mahaparinirvan din

भूतकाळाचा फारसा विचार न करता गंजलेले, गाजलेले आणि गांगरलेले सगळेच नेतृत्व नेते नाकारावे लागतील. याचे कारण म्हणजे विद्यमान जे नेते आहेत त्यांचे पारंपरिक अनुयायी त्यांच्या मागे उभे आहेत. आम आंबेडकरी जनता कुणाचेही नेतृत्व एकमुखी स्वीकारायला तयार नाही. नव्या नेतृत्वाने हे पक्ष उभारणीचे धाडस केले तर सुविधा आणि साधने देणारे असंख्य हात त्यांच्या पाठीशी उभे राहतील.

अर्जून डांगळे 

आज देशातील किंवा महाराष्ट्रातील सत्ताकारणात रिपब्लिकन चळवळीला किंवा विचारांना नगण्य देखील स्थान नाही. आज देशात डोके वर काढणा­ऱ्या सांप्रदायिक व धर्मांध शक्तींच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय चिंताजनक अशी बाब आहे. ज्यांना ज्यांना वाटते की रिपब्लिकन विचार किंवा आंबेडकरी चळवळ(ambedkari movement) समर्थपणे आणि स्वाभिमानाने उभी राहून राजकीय सत्ता स्पर्धेत उभी राहावी, त्यांनी महापरिनिर्वाणदिनी  केवळ बाबासाहेबांसमोर(dr. babasaheb ambedkar) अभिवादन करताना मेणबत्ती पेटवून थांबता कामा नये. तर राजकीयदृष्ट्या त्यांनी अत्त दीप भव व्हावे हे अपेक्षित आहे.

६ डिसेंबर हा बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीवर अभिवादन करणाऱ्या या दलित-मागास जनतेला आजच्या महापरिनिर्वाण दिनी प्रत्यक्ष तिथे जाऊन अभिवादन करता येणार नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे असे होणे सहज स्वाभाविक आहे. हे लाखो लोक महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येतात. होय, भक्तीभावाने येतात, पण कुठलाही नवस फेडण्यासाठी येत नाहीत तर बाबासाहेबांनी अन्यायाविरुध्द लढण्याची जी प्रेरणा दिली, तिला ऊर्जा मिळावी आणि बाबासाहेबांनी आपल्याला माणूस बनविले ही कृतज्ञता प्रज्वलीत करण्यासाठी तिथे येतात. दरवर्षी अपेष्टा सोसत संयमाने येतात.

डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त(mahaparinirvan din) हा प्रचंड जनसमुदाय पाहिला किंवा त्यांच्या जयंतीनिमित्त होणारे सोहळे पाहिल्यानंतर मनाला साहजिक एक प्रश्न पडतो आणि खंत वाटते. हा प्रचंड जनसमुदाय जो एकेकाळी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या अनेक राज्यांत एक सामर्थ्यशाली राजकीय शक्तीत परावर्तीत झाला होता. या शक्तीला विचारात घेतल्याशिवाय सत्तेचा पट उभा राहू शकत नव्हता. तो आज बेदखल होताना दिसतो आहे. विशेषत: महाराष्ट्रात ही सल अधिक जाणवते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ साली स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाला त्या काळी बऱ्यापैकी यश मिळाले होते. त्यानंतरच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला व्याप्ती मोठी असूनही पाहिजे तसे संसदीय राजकारणात यश मिळाले नाही. पण महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या आदेशानुसार संयुक्त महाराष्ट्र समितीत सामील झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला मिळालेले निवडणुकीतील यश लक्षणीयच होते. सत्ता स्पर्धेच्या राजकारणातदेखील रिपब्लिकन पक्षाला पर्यायाने आंबेडकरी चळवळीला एक प्रतिष्ठा होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या अनुयायांना लढण्यासाठी दोन हत्यारे दिली. त्य़ांनी आपल्या अनुयायांसह नागपूर मुक्कामी बौद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार केला. कारण शेकडो वर्षे इथल्या धर्म व्यवस्थेच्या नावाखाली चौकटीतील जी बंदीस्त समाज व्यवस्था उभारली होती; तिच्या एका मानसिक गुलामगिरीत दलित समाज जखडला होता. त्याला या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी समतावादी मुल्यांवर आधारित कर्मकांड न करणारा असा बुध्द धम्माचा पर्याय दिला होता. बाबासाहेबांना जाणीव होती की केवळ मानसिक गुलामगिरीतून मुक्त करुन या समाजाची मुक्ती, उन्नती होणार नाही. तर त्यांचे भौतिक प्रश्न, त्याच्या रोजीरोटीचे प्रश्न, अन्न वस्त्र निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक सामाजिक राजकीय हत्याराचा पर्याय सुद्धा दिला होता आणि त्याचे नाव होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आज या दोन्ही गोष्टींकडे बघितल्यास बाबासाहेबांच्या अनुयायांना खंत वाटणे साहजिक आहे. कारण आपण स्वत:च्या सामर्थ्यावर सत्तेच्या आसपास देखिल पोहचू शकलो नाही. समाज परिवर्तनाच्या चळवळीला आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला सामाजिक, सांकृतिक जीवनमुल्यांना इथल्या जनमानसात रुजवू शकलो नाही. अर्थात याला काही सन्माननीय अपवाद असू शकतील. नव्हे आहेतच. पण आंबेडकरी चळवळीचे बहुतेक सर्व थरातले सामर्थ्य लयाला गेले नसले तरी क्षीण होताना दिसते, हे वास्तव नाकारता येत नाही.

