संरचनावाद…

  विल्हेम व्हुंट यांनी मानसशास्त्राची प्रयोगशाळा उघडून मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये फारच मोठी क्रांती घडवून आणली. यापूर्वी मागील लेखात मनाविषयी, मानसशास्त्राविषयी, संपूर्ण पाश्चात्य संस्कृतीमध्ये झालेल्या विवेचनाचा, वेगवेगळे सिद्धांताचा, आपण धांडोळा घेतला. यापुढील लेखमालेमधून आपण ‘मानसशास्त्र’ हे शास्त्र म्हणून सिद्ध झाल्यानंतर किंवा सिद्ध होत असताना, ज्या वेगवेगळ्या घडामोडी या बौद्धिक क्षेत्रात घडल्या, त्याविषयीचे विवेचन करणार आहोत. १८८० ते १९२० च्या सुमारास ‘मानसशास्त्र’ हे नुकतेच जन्मला आलेले ‘अर्भक-शास्त्र’ मानण्यात आले होते. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारे बरेचसे शास्त्रज्ञ मानसशास्त्राची नेमकी व्याख्या काय असावी?, त्याची व्याप्ती काय असावी?, मानसशास्त्रामधील प्रमुख अध्ययन विषय कोणता? तसेच अध्ययन कशाप्रकारे करता येईल? म्हणजेच मानसशास्त्रात कोणकोणत्या अभ्यास पद्धती आपण वापरू शकतो, या सगळ्या प्रश्नांचा उहापोह करीत होते.

  कोणाच्या मते, मनाची संरचना समजून घेणे महत्त्वाचे होते, तर कोणाच्या मते संवेदना समजून घेणे, कोणीतरी म्हणत होते की, चेतनेचा, संज्ञेचा प्रवाह समजून घेणे, महत्त्वाचे आहे, तर डॉक्टर सिंगमंड फ्रॉईड यांनी, अचेतन मनाची संकल्पना मांडून एक प्रकारे आधुनिक जगाला अलीबाबाची गुहाच जणू उघडून दिली. त्यामुळेच ह्या सगळ्या बौद्धिक गलबल्यामध्ये ‘मन’ ही संकल्पना आधुनिक व आधुनिकोत्तर काळामध्ये कशी वृद्धिंगत होत गेली ? आज नेमके मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे ? आज आपण मनाकडे कशा पद्धतीने पाहतो ? या सर्व गोष्टी आपण विचारात घेणार आहोत. व्हिल्हेम व्हुंट यांच्या मतानुसार मानसशास्त्राची व्याख्या पुढीलप्रमाणे, ‘मानसशास्त्र म्हणजे जाणिवेचा, संज्ञेच्या रचनेचा अभ्यास.’ तसेच बाह्य जगाचे अनुभव घेताना नेमके मनामध्ये कोणते विचार येतात, कोणत्या भावना येतात, कोणते तरंग उठतात, नेमका अनुभव कसा तयार होतो, या सगळ्यांचे विश्लेषण करणे, हेच मानसशास्त्राचे खरे उद्दिष्ट आहे. अर्थात, हे करण्यासाठी या उद्दिष्टाला साजेशी अभ्यास पद्धती देखील लगेच त्यांनी मांडली. ते केवळ अभ्यास पद्धती मांडून थांबले नाहीत तर, त्यांनी आपल्या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सहकार्याने, असे काही प्रयोगही घडवून आणले. भले आज ते प्रयोग खूप साधे वाटत असले, तरी मनाविषयी प्रयोग सुरू झाले ही फारच मोठी गोष्ट होती.

  व्हिल्हेम व्हुंट यांनी वस्तुनिष्ठ आत्मपरिक्षण (Objective Introspection) अशी पद्धती ही मनाची संरचना, अनुभवाची संरचना समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे अशी मांडणी केली. तटस्थपणे (Objective Introspection ) आपल्या मनात डोकावून, आपणच आपल्या मनाच्या संरचनेचे, अनुभवाच्या घटकांचे केलेले सखोल विश्लेषण व प्रामाणिक वर्णन, म्हणजे तटस्थ आत्मपरिक्षण.
