अभ्यासपूर्ण संशोधनात्मक ग्रंथ

मुंबई महानगराच्या सांस्कृतिक परंपरेत उपनगरातील विलेपार्ले स्थानक हे एक महत्त्वाचे नाव. मराठी भाषिक रहिवाशांचे वर्चस्व व मराठी संस्कृतीचा ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने विलेपार्ले नेहमीच अग्रेसर राहिले आहे. अशा या पारल्याचा ‘गाव ते उपनगर’ हा चित्रमय प्रवास दाखवणारे ‘पारले: ज्ञात-अज्ञात’ हे पुस्तक विलेपारल्याच्या मातीत मळलेल्या संदीप दहिसरकर यांनी लिहिले आहे.

  प्राचीन काळ व मध्ययुगीन काळातील साष्टी बेटावरील आजच्या पारल्याच्या लगतची नगरे उदा. मरोळ, मालाड, मढ, ओशिवरा, जुहू यांसह इतर स्थळातील पुरातत्त्वीय साधने; तसेच महिकावतीची बखर हे मध्ययुगातील वाङ्मयीन साधन यांचा सखोल अभ्यास करून भूतकाळ आणि वर्तमानाचा सचित्र वेध ‘पारले: ज्ञात-अज्ञात’ या पुस्तकात घेतला आहे.
  संदीप दहिसरकर हे पुरातत्त्वशास्त्र आणि इतिहास या विषयाचे अभ्यासक आहेत. त्यांच्यातील अभ्यासकाने संशोधनाची जोड देत टिळकप्रेमी उपनगरातील जुनी पिढी, पुनर्विकासाच्या नव्या लाटेमुळे हळूहळू हरवत व बदलत चाललेल्या जुन्या पारल्याच्या पाऊलखुणा या पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध केल्या आहेत. त्या करताना नवी-जुनी छायाचित्रे, रेखाचित्रे, अभिलेखागारातील जुने दस्तऐवज यांचा अभ्यास करून अत्यंत परिश्रमपूर्वक हे सर्व वाचकांसमोर आणले आहे.
  दहा-वीस वर्षापूर्वींचे पारले आणि आताचे पुनर्विकासाच्या गतिमान लाटेत दुमजली बंगल्यांचे टॉवर संस्कृतीत परिवर्तन होणारे पारले; असे असले तरी नवीन बदलांना सामोरे जात, जुन्या-नव्याचा समतोल साधत नवीन युगातील बदल स्वीकारत उद्योग जगत, कला, प्रांत, शैक्षणिक, सांस्कृतिक जगतात आधुनिक संस्कृतिचा ठेवा मिरवत दिमाखात उभे असणारे पारले या पुस्तकांतून वाचायला मिळते.

  सहित प्रकाशनने प्रकाशित केलेल्या २०० पानांच्या या पुस्तकात विलेपारल्याची अडीचशेहून अधिक दुर्मीळ छायाचित्रे आहेत. ‘साष्टी बेट आणि पारल्याचा इतिहास’, ‘जुहू गावचा इतिहास ते नवे पारले’, ‘बदलते पारले’ अशा प्रकरणांमधून इतिहासाचे भान राखत विविध अभिलेख व दस्तऐवजांचा सूक्ष्म अभ्यास करून अनेक शतकांचा प्रवास अत्यंत रंजक पद्धतीने या पुस्तकात आला आहे.

  ‘साष्टी बेट आणि पारल्याचा प्राचीन इतिहास’ या प्रकरणात पारल्याच्या जवळपास असणाऱ्या साष्टी बेटाचा इतिहास, तिथले वाडे, वस्त्या आदींची रंजक माहिती मिळते. महिकावतीची बखर किंवा बिंबाख्यानात पारल्याचा पहिला उल्लेख ‘पाटळे’ असा होतो. ‘जुहू गावाचा इतिहास’ या लेखात जुहू चौपाटी आणि बॉलीवूड सिनेतारकांच्या बंगल्यापलीकडे (आपल्याला माहीत असलेली) ओळखीचा इतिहास मांडला आहे. इ. स. १९०८ पर्यंत जुहू हे एक बेट होते. येथील लोक उत्तरेकडून अंधेरीला दक्षिणेकडून वांद्र्याला जात असत. रघुनाथ पुतळाजी राणे यांनी बिंबाख्यानात दिलेल्या ‘एक वंश’ या प्रकरणातील राणे घराण्याचा इतिहास कशाच्या आधारे लिहिला याला पुरावा नसला तरी माहितीच्या आधारे साष्टी बेटावरचे हे गाव पुढे इंग्रजांच्या काळात वाढले असा निष्कर्ष त्यांनी मांडला आहे.

