दर्शन बाईचं होतं. मोहनशेठ तोंडवळकर यांनी निर्मितीमूल्यात कुठेही कसूर ठेवली नाही. दोन्ही नाटकं आपल्या कलावैभवच्या बॅनरखाली वाजतगाजत रंगभूमीवर आली. मला उत्तर हवंय हे विजयाबाईंच्या ‘रंगायन’मधून बाहेर पडल्यानंतरचं पहिलं व्यावसायिक नाटक. विजयाबाईंसोबत श्रीकांत मोघे होते. संपूर्ण नाटकभर व्हिलचेअरवर ते होते. ‘मला उत्तर हवंय’ रसिकांना मात्र आवडलं. दौरे प्रयोग वाढले. निर्माते म्हणून मोहनशेठ खूश झाले. ‘रंगायन’ फुटल्यानंतर व्यावसायिकची दारं अलगद उघडली गेली. फुटलेल्या रंगायनमधली मुलं! म्हणून नवी ओळख या ‘टीम’ला मिळाली. पंडित सत्यदेव दुबे यांना रंगायनचा मंगेश कुलकर्णी म्हणाला होता, ‘मराठी भाषेत ‘फुटणं’ याला वेगवेगळे अर्थ आहेत. आरसा एकदा का फुटला की तो सांधता येत नाही; पण झाड फुटतं आणि त्यातून फांद्या बाहेर येतात. रंगायनच्या फांद्या अनेक त्यातलीच एक आविष्कार. रंगायन बहरली, संपली नाही!’ १९७० च्या सुमारास ‘रंगायन’ फुटले, नवे पर्व सुरू झाले…

  ‘संध्या छाया’, ‘जास्वंदी’ आणि ‘अखेरचा सवाल या तीन नाटकांनी हाऊसफुल्ल गर्दीचे महाराष्ट्रभरात दौरे केले. ३० दिवसात २५ प्रयोगांचा विक्रमही केला. रिपिट शोही केले. अडीचशे वर नाटकाचे प्रयोग न करण्याचा निर्णयही बाईनी त्यावेळी घेतला होता. एवढी त्यांची दमछाक उडायची. त्यांनी १९७४ नंतर वेगळी वाट केली. जागतिक सिनेमा, सिनेमा, दूरदर्शन, नाट्यशिक्षक, सरकारी जबाबदाऱ्या वगैरे केलं रंगकर्मी म्हणून त्या स्वतःलाच विविध माध्यमात तपासून बघत होत्या. मुंबई मराठी साहित्य संघाने ज्या दर्जेदार कलाकृतींना जन्म दिला, त्यात १९७३ साली ‘अजब न्याय वर्तुळाचा’ याचा उल्लेख करावा लागेल. बर्टोल्ट ब्रेश्त याच्या संहितेचा चिं. त्र्यं. खानोलकरांनी अनुवाद केला होता आणि विजयाबाईचं दिग्दर्शन होतं. दिग्दर्शनाचं आव्हान त्यांनी पेललं.

  दी गोवा हिंदू असोसिएशन व्यावसायिक रंगभूमीवर जयवंत दळवी यांचं ‘संध्याछाया’ हे नाटक १९७३ च्या सुमारास आणलं. माधव वाटवे यांचं दिग्दर्शन त्याला होतं. त्यातली ‘नानी’ची भूमिका इतिहास ठरली. पुढे सई परांजपे यांच्या ‘जास्वंदी’तली सोनिया, वसंत कानेटकरांच्या ‘अखेरचा सवाल’मधली डॉ. मुक्ता, अनिल बर्वे यांच्या ‘हमिदाबाईची कोठी’मधली हमिदाबाई, जयवंत दळवी यांच्या ‘बॅरिस्टर’मधली मावशी, १९८६ साली कलावैभवची निर्मिती असणाऱ्या महत्वाकांक्षी आणि संहिता व सादरीकरणाचे रंगरूप बदलणारे ‘वाडा चिरेबंदी.’ महेश एलकुंचवार यांच्या स्क्रीप्टला बाईंनी केलेलं दिग्दर्शन तसंच आईची भूमिका हे शेवटचं त्यांचं रंगभूमीवरलं दर्शन! एका प्रदीर्घ कालखंडाचा प्रवास त्यांनी केवळ मूक साक्षीदार म्हणून केला नाही, तर उभ्या नाट्यसृष्टीत चैतन्य आणलं. नव्या रंगसंकल्पना रुजविल्या.

  विदेशातील रंगभूमीही त्यांनी जवळून बघितली. हजारो संहिता त्यांनी वाचल्या.अभ्यास केला. त्या साकारही केल्या. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी त्यांनी समृद्ध केली. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदीही पोहोचल्या. हा एक उंचावणारा नाट्य आलेखच. योगायोग विलक्षण असतात.