  व्हिल्हेम व्हुंट यांनी विद्यार्थ्यांना दगड, खडक, फळ असे छोटे-छोटे पदार्थ देऊन, त्यांचे निरीक्षण करता करता स्वतःच्या मनाचे निरीक्षण करायची सवय लावून दिली व त्यांच्या मनामध्ये जे काही बदल, या बाह्य पदार्थामुळे झालेत, त्यांच्या अनुभवाचे जे काही घटक आहेत, त्या घटकांचा आराखडा मांडण्याचा प्रयत्न, त्यांनी विद्यार्थ्यांद्वारे करून घेतला. अनुभवाचे मोजमाप करण्याचा पायंडा व्हिल्हेम व्हुंट यांनी घातला. त्यामुळेच इतर नैसर्गिक शास्त्रांची जी मिराशी होती, प्रयोगशीलता व तटस्थता ही शिस्त मानसशास्त्रामध्ये पहिल्यांदाच आली आणि त्यामुळेच व्हिल्हेम व्हुंट यांना मानसशास्त्राचे जनक समजण्यात येऊ लागले. व्हिल्हेम व्हुंट यांना अभिप्रेत असलेली अभ्यास पद्धती, मानवी समाजासाठी संपूर्णच नवी होती असे नव्हे, पण तटस्थ निरीक्षणाची अभ्यास पद्धती, स्वतःच्या मनाचे निरीक्षण करण्याची शिस्त व्हिल्हेल्म व्हुंट यांनी शास्त्रीय परिघामध्ये आणली. हे त्यांचे वेगळेपण. उदाहरणच घ्यायचे झाले तर, आपल्याला केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या कवितेचे घेता येईल. केशवसुतांनी अतिशय मार्मिकपणे मनाची तरल अवस्था अनुभवली, तिचे विश्लेषण केले आणि अत्यंत तरल शब्दात त्याची मांडणी केली आहे. केशवसुत म्हणतात,
  ‘हर्षखेद ते मावळले,
  हास्य निमाले, अश्रु पळाले,
  कंटक-शल्यै बोथटलीं,
  मखमलीची लव वठली,
  काही न दिसे दृष्टीला,
  प्रकाश गेला, तिमिर हरपला,
  काय म्हणावे या स्थितिला ?
  झपूर्झा ! गडे झपूर्झा !’
  आत्मपरिक्षणात्मक तटस्थ प्रामाणिक वर्णनाचा हा उत्तम नमुना आहे. कठोर आत्मपरिक्षण हा संपूर्ण भारतीय अध्यात्म-शास्त्राचा.. आहे. प्राचीन विपश्यना पद्धती किंवा वेदांनी विचालेला कोह, हा पश्न ह्या सर्वांची सुरूवात आत्मपरिक्षणातून होते. म्हणूनच कबीर म्हणून गेले,
  दोस पराए देखि करि, चला हसन्त हसन्त,
  अपने याद न आवई, जिनका आदि न अंत।
  स्वत:ला जाणून घेणं, हा मनशांती कडे नेणारा सोपान आहे. हे भारतीय परंपेला पक्के ज्ञात होते. असो… व्हिल्हेम व्हुंट यांचे एक अतिशय महत्त्वाचे शिष्य म्हणजे एडवर्ड टिशनर. एडवर्ड यांनी त्यांच्या शिक्षकाच्या सर्व संकल्पना, आपल्या नवनव्या प्रयोगामधून पुन्हा एकदा नव्याने तावून-सुलाखून घेतल्या. एडवर्ड अमेरिकेच्या कॉरनेल, इथिका विद्यापीठात गेले आणि त्यांनी त्यांच्या गुरूंसारखेच तटस्थ आत्मपरिक्षणामधून, निरीक्षणातून अनेक नाविण्यपूर्ण प्रयोग करायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेस एखादी वस्तू किंवा पदार्थ विद्यार्थ्यांच्या समोर