‘माझे सहकारी, माझी चित्रपटसृष्टी, चित्रपट निर्मितीशी संबंधित प्रत्येक विभागात एकूण एक व्यक्तिला हा पुरस्कार समर्पित करते’… त्रेपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यावरची वहिदा रेहमान यांची ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी. ज्या माध्यम आणि व्यवसायाने आपल्याला घडवले त्याची उत्तम जाण ठेवल्याचे प्रतिक आहे. वहिदा रेहमान यांच्या अतिशय सालस (कोणी ‘सादगी’ असंही म्हणतात) स्वभावाचे दर्शन त्यात घडते.
विविध प्रकारच्या कार्यक्रमाची रेलचेल सुरु
योगायोग कसा असतो यापेक्षा असावा ते बघा, देव आनंदच्या २६ सप्टेंबर या शंभराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक शहरांत विविध प्रकारच्या कार्यक्रमाची रेलचेल सुरु असतानाच वहिदा रेहमान यांना भारत सरकारच्यावतीने दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
देव आनंद जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम
वहिदा रेहमान यांनी आपल्या या नायकाचीही आठवण काढत आपल्या परिपक्वतेचे दर्शन घडवले. आणखीन एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, देव आनंद जन्मशताब्दीनिमित्त देशभरातील पीव्हीआर आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये देव आनंदची भूमिका असलेल्या चार चित्रपटांचे आयोजन करण्यात आले असता त्यात विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’चाही समावेश होता.
जुहूच्या मल्टीप्लेक्समधील या शोला वहिदा रेहमान आवर्जून हजर होत्या. त्या पुन्हा एकदा आपली भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यास विलक्षण इच्छुक आहेत हे त्यांच्या एकूणच देहबोलीत मला जाणवलं. त्यांच्याच शुभ हस्ते देव आनंद चित्रपट महोत्सवासाठी समई प्रज्वलित करण्यात आली. मग त्यांना काही बोलण्याची विनंती करण्यात आली तेव्हा त्या अतिशय आतुरतेने ‘चित्रपट सुरु करा’ असं म्हणाल्या. मध्यंतरातही त्यांना अनेक जण आवर्जून आस्थेने भेटले. काहींना स्वाक्षरी दिली. तेव्हाही त्या मध्यंतरानंतरचा ‘गाईड’ पाहण्यास विलक्षण इच्छुक दिसल्या.
दहा चित्रपटांतील एक क्लासिक चित्रपट
‘गाईड’ हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर इतिहासातील सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांतील एक क्लासिक चित्रपट. आणि त्यातील वहिदा रेहमान यांनी साकारलेली ‘रोझी’ची व्यक्तिरेखा फक्त आणि फक्त त्याच साकारु शकल्या असत्या हे त्यांचे वैशिष्ट्य. आतापर्यंत त्यांनी अनेकदा तरी ‘गाईड’ अनुभवला आणि आताही त्यांनी अतिशय उत्कटतेने तोच चित्रपट पुन्हा एकदा पाहिला याचाच अर्थ त्या या चित्रपटाशी आणि त्यातील आपल्या ‘रोझी’च्या अवघड भूमिकेशी विलक्षण एकरुप झाल्या आहेत. आपल्या कलाकृतीवर, कामावर असे प्रेम हवे.
त्यांनी भूमिका साकारत आपला ठसा उमटवला
वहिदा रेहमान यांच्या यशस्वी, चौफेर, अष्टपैलू व खोलवर यशाचे विशेष म्हणजे, त्यांनी भूमिका साकारलेल्या चित्रपटात क्लासिक कलाकृतींची संख्या विशेष लक्षणीय आहे. गाईडप्रमाणेच प्यासा, कागज के फूल, चौदहवी का चांद, साहिब बीवी और गुलाम, मुझे जीने दो, तिसरी कसम, रेश्मा और शेरा, खामोशी… कलाकाराचे प्रगती पुस्तक असावे तर हे असे. त्याशिवाय सी. आय. डी., नीलकमल, राम और श्याम, बीस साल बाद, कोहरा, पत्थर के सनम, आदमी अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारत आपला ठसा उमटलाय. विशेष उल्लेखनीय गोष्ट, ‘प्रेम पुजारी’ (१९७०) पासून देव आनंद चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकताच वहिदा रेहमान यांनी त्याच्या चित्रपटात आवर्जून भूमिका साकारली. चरित्र भूमिकेतही त्यांनी अदालत, कभी कभी, धर्मकांटा, मशाल, चांदनी, लम्हे, रंग दे बसंती, दिल्ली ६ इत्यादी चित्रपटातून त्यांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल पुढे कायम ठेवली. म्हणजेच विजय आनंद, गुरुदत्त, राज खोसला ते राकेशकुमार मेहरा आणि यश चोप्रा ते सुल्तान अहमद असा त्यांचा दिग्दर्शनीय प्रवास आहे.
चोखंदळ भूमिका व उत्तम नृत्य अदाकारा
चोखंदळ भूमिका व उत्तम नृत्य अदाकारा ही त्यांची विशेष ओळख. ‘गाईड’मधील त्यांची व्यक्तिरेखा त्याच पठडीतील. त्यात त्यांच्या बहारदार नृत्याचा प्रत्यय कांटो से खीच के यह आंचल, पिया तो से नैना लागे रे, मोसे छल या प्रत्येक नृत्य गीत संगीतात येतोच. यासह त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या विविधस्पर्षी अनेक सर्वकालीन लोकप्रिय गाण्यांचा उल्लेख करायचा तर, वक्त ने किया क्या हसीन सितम (कागज के फूल),
रात भी है कुछ भीगी भीगी (मुझे जीने दो), कल के सपने आज भी आना (आदमी), यह नयन डरे डरे (कोहरा), अथवा जरा नजरो से कहदो जी (बीस साल बाद), बाबुल की दुवाए लेती जा (नील कमल), मेहबूब मेरे मेहबूब मेरे (पत्थर के सनम), जादुगर तेरे नैना (मन मंदिर), चौदहवी का चांद हो (चौदहवी का चांद), शोखियो मे घोला जाए, रंगिला रे तेरे रंग मे (प्रेम पुजारी), प्यार को प्यार ही रहने दो (खामोशी) इत्यादी. वहिदा रेहमान यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा तसा निमित्तमात्र घेतलेला थोडक्यात वेध. यावरुन त्यांच्या यशोगाथेतील विविधता व उंची विलक्षण आहे हे लक्षात येते.
वहिदा रेहमान यांचे दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी पुन्हा एकदा अभिनंदन. चित्रपट चाहत्यांकडून या गोष्टीचे अतिशय उत्फूर्तपणे स्वागत करण्यात आले हेदेखील त्यांचे यशच.- दिलीप ठाकूर