सिनेरंग : सिनेमाचे आधुनिक तांत्रिक पाऊल; व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ

चित्रपट हे दृश्य माध्यम एकाच वेळेस अनेक स्तरांवर वाटचाल करत आहे, काही महत्त्वपूर्ण टप्पे साध्य करीत आहे. ही प्रगती लेखनापासून पडद्यावर चित्रपट पोहचण्यापर्यंत बहुस्तरीय आहे. अगदी सुरुवातीला चित्रपटातील व्यक्तिरेखा नाटकाप्रमाणे संवाद म्हणत आणि अनेकदा तरी कॅमेरा एकाच जागेवर ठेवून दृश्ये चित्रीत केली जात.

    आज आपण शंभरपेक्षा जास्त वर्षांच्या कालावधीनंतर अनेक बाबतीत खूपच पुढे आलो आहोत आणि ते अगदी स्वाभाविक होतेच. याचे कारण म्हणजे, एकेक करीत चित्रपट निर्मित होत नव्हती. तर या माध्यम व व्यवसायात नवीन असे काय करता येईल याकडेही अनेकांचे विशेष लक्ष होते. आता ही प्रगती भारतातील पहिला व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ मुंबईत उभारण्यापर्यंत झाली आहे.

    दहिसर येथे पन्नास हजार स्क्वेअर फूटांमध्ये हा आधुनिक तंत्रज्ञानातील चार मजली स्टुडिओ उभारण्यात आला असून प्रत्येक मजल्यावर एक चित्रपट अशा पध्दतीने चार चित्रपट निर्माण करता येतील. विशेष म्हणजे अशा तंत्रज्ञानाने निर्माण केलेला विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘जुदा हो के भी’ हा चित्रपट देशविदेशातील मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित झालादेखील आणि त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर महेश भट्ट, विक्रम भट्ट आणि के सेरा सेरा प्रॉडक्शनचे अध्यक्ष सतिश पंचारिया यांनी मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांसोबत या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल ज्या गप्पा केल्या आणि जी माहिती दिली ती थक्क करुन टाकणारी होती.

    आता याच पध्दतीने आणखीन दोन चित्रपट निर्माण होत आहेत. एक चित्रपट ‘कायलोन’ हा असून तो एकाच वेळेस हिंदी व इंग्लिश अशा दोन भाषेत निर्माण होत आहे. विक्रम भट्ट त्याचे दिग्दर्शन करीत आहे. तर दुसरा चित्रपट त्याची मुलगी कृष्णा भट्ट दिग्दर्शित करीत असून त्या चित्रपटाचे नाव ‘१९२० हॉरर ऑफ द हार्ट’ असे आहे. या चित्रपटात अविका गोर आहे. “१९२०’ या भयपटाचा हा सिक्वेल आहे.

    नाटकाकडून चित्रपटाकडे अथवा संवादसह दृश्य माध्यमाकडे, असा चित्रपटाचा प्रवास सुरु झाला आणि बदलत्या काळाबरोबर ‘सिनेमा चित्रीत करण्याच्या पध्दती बदलल्या’. कॅमेरा तंत्रज्ञानाबाबत सांगायचे तर मॅजिक लॅटर्न ते व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ असा हा दीर्घ प्रवास सुरु आहे. त्यावरचा मूळचा नाटकाचा प्रभाव बोथट होत गेला. सुरुवातीच्या काही चित्रपटात जणू ‘नाटकाचे दृश्य’ चित्रीत केल्याचा अधूनमधून फिल येतो. तो मग मागे पडायला सुरुवात झाली.

    मॅजिक लॅटर्न म्हणजे काय? तर १८३२ साली जोसेफ प्लेताव या बेल्जियम शास्रज्ञाने दृष्टी आणि गती यांचे गणित जमवले. प्रथम एक चित्र दाखवायचे, मग एक काळी फ्रेम, मग तसेच पण थोडे बदललेले चित्र असे वेगाने दाखवत त्याने हलत्या चित्रांची जादू दाखवायला सुरुवात केली. हे म्हणजे, मॅजिक लॅटर्न… फ्रान्स युरेशियस या ऑस्ट्रियन सैनिकाने ‘मॅजिक लॅटर्न’ दाखवताना मेणबत्तीऐवजी चुन्याची कांडी वापरली.

