who is the powerful leader in mahavikas aghadi nrvb

चाळीस आमदार निघून गेले आहेत आणि उद्धव ठाकरेंकडे फक्त पंधरा आमदार उरले आहेत. अशा स्थितीत उद्या निवडणुका झाल्या तर काय होणार याची कल्पना सर्वसामान्य लोकही करू शकतात. मुंबई शहरातील सेनेची स्थिती कदाचित पूर्वीप्रमाणे ठाकरेंना, मातोश्रीला, थोडीपार अनुकूल जरी राहिली तरी मताची टक्केवारी मात्र नक्कीच कमी झालेली आहे. नोव्हेंबर २०१९ मधील निकाला इतक्या संख्येने नवे आमदार ठाकरेंच्या झेंड्याखाली निवडून येणार की नाही, हे मोठेच प्रश्न चिन्ह आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे सेना सोडून अन्य पक्षांनी त्याची खूणगाठ बांधली आहे आणि “मविआच्या संभाव्य सत्तेत मुख्यमंत्री आमचाच!” अशा घोषणा काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते देत आहेत.

विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच अवधी आहे. नियमित वेळेत झाल्या तर महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वसाधारण निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबर २०२४ ला अपेक्षित आहेत. जर लोकसभेबरोबर विधानसभा लावण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी घेतला तर मग या निवडणुका पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये म्हणजे आणखी तेरा महिन्यांनी होऊ शकतात. हा वेळ खरेतर राजकीय पक्षांसाठी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अपुराच म्हणावा लागेल. भारतीय जनता पक्ष सतत पुढच्या निवडणुकांची तयारी करत असतो.

निवडणूक जिंकण्यासाठी सतत सज्ज असणारी विशाल यंत्रणा म्हणजेच भाजपा आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. अशा पक्षाशी मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी तयारी करणार आहे. पण अद्यापी त्यांच्यातच अनेक बाबतीत स्पष्टता नाही.
मुख्य म्हणजे ठाकरे सेनेचे काय होणार ?महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाचे स्थान कोणते असणार ? प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले, आहेत सध्या त्यांना पक्षाचे चिन्ह मिळाले आहे. शिवसेना हे नावही तेच अधिकृतपणाने वापरू शकत आहेत. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयात काय होणार ? हा एक प्रश्न थोडासा चिंतेचा आहे. कारण न्यायालयात जे बोलले जाते वा ज्या टिप्पण्या होतात, त्या समोरचे वकील ज्या प्रकारचे वाद उपस्थित करत असताता त्यांना अनुलक्षून न्यायमूर्तींनी केलेल्या असतात.

त्याचा अर्थ निकालात ती भाषा वा ती भावना दिसेलच असे नसते. तेव्हा तिथे निकाल नेमका काय लागेल, याचे फक्त अंदाज आपण बांधू शकतो. पण जर शिंदेंसह सोळा आमदारांचे निलंबन हे विधानसभेच्या अध्यक्षांनी न ठरवता सर्वोच्च न्यायालयानेच त्यात निर्णय़ करावा असा जर निकाल येणार असेल तर तो सध्याच्या विधानसभेच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह उभे करणारा ठरणार यातही शंका नाही. विपरीत निकाल लागला तर विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना पर्याय उरणार नाही. पण तरीही चाळीस आमदार निघून गेले आहेत आणि उद्धव ठाकरेंकडे फक्त पंधरा आमदार उरले आहेत. अशा स्थितीत उद्या निवडणुका झाल्या तर काय होणार याची कल्पना सर्वसामान्य लोकही करू शकतात.

मुंबई शहरातील सेनेची स्थिती कदाचित पूर्वीप्रमाणे ठाकरेंना, मातोश्रीला, थोडीपार अनुकूल जरी राहिली तरी मताची टक्केवारी मात्र नक्कीच कमी झालेली आहे. ग्रामीण भागात तर विद्यमान आमदरांचा सरसकट पराभव होणे कठीण आहे. नोव्हेंबर २०१९ मधील निकाला इतक्या संख्येने नवे आमदार ठाकरेंच्या झेंड्याखाली निवडून येणार की नाही हे मोठेच प्रश्न चिन्ह आहे. साहजिकच जरी महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेची संधी आहे अशा संख्येने तीन्ही पक्षांचे मिळून आमदार नव्या विधानसभेत समजा दिसले, तरीही सत्तेवर दावा ठोकण्याइतक्या अधिक संख्येने ठाकरेंच्या झेंड्याखाली लोक निवडून येतील का हाही एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे सेना सोडून अन्य पक्षांनी त्याची खूणगाठ बांधली आहे आणि “मविआच्या संभाव्य सत्तेत मुख्यमंत्री आमचाच!” अशा घोषणा काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते देत आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही पुढच्या सत्तेत आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री बसावा हे प्रकर्षाने वाटू लागले आहे. त्यामुळेच नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहू लागले आहेत. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेलॉर्ड पीअर परिसरातील कार्यालयाबाहेर तीन तीन मुख्यमंत्र्यांचे बॅनर झळकल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच महाविकास आघाडीतही मोठीच खळबळ उडाली. शिंदेसेना विरुद्ध उद्धव सेना असा वाद राज्यात सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस भवना समोर पोस्टर तसेच एक स्टँडी फलक लागला होता की, “भावी मुख्यमंत्री कोण, एकच वादा अजितदादा !” अन्यत्र भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा फ्लेक्स फलकांवर चमकत होती. तिकडे वाळवा-इस्लापूर या सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या मतदारसंघात त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे फलक लागले त्यातही भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटलांच्याच नावाची चर्चा होती. हे तीन नेत्यांमधील तीन ठिकाणी सुरु असणारे पोस्टर वॉर माध्यमांच्या फारसे लक्षात आले नाही काही ठिकाणी या पोस्टरांचे फोटो झळकले.

दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात शिंदेसेना विरुद्ध उद्धव सेना हा वाद टोकाला गेल्यामुळे या बातमीकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. परंतु काही पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना विचारणा केली तेव्हा सुळेताई उखडल्या. मी पाहिले नाही असे पोस्टर, हे विरोधी पक्षांचे, म्हणजेच भाजपचे कारस्थान आहे असेही मत ताईंनी व्यक्त केले. पोलीस तक्रार करण्याचीही भाषा केली. प्रत्यक्षात त्यांनी तशी तक्रार केल्याचे दिसले नाही. सुप्रिया सुळे यांनी असेही म्हटले की आपल्या पक्षात मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याची नेतृत्वाची स्थिती पाहिली तर सुप्रिया ताई महाराष्ट्रात त्या दृष्टीने लक्ष घालत नाहीत.

थोरल्या पवारांनी जी व्यवस्था करून दिली हे त्यात ताईंनी दिल्लीत पहावे व दादांनी महाराष्ट्राबाहेर पडू नये अशी रचना केली आहे. यात जयंत पाटलांसारख्या जिद्दी, हुषार आणि महत्वाच्या नेत्यावर थोडा अन्यायच होतो. मागेही जयंतरावांना एकदा उपमुख्यमंत्री पद दिले गेले जेव्हा आर. आर. पाटील अतिरेकी हल्ल्यानंतर बाजूला झाले तेव्हा पण नंतर लगेच पुढच्या निवडणुकीनंतर जयंतरावांकडे ग्राविकास खाते आले व आर. आर. आबा हे पुन्हा गृहमंत्रीपदावर बसले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या राज्यात अजितदादा पवार हेच राज्यस्तरावरचे सर्वात शक्तिमान नेता आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जातात. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७१ जागा निवडून आल्या होत्या तर काँग्रेसला ६९ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी खरेतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार अजित दादा पवार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले होते. त्या बदल्यात त्यांनी काँग्रेसकडून केंद्रात प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री पद घेतले होते आणि राज्यात तीन अधिकची खाती काँग्रेसकडून मिळवली होती. प्रश्न असा आहे की राज्यात अजितदादा हे मुख्यमंत्री पदी बसण्याऐवजी ताईंना तिथे बसवावे असे थोरल्या पवारांच्या मनात होते का ?राष्ट्रवादी काँग्रेसमधील दादांच्या निष्ठावान नेत्या-कार्यकर्त्यांना तशी शंका सतावत असते, मग त्याचेच प्रत्यंतर अशा एखाद्या पोस्टरमधून दिसते.

सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाची अस्तित्वाची लढाई सुरु असताना राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरु व्हायची आहे. साऱ्या जर-तरच्या गोष्टी सध्या सुरु आहेत. जर निवडणुका झाल्या आणि त्यातही जर मध्यावधी निवडणुकांची वेळ न्यायालयीन निर्णयानी ओढवली तर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत दिसेल असे काही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे. त्यामुळे अधिक आमदार निवडून आले तर आपण मुक्यमंत्री होऊ का अशा दिवास्वप्नात काँग्रेसच्या बाजूने नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण असे नेते गुंग आहेत तिकडे राष्ट्रवादीत तर तीन तीन नेत्यांच्या नावांनी भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स कार्यकर्ते झळकवत आहेत.

या सर्वात शिवसेना हा संभाव्य महाविकास आघाडीतील सर्वात लहान घटक ठरेल असेही आडाखेहीच मंडळी बांधत आहेत. शिंदेंच्या सोबत ठाकरेंचे माजी चाळीस सैनिक विधानसभेत दिसत आहेत. तर अन्य अपक्ष लहान पक्षांचे दहा आमदार जे ठाकरेंसोबत महाविकास आघाडीच्या सत्तेत दिसले होते तेही आता शिवेसना भाजपा सरकार सोबत दिसत आहेत. एकूणच महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजत असताना मुख्यमंत्रीपदाच्या या चर्चाही वांझोट्याच ठरणे अपरिहार्यही आहे…!!

अनिकेत जोशी

aniketsjoshi@hotmail.com