  ‘पारल्याची वसाहत आणि स्थापत्य’ या प्रकरणात मनोरंजक माहिती आहे. साष्टी बेटाच्या नैऋत्य भागात वसलेल्या गावांचा उल्लेख यात आहे. २८ मार्च १९१८ रोजी शेठ गोवर्धनदास तेज‌पाल व बापूजी महादेव महंत यांच्या पुढाकाराने साष्टी बेटातील गावांचा विकास झाला व पुढे ही वस्ती वाढली. मुख्य म्हणजे यासासाठी लेखकाने तब्बल बाराशे वर्षांपूर्वींच्या ऐतिहासिक नोंदींचे तपशील काही छायाचित्रे, पत्रे, नकाशे, सरकारी नोंदी, नगर नियोजन आराखडे वगैरे दुर्मीळ दस्तऐवजांच्या नोंदी संदर्भात दिलेल्या आहेत. ‘पारले टिळक विद्यालय’, ‘लोकमान्य सेवा संघ’ हे पारल्याचे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. लोकमान्य टिळकांच्या या स्मारकांचा सचित्र इतिहास उद्बोधक, प्रेरणादायी व रंजकही आहे.
  या पुस्तकातील ‘पारल्याची बिस्किट फॅक्टरी’ आणि ‘भारतीय कलेत स्वदेशी चळवळीचा उदय’ ही दोन महत्त्वाची प्रकरणे. आबाल वृद्धांना आवडणारे पारले-जी बिस्किट. (जी माने जिनियस) अनेक दशके पारल्याचा आसमंत दळवळणारा पारले-जी ग्लुकोजचा सुगंध एक्स्ट्रा एनर्जी देऊन गेला आहे. पारल्याच्या लौकिकात या पारले-जी ग्लुकोजचा वाटाही मोठा आहे. इ. स. १९२९ साली नरोत्तम मोहनलाल चौहान हे जर्मनीहून साखरगोळ्या, चॉकलेट आदींचे शिक्षण घेऊन भारतात परतले व पारल्यात कायमचे स्थायिक झाले. ६० फुट लांब व ४० फूट रुंदीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेला १२ कर्मचाऱ्यांच्या कारखान्याने पुढे अनेक कुटुंबांना आधार दिला त्याचा माहितीपूर्ण व रंजक इतिहास इथे आहे.
  भगिनी निवेदिता व तरुण शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांची भेट- परिचय ‘स्वदेशी चळवळीचा उदय’ या प्रकरणांत आहे. ‘म्हात्रे यांची प्रतिभा ही एक मोठी राष्ट्रीय संपत्ती आहे आणि भारताच्या वैभवशाली भूतकाळाला साजेशा सुंदरतेच्या रूपात मायासाठी तिला योग्य वाव मिळावा व त्यासाठी कोणतेही प्रयत्न सोडले जाऊ नयेत’ असे गौरवोद्गार भगिनी निवेदिता यांनी काढले होते. म्हात्रे यांनी भारतामधील पाश्चिमात्य शिल्पकारांची मक्तेदारी संपवून बॉम्बेस्कूलमधून भारतीय शिल्पकलेतील नवीन पिढी घडवून त्यांना प्रेरणा दिली. शिल्पकार म्हात्रे यांनी २६० अर्धपुतळे, ६२ पूर्णाकृती पुत‌ळे आणि अश्वारूढ पुतळे बनवल्याची माहिती इथे मिळते. अशा या थोर शिल्पकार असलेल्या कलावंताच्या स्मरणार्थ त्यांचे नाव दिला असलेला असा रस्ता पारल्यात नाही याविषयीचा खेद लेखकाने व्यक्त केला आहे. शिल्पकार म्हात्रे यांच्या कलेविषयी अतीव आदर लेखकाला आहे. त्यांच्या कलेचे संशोधन लोकांसमोर प्रकर्षाने यायला हवे ही तळमळ या लेखातून व्यक्त होताना दिसते.
  पारल्याच्या काही जुन्या वास्तूंच्या आठवणीही यादरम्यान येतात. दीक्षित मार्गावरील धुरंधर यांचे नानी निवास, हनुमान रोडवरील डॉ. प्रभू यांचे ‘प्रभू घर’, सुंदरनिवास इत्यादींची छायाचित्रे इथे आहेत.

  विलेपार्ले गाव ते उपन‌गर हा चित्रमय प्रवास दाखवणारे ‘पारलेः ज्ञात अज्ञात’ हे बहुधा उपनगरीय इतिहास लेखनाचा पहिलाच प्रयत्न असावा. पारल्यातील आर्ट डेको स्थापत्य शैलीतील काही उत्तम इमारतीचे व इतर शैलीतील वास्तूंचे दस्ताऐवज करणे या पुस्तकात आहे. इतकेच नव्हे तर गणेश भुवनचे कंपाऊंडग्रील, चोकसी भुवनचे गेट, तेजपाल रस्त्यावरील पुष्पा बाग, राजपुरिया भवन, अयोध्या निवास येथील रेखाचित्रे यात आहेत. तेजपाल यांच्या मोर बंगल्याचे चित्र मुखपृष्ठावर आहे.
  मुख्य म्हणजे पारल्यातील जी.एम.ई.एस. हायस्कूलमध्ये लेखकाने शालेय शिक्षण घेतले व साठ्ये महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तेथील सर्व शिक्षकांना हे पुस्तक त्यांनी अर्पण केले आहे, यावरून संदीप दहिसरकरांची पारल्याच्या प्रती असलेली निष्ठा, आत्मीयता व तळमळ दिसते. याबद्दल त्यांचे अभिनंदन!
  – प्रा. रघुनाथ राजाराम शेटकर
  raghunathshetkar0@gmail.com

  पारले: ज्ञात-अज्ञात
  लेखक : संदीप दहिसरकर
  मुखपृष्ठ  :  किशोर सहित
  मांडणी : सागर शिंदे
  प्रकाशक : सहित प्रकाशन, गोवा
  पृष्ठ : २००, मूल्य : रु. १०००/-