  दुर्गाबाई खोटे व ज्योत्स्ना भोळे यांच्यानंतर झालेल्या त्या महिला नाट्यसंमेलनाध्यक्षा. इचलकरंजी येथील १९८६ साली भरलेल्या ६७ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. दुर्गाबाई खोटे आणि विजयाबाई म्हणजे सासू-सुना! दोघींनी ही प्रतिष्ठेची खुर्ची सांभाळली. दुर्गाबाई १९६१ साली दिल्लीतल्या ४३ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा होत्या, तर विजयाबाई १९८६ साली. दुर्गाबाईंना त्या आदर्श मानतात. सासुबाई व गुरुस्थानाचा बाईंनी त्यांना मान दिला. शेवटपर्यंत साथ दिली. अखेरच्या काळात दुर्गाबाई नव्वदीच्या होत्या तेव्हा ‘मी दुर्गा खोटे’ हे आत्मकथनपर पुस्तक त्यांनी लिहिले. त्यावेळी दुर्गाबाई अलिबाग मुक्कामी होत्या. दुर्गाबाईंची प्रकृती ढासळत होती. शेवटी त्यांना विजयाबाईंनी मुंबईत आणलं. शेवटपर्यंत या दोघीचं नातं सासू सुनेऐवजी आई-मुलीचं होतं.

  पत्रकार परिषदांच्या निमित्ताने आणि काही कार्यक्रमात विजयाबाईंना भेटण्याचा योग आला. एखाद्या शाळेच्या कडक मुख्याध्यापिका म्हणून त्यांची देहबोली होती, पण तरीही त्यातली मिश्किलता दिसत होती. प्रश्नांना थेट व स्पष्ट उत्तर देण्याची शैली, चौकस विचार, नजरेला नजर भिडवून बोलण्याची सवयः सारं काही भारावून सोडणारं. रंगभूमीवर भूमिका, दिग्दर्शन करायचं त्यांनी सोडल असलं तरी त्यांच्याभोवती असणारी जादू काही कमी झालेली नाही. हेच प्रत्येक वेळी जाणवलं. हिंदी आणि जर्मन भाषेत त्यांनी १९९३ या सुमारास गिरीश कर्नाड यांचं ‘नागमंडल’ दिग्दर्शित केले होतं. त्या दरम्यान त्यांची भेट झाली होती. गोवा हिंदू असोसिएशन, लाईपझिंग थिएटर आणि एनसीसीएची ती निर्मिती होती.त्यानंतर बाई काही नाटकाकडे फिरकल्या नाहीत. ते त्याचं शेवटचं दिग्दर्शन…

  विजयाबाई नाटकातच रमल्या. नाट्यसृष्टीच्या सर्वोच्च पदावर म्हणजे संमेलनाध्यक्ष पदाच्या त्या मानकरीही ठरल्या. नाटकात रमल्या. त्याचं वेड लागलं. यावर बाई एके ठिकाणी म्हणतात, ‘मला नाट्यसृष्टीचं व्यसन का लागलं असावं याचं उत्तर पिकासोच्या शब्दात मला सापडलं! ‘असत्याकडून सत्याकडे होणारा प्रवास मला आवडला असावा. त्यासाठी करावी लागणारी वास्तवाची पुनर्निर्मिती आणि त्यातून मिळणारी झिंग पुनः पुन्हा हवीहवीशी वाटली असावी. त्याची चटक एकदा का लागली की सुटणं कठीण!’

  नाट्यक्षेत्रात आपण का रमल्या? या प्रश्नावर विजयाबाई म्हणतात, ‘आनंदासाठी रमले!’ मराठीत नाटकाच्या प्रयोगाला ‘खेळ’ म्हणतात, हिंदीत ‘खेल’, इंग्रजीत ‘प्ले’ आणि जर्मन भाषेत ‘इपील’. त्याचा अर्थही ‘खेळ’ असाच होतो. हा खेळ मला ‘झिम्म्या’सारखा वाटतो. कारण त्यात आपल्या पारंपारिक ‘झिम्म्या’त असणाऱ्या अनेकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. सर्व कलाकार, लेखक, दिग्दर्शक, बॅकस्टेजची मंडळी, तांत्रिक सहाय्य… आणि प्रेक्षकही. या खेळाला लय-ताल असतो. भाव-भावना, मूर्त-अमूर्त, सत्य-असत्य याने भरलेला हा खेळ! मी झिम्मा खूप खेळले. रसिकांच्या मनात तो गुंजत राहिला तर एखाद्या रंगलेल्या प्रयोगासारखा साकार होईल.’ विजयाबाईंच्या रंगलेल्या ‘नाट्य झिम्मा’ला सलाम!

  — संजय डहाळे

  sanjaydahale33@gmail.com