‘आम्ही बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी आहोत. आम्हाला सत्ता नको पद नको, आम्ही बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ’ असे सांगणारे लोक भंपक आहेत. अत्यंत व्यक्ती केंद्रीत विचार करणारे आहेत. एकुणच बाबासाहेब आंबेडकर यांच्या रणनीतीचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की संसदीय राजकारण आणि निवडणुका यापासून ते कधी अलिप्त राहिले नाहीत. लोकशाहीचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. निवडणुकीत सत्तेच्या जवळपास पोहचण्यासाठी त्यांनी आपली राजकीय संघटना प्रभावी आणि व्यापक, सर्वसमावेशक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्वतंत्र मजूर पक्ष, शे.का. फेडरेशन चे जाहिरनामे किंवा भूमिका बघितल्यास याची प्रचिती येईल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निमित्ताने त्यांनी भारतीय जनतेला उद्देशून खुले पत्र लिहिले आहे, ते पाहिल्यास आणि रिपब्लिकन पक्षाची जी संकल्पना मांडली, तो त्यांच्या भूमिकेचा भाग होता. कारण सत्ता समाज परितर्वनासाठी राबवली गेली पाहिजे अशी त्यांची धारणा होती. आजपर्यंत देशात किंवा महाराष्ट्रात जे सामाजिक, सांस्कृितक आर्थिक पातळीवर परितर्वन झाले आहे त्यात जरी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेचा भाग असला तरी आंबेडकरी चळवळीच्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतला जो रेटा आहे त्याला देखील महत्त्व आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आज हा रेटा देखील कमी झाला आहे. किंबहुना आंबेडकरी चळवळ ही फेसबुक, व्हाट्स ॲप, यू ट्यूबवर जिवंत दिसत असली तरी सत्तेच्या राजकारणात अस्तित्वहीन होत चाललेली आहे. हे सत्य नाकारता येणार नाही.

याला जबाबदार कोण ? याचा विचार करण्यापूर्वी प्रचलित राजकारणाचे वास्तव समजून घेतले पाहिजे. आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्या सरकारमध्ये किंवा सभागृहामध्ये आंबेडकरी चळवळीतील किंवा रिपब्लिकन पक्षाचा जनतेने निवडून दिलेला एकतरी आमदार आहे काय? संसदेत खासदार आहे काय? किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आंबेडकरी, रिपब्लिकन बाण्याचे किती उमेदवार जनता निवडून देते? याच्या पलिकडे जाऊन मला असे विचारावेसे वाटते की जे देशात किंवा सत्ता स्पर्धेत पक्ष आहेत ते रिपब्लिकन पक्षातील गटा-तटांना कोणत्या प्रकारची वागणूक देतात, याचे देखील वैषम्य कोणाला वाटत नाही. ही केवळ रिपब्लिकन चळवळीची अधोगती नसून आंबेडकरी विचारांची अधोगती आहे असेच म्हणावे लागेल.

आज देशातील किंवा महाराष्ट्रातील सत्ताकारणात रिपब्लिकन चळवळीला किंवा विचारांना नगण्य देखील स्थान नाही. आज देशात डोके वर काढणा­ऱ्या सांप्रदायिक व धर्मांध शक्तींच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय चिंताजनक अशी बाब आहे. ज्यांना ज्यांना वाटते की रिपब्लिकन विचार किंवा आंबेडकरी चळवळ समर्थपणे आणि स्वाभिमानाने उभी राहून राजकीय सत्ता स्पर्धेत उभी राहावी, त्यांनी या महापरिनिर्वाणदिनी केवळ बाबासाहेबांसमोर अभिवादन करताना मेणबत्ती पेटवून थांबता कामा नये. तर राजकीय दृष्ट्या त्यांनी अत्त दीप भव व्हावे हे अपेक्षित आहे.