    भारतात मदनराव माधवराव पितळे यांनी स्लाईडसच्या माध्यमातून कथा सांगण्याचा प्रयत्न केला. कल्याणच्या महादेव गोपाळ पटवर्धन यांनी मॅजिक लॅटर्नचा विकास केला आणि त्यांनी पौराणिक व्यक्तिरेखा काचेच्या पट्ट्यांवर हाताने रेखाटायला सुरुवात केली. आणखीन एक विशेष म्हणजे रामायणातील जादूटोणा करणारा शंबरासूर आणि अमरकोशात दिव्याला दिलेला पर्यायी शब्द खरोलिका या दोन्ही शब्दांना एकत्र करुन मॅजिक लॅटर्नला पर्यायी मराठी शब्द केला, “शांबरिका खरोलिका’.

    चित्रपटाचे जनकत्व याच शांबरिका खरोलिकाला दिले जाते. १८७८ मध्ये एडवर्ड मायब्रिज याने सनफ्रान्सिस्को येथे घौडदौड चित्रीत करुन ती झोईट्रोप या आपल्या प्रोजेक्टरव्दारे दाखवली. जॉन ईस्टमनने याच माध्यमात आणखीन संशोधन केले; तर विल्यम डिक्सन यांनी ईस्टमनची फिल्म वापरून १८८९ मध्ये किनेटोग्राफ कॅमेरा बनवला. युरोप अमेरिकेत ‘मॅजिक लॅटर्न’चे खेळ लोकप्रिय होत असताना आणि मेब्रिज-मरे, एडिसन-डिक्सन-लॅथम हे यात काही प्रयोग करीत होते. १८६० साली युरोपमध्ये ‘फिल्म’चा शोध लागला. १८७८ साली एडवर्ड मायब्रिज यांनी सॅनफ्रान्सिको येथे घौडदौड चित्रीत करुन ती झोईट्रोग या प्रोजेक्टव्दारे दाखवली.

    आपल्या देशात चित्रपटाचा पहिला खेळ मंगळवार दिनांक ७ जुलै १८९६ रोजी दक्षिण मुंबईतील वॅटसन हॉटेलमध्ये फ्रान्सच्या ल्युमिए बंधुंनी दाखवला. ‘अरायव्हल ऑफ द ट्रेन” इत्यादी लघु मूकपट तेव्हा दाखवण्यात आले आणि अशी चालती फिरती दृश्ये पाहून प्रेक्षक अचंबित झाले. सावेदादा यांनी आपणही चलच्चित्रांचे खेळ सुरु करावे असे ठरवले. त्यांनी लंडनमधल्या रिले ब्रदर्सकडून कॅमेरा २१ गिनिज मागवून घेतला.

    दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ (प्रदर्शन ३ मे १९१३) निर्माण केला आणि या प्रयोगशीलता आणि प्रयत्नांना दिशा मिळाली. दादासाहेब फाळके यांच्या हिन्दुस्तान फिल्म कंपनीची चित्रपट निर्मिती सुरु होतीच. आता आर्यन फिल्म कंपनी, प्रभात फिल्म कंपनी इत्यादींनी चित्रपट आणखीन पुढे नेला. अशातच दिग्दर्शक चित्रपती व्ही. शांताराम यांनी ‘अयोध्येचा राजा’ (रिलीज ६ फेब्रुवारी १९३२) हा पहिला मराठी तर दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांनी ‘आलम आरा’ (१९३२) हा पहिला हिंदी चित्रपट निर्माण केला. ते करताना कॅमेरा जोडीला साऊंड सिस्टीमही आली.

    प्रभात फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’च्या (१९३३) वेळेस या चित्रपटावर रंगीत प्रक्रिया करण्यासाठी दिग्दर्शक व संकलक व्ही. शांताराम जर्मनीला गेले. या चित्रपटाच्या रसायन व रंगीत आवृत्तीचे काम जर्मनीमधील उफा स्टुडिओत झाले. के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल-ए-आझम’ (१९६०) या कृष्ण धवल चित्रपटात त्या काळात फक्त ‘प्यार किया तो डरना क्या’ हे काचमहालातील मधुबालाचे नृत्य तेवढे रंगीत होते. पहिला यशस्वी मराठी रंगीत चित्रपट म्हणून व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ (१९७२) हा ठरला. गुरुदत्त दिग्दर्शित ‘कागज के फूल’ (१९६४) हा आपला पहिला सिनेमास्कोप चित्रपट ठरला.