ठेवण्याऐवजी, त्यांनी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे शब्द द्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, ‘मी जेव्हा ब्लू किंवा निळा हा शब्द उच्चारतो, तेव्हा तुमच्या मनोविश्वामध्ये किंवा या विशिष्ट अनुभव निर्मितीमध्ये कोण-कोणते तरंग येतात, कोण-कोणत्या प्रतिमा तुमच्या डोळ्यापुढे उभ्या राहतात किंवा कोणता अनुभव तुम्हाला नेमका यात येतो, याचे तटस्थपणे वर्णन करा. विद्यार्थ्यांनी ते तसे केले आणि संरचनावाद अजून एक पायरी पुढे गेला. एडवर्ड यांच्या कारकिर्दीमध्ये अजून एक खूपच महत्त्वाची घटना घडली आणि ती म्हणजे त्यांची एक विद्यार्थिनी मार्गारेट वॉशबर्न ही ‘ग्रॅज्युएट इन सायकॉलॉजी’ झाली. मार्गारेटने एडवर्ड यांच्या हाताखाली पीएचडी केली तसेच तिने प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला. मार्गारेट वॉशबर्न, मानसशात्र या विषयाच्या पदवीधर तसेच पीएचडी झालेली ती पहिली महिला होती. १९०८ साली तिच्या अभ्यासावर आधारित ‘ The Animal Mind’ नावाचे पुस्तक मार्गारेट वॉशबर्न यांनी प्रसिद्ध केले. यामुळे एक खूप महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे, प्राण्यांचे वर्तनही आता मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये अभ्यासणे, विषय म्हणून दाखल झाले. आज जेन गुडाल यांच्या चिंपांझीवरच्या अभ्यासाचे किंवा इतर अनेक प्राण्यांच्या अभ्यासाचे, प्रशंसनीय नमुने व प्रारूपे जगापुढे आली आहेत. पण या सगळ्याचा उगम आपल्याला ‘The Animal Mind’ या पुस्तकात झालेला दिसतो, जर्मनीमधील व्हिल्हेम व्हुंट यांचे प्रयत्न तसेच अमेरिकेमध्ये एडवर्ड टिशनर, मार्गारेट वॉशबर्न यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे. हळूहळू मानसशास्त्राला आणि मानसशास्त्राच्या अभ्यासाला शास्त्रीय व शैक्षणिक वर्तुळामध्ये खूपच मान्यता मिळू लागली. अनेक विचारवंत पुन्हा नव्या पद्धतीने, या शास्त्राकडे खेचले जाऊ लागले. तसेच मानसशास्त्राची संरचना-शास्त्र ही व्याख्या जणू समाजमान्य किंवा विचारमान्य झाली, असे आपण म्हणू शकतो.अर्थात, खरी गंमत याच्यापुढे सुरू होते कारण मानवी मन म्हणजे काही लाकडाचा तुकडा नव्हे, जो तटस्थपणे न्याहाळला जाऊ शकतो किंवा पाण्याचे कंपोझिशन ‘एच टू ओ’ आहे हे आपण प्रयोगशाळेमध्ये सिद्ध करू शकतो. मानवी मन हे एवढे सोपे नसते, त्यामुळेच पुढे जाऊन संरचनावादाला किंवा संरचनावादाच्या सिद्धांताला, आव्हान देणारे अनेक नवे विचार पुढे आले व मानसशास्त्राच्या व्याख्या, पद्धती बदलू लागल्या. या सगळ्याविषयी पुढील लेखात…

  डॉ. सुचित्रा नाईक
  naiksuchitra27@gmail.com