रिपब्लिकन गटा-तटांचे ऐक्य करून सामर्थ्यशाली रिपब्लिकन पक्ष उभा करू हा विचार आता कालबाह्य झाला आहे. अशा प्रयत्नांमध्ये दोन पिढ्या बरबाद झाल्या आहेत. तरी रिपब्लिकन याच नावाने निळ्या ध्वजाखाली आंबेडकरी विचारांची चळवळ समर्थपणे आणि संघटितपणे उभी राहण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. असे मला वाटते. याआधी असे प्रयत्न उभे रािहले होते. एक होता दलित पँथरच्या रूपाने आणि दुसरा होता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या रूपाने. हे पर्याय सातत्यपूर्ण टिकले का नाहीत याची मीमांसा मी करत नाही. भूतकाळात रममाण होण्याऐवजी वर्तमानाचा सम्यक दृष्टीने वेध घेऊन भविष्यकाळ घडविण्याची जिद्द महत्त्वाची आहे आणि त्यासाठी गरज आहे ती या पिढीतील आंबेडकरी मूल्य विचारांचे ज्यांना आकलन झाले आहे अशा तरुण कार्यकर्त्यांनी एक ठोस भूिमका घेऊन उभे राहण्याची. जिद्द, कष्ट आणि बांधिलकी या तर मूलभुत गोष्टी आहेतच, पण धाडस देखील लागेल.

भूतकाळाचा फारसा विचार न करता गंजलेले, गाजलेले आणि गांगरलेले सगळेच नेतृत्व नेते नाकारावे लागतील. याचे कारण म्हणजे विद्यमान जे नेते आहेत त्यांचे पारंपरिक अनुयायी त्यांच्या मागे उभे आहेत. आम आंबेडकरी जनता कुणाचेही नेतृत्व एकमुखी स्वीकारायला तयार नाही. नव्या नेतृत्वाने हे पक्ष उभारणीचे धाडस केले तर सुविधा आणि साधने देणारे असंख्य हात त्यांच्या पाठीशी उभे राहतील. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रचलित सामाजिक, सांस्कृितक, आर्थिक, धार्मिक संबंधातील संदर्भ ताण-तणाव हे समजून घ्यायला हवे. एका नव्या राजकीय परिप्रेक्षात हे पाऊल उचलणे ही काळाची गरज आहे. कारण हे की आज असे दृष्य दिसत आहे की आंबेडकरी विचार तत्त्वज्ञान सार्वत्रिक होत आहे, पण त्या विचारांचे तत्त्वज्ञानाचे मजबूत संघटन मात्र दिसत नाही. परिणामी: सत्तेच्या परिघात आंबेडकरी विचारांची व्हावी तितकी दखल घेतली जात नाही. आज विशेषत: संविधानाशी छेडछाड चालली असताना आपण अशी पावले न उचलता थंडपणे बघत राहणे हे आंबेडकरी विचारांशी द्रोह करण्यासारखेच आहे.

हे काम जिकीरीचे आहे. ही काही ताबडतोब होणारी गोष्ट नाही. आंबेडकरी चळवळीचे भविष्य घडविण्यासाठी तरुणांची जी फौज उभी राहिल, त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणत्यातरी पक्षाच्या वळचणीला जाऊन, त्यांचे आश्रित होऊन सत्तेत स्थान मिळविण्याचे टाळले पाहिजे. दुसरी गाेष्ट म्हणजे वृथ्था स्वाभिमान आणि अहंकार हा सत्ताकारणातील राजकारण करताना आपला पाया असता कामा नये, त्यातून जो एकारलेपणा येतो तो अत्यंत घातक आहे. कारण राजकारण आणि तेही सत्तेचे करण्यासाठी रणनीती ही आवश्यक असते. प्रचंड जनाधार हा रणनीतीला बळ देणारा असतो.

बाबासाहेब स्वत: म्हणाले आहेत की, आपण एकटे राजकारणात कदापि यशस्वी होऊ शकत नाही. आपणाला मित्रांची गरज आहे. केवळ आंबेडकरी चळवळीला किंवा रिपब्लिकन पक्षाचे मित्रांची गरज आहे असे नाही. तर, आज सगळेच पक्ष मित्रांच्या शोधात आहेत. आघाडी किंवा युती हा आजच्या राजकारणाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपल्याला हे आघाडीचे राजकारण करावे लागेल. पण या आघाडीच्या राजकारणात सन्मानाने राहायचे असेल तर पहिल्यांदा नजीकच्या भविष्यात गतिमान आणि सामर्थ्यवान आंबेडकरी विचारांवर आधारित रिपब्लिकन चळवळ उभी करावी लागेल. आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने विचार करून निग्रही पावले उचलली तर बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्यासारखे होईल.

– लेखक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आणि प्रख्यात साहित्यिक आहेत.