    पांछी दिग्दर्शित पांछी दिग्दर्शित ‘अराऊंड द वर्ल्ड’ (१९६७) हा आपल्याकडचा पहिला सत्तर एम. एमचा चित्रपट. तो पस्तीस एम. एम. मध्ये चित्रीत करण्यात आला होता. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५)ची सत्तर एमएमची प्रिन्ट लंडनमधल्या लॅबमधून तयार करुन घ्यावी लागली. तोही पस्तीस एम एममध्येच चित्रीत करण्यात आला. आणि त्याची सत्तर एमएमच्या प्रिन्ट मोजक्याच होत्या.

    पूर्वी निगेटीव्हवर चित्रपट चित्रीत होई आणि चारशे फित चित्रीत होईल असा एक डबा असे. ऐंशीच्या दशकात ARRIFLEX 435 हा कॅमेरा वापरला जाई. त्यात निगेटीव्ह सेफ असे. १९९५ साली ARRIFLEX 435 ES हा कॅमेरा आला. २००१ साली याच कॅमेराचे EXTREME मॉडेल आले. त्यात इलेक्ट्रॉनिक शटर आले. एकाच दृश्यासाठी ९६ ते १२० फ्रेम्स अथवा प्रतिमा मिळू लागल्याने कामाची गती वाढली. २००१ साली याच कॅमेराचा अॅडलॅब प्रकार आला. एलडी सिस्टीमही आली. २००३ साली एरिक सिस्टीमही आली. २०१० ला सुपर डिजिटल क्लासिक कॅमेरा आला, शूटिंगच्या वेळेचे आजूबाजूचे आवाजही कॅमेरा अव्हाईड करु लागला. २०१८ मध्ये एरिका अॅलेक्स दृश्य अगदी शार्प चित्रीत होऊ लागले. एक गोष्ट खूपच महत्वाची आहे, व्ही. शांताराम, राज कपूर यांसारखे दिग्गज दिग्दर्शक म्हणत, चित्रपट टेबलावर बनतो/घडतो, ते म्हणजे पटकथा आणि संकलन…

    स्क्रीनवर हवा तो काळ, देश विदेशातील हवी ती छोटी-मोठी जागा, हवे तसे कला दिग्दर्शन, हवे ते स्पॉट, हवे तसे गाव, शहर, रस्ता, नदी, हवेली निर्माण करायचे, सगळेच कसे आभासी जग निर्माण करायचे आणि त्यातून दृश्ये निर्माण करायची. ती पटकथेनुसार कॅम्युटरवर एडिट करायची आणि चित्रपट आकाराला आणायचा.

    ‘जुदा हो के भी’ हा त्यात पहिला प्रयत्न अथवा पहिला प्रयोग होता. तो प्रेक्षकांना आवडला. याचीच दुसरी बाजू म्हणजे, अशा प्रकारच्या चित्रपटाच्या निर्मितीचे बजेट अगदी कमी असते. मोठ्या स्टारचे नखरे आणि मानधन पेलायला नको. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा चित्रपटांना भवितव्य आहे.

    अनेक चित्रपटात होत असलेला व्हीएफएक्स याचा वापर रसिकांना एव्हाना चांगलाच परिचित झाला आहे. विशेषत: दक्षिणेकडील बाहुबली (दोन्ही भागात), पुष्पा, आर आर आर, केजीएफ (दोन्हीत) खूपच मोठ्याच प्रमाणावर आणि तितक्याच कल्पकतेने व्हीएफएक्सचा वापर करण्यात आल्याचे सर्वज्ञात आहे.

    तात्पर्य, तांत्रिक प्रगती विचारात घेऊनही एखादी चित्रपट कथा रचली जाऊ शकते. तसे करणे दृश्य माध्यमात शक्य असते. ‘कॅमेरा’ची गोष्ट अशी बहुरंगी आहे. ती अशीच अनेक वळणे घेत घेत बरीच पुढे जाणार आहे.

    दिलीप ठाकूर

    glam.thakurdilip@gmail.com