sheetal amte

डॉ. शीतल आमटेंसारख्या(doctor sheetal amte) एका संवदेनशील व्यक्तीला आत्महत्येसारखं पाऊल का उचलावं लागतं, याला आपली बदललेली जीवनशैली, माहितीचा आणि संवादाचा अफाट मारा तरीही वाढलेले एकटेपण, सामाजिक कार्याबाबत घटत चाललेली अस्था, परिस्थितीने निर्माण केलेले आणि आपण स्वीकारलेले नवे आदर्श, झपाट्याने ढासळणारी मूल्यव्यवस्था, पैशांना आलेले अवाजवी महत्त्व, सुखाच्या बदलणाऱ्या व्याख्या यापैकी नेमकं काय जबाबदार आहे, याचा विचार होण्याची गरज आहे.

– संदीप साखरे, डिजिटल एडिटर – नवराष्ट्र

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या(dr. sheetal amte suicide) ही महाराष्ट्रातील एका प्रबुद्ध समाजाला हळहळ वाटायला लावणारी आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या, ते कार्य उभं करण्यासाठी धडपड करणाऱ्या, टिकवणाऱ्या, किमान त्याचे भान असणाऱ्या सर्वांच्याच मनाला चटका लावणारी ही घटना आहे. कोणत्याही विचारसरणीचा कार्यकर्ता असला तरी एखादे प्रकल्पात्मक काम उभे करताना, ते टिकवताना येणाऱ्या संघर्षाची त्याला कल्पना असते, त्यामुळेच शीतल यांची आत्महत्या ही अनेक प्रश्नांना(questions raised after sheetal amte suicide) जन्म देते, त्याचबरोबर या स्थितीला ( व्यक्ती किंवा संस्था नव्हे) नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण करते.

एका संवदेनशील व्यक्तीला आत्महत्येसारखं पाऊल का उचलावं लागतं, याला आपली बदललेली जीवनशैली, माहितीचा आणि संवादाचा अफाट मारा तरीही वाढलेले एकटेपण, सामाजिक कार्याबाबत घटत चाललेली अस्था, परिस्थितीने निर्माण केलेले आणि आपण स्वीकारलेले नवे आदर्श, झपाट्याने ढासळणारी मूल्यव्यवस्था, पैशांना आलेले अवाजवी महत्त्व, सुखाच्या बदलणाऱ्या व्याख्या यापैकी नेमकं काय जबाबदार आहे, याचा विचार होण्याची गरज आहे.

या दुर्घटनेनंतर ज्या परिस्थितीत, मानसिकतेत शीतल यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, त्याची सहवेदना, त्यांच्या परिवाराची मनस्थिती याचा विचार न करता, समाजमाध्यमांवर या सगळ्या प्रकरणाचे खलनायक कोण, हे ठरविण्याचा सुरु झालेला अट्टाहास हा अधिक वेदनादायी आहे. या चर्चांमुळे एका तरुण, संवेदनशील, उच्चविद्याविभूषित, सामाजिक कार्याचा वारसा असलेल्या एका कार्यकर्तीची कामाच्या श्रीमंतीची चर्चा दूर राहून, समाजात एका वेगळ्याच गूढ चर्चांना जन्म मिळून त्या वेगळ्याच दिशांना जात आहेत, हे वास्तव नाकारता येणारे नाही.

बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय , त्यांनी उभं केलेलं आणि सुरु असलेले काम हे महाराष्ट्राच्या मौल्यवान संचिताचा भाग आहे, आदर्श, आदर्श म्हणून आजूबाजूला शोधत असताना नेमकं काय पाहून काम करावं, जीवनदृष्टी काय असावी, हे तत्वज्ञान जगून शिकवणाऱ्या आमटे कुटुंबियांत घडलेला हा प्रसंग त्या कुटुंबासह, ही जीवनदृष्टी पाहणाऱ्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे. कोणत्याही मोठ्या संस्थेत अंतर्गत तणाव होतच असतात. मतभेद, मतभिन्नता हा कामाचाच एक भाग असतो. तसेच मिळणारे सन्मान आणि वेळोवेळी होणारी टीका ही पण त्या कामाचाच भाग असते. हे कार्यकर्त्यांचं तत्वज्ञान दिवसेंदिवस झिरपणं संपत चाललं आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.

मूल्यांसाठी, स्वप्नांसाठी, विषयांसाठी आयुष्य वेचणारी माणसं गेल्या दशकाच्या कालावधीत झपाट्यानं ओसरु लागली आहेत. नव्या पिढीच्या हातात आलेल्या माहितीच्या महाजालानं निष्ठा, कष्ट, तपश्चर्या, मूल्य हे शब्द विस्मृतीत जातील की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. या सगळ्या काळात मूल्यांसाठी जगणाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना, त्यांना सामोरं जावं लागत असलेल्या मानसिक चढउतारांना, या घटनेनं तोंड फोडलं आहे का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

जमिनीचा वाद, वर्चस्वाची लढाई, राजकीय हस्तक्षेप, लैंगिक शोषण, माध्यमांकडून ब्लॅकमेलिंग यासारख्या अनेक नवनव्या चर्चा या प्रकरणात निर्माण झाल्यात खऱ्या, पण त्याहून जास्त ठसठसणारं, आंतरिक वेदनानादायी, अस्वस्थ असणारं आणि करायला लावणारं अशा मानसिकतेत शीतल होत्या का, असा प्रश्न पडायला वाव आहे.

ज्यांच्या कार्याकडे पाहून अनेकांनी आपली जीवनध्येय ठरवली, त्या दिग्गजांच्या कुटुंबात ताणतणावांनंतरच्या आणि पराकोटीच्या वादांनंतरही संवादासाठी शीतल यांना संवादासाठी समाजमाध्यमांवर बाहेरची माणसं शोधावी लागली असतील, तर हे अपयश नेमकं कुणाचं, हा प्रश्न आहे. सामाजिक कार्यात असणाऱ्यांनी प्रसिद्धीपराड्मुख असायला हवे. होणारं कोणतंही कौतुक आणि टीका हा कामाचाच भाग आहे, असे समजून त्याच्याकडे अलिप्ततापूर्वक पाहायला हवे, स्थितप्रज्ञता जपायला हवी, हे आदर्शवादी खरे, पण काळाच्या रेट्यात आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम हा कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवरही होतो आहे का, आपली प्रतिमा समाजात काय आहे, हे जपण्याच्या प्रयत्नात तर कार्यकर्ते अडकत नाहीयेत ना, असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित झाला आहे.

डॉ. शीतल यांच्या अशा जाण्याने सामाजिक कार्यकर्त्यांसमोरच्या द्विधा मनस्थितीला तोंड फोडले आहे का, आजूबाजूच्या झगमगाटाच्या, प्रसिद्धीच्या वातावरणात स्थिर काम झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना हे सर्व सुख खुणावू लागले आहे का, कोरोनाच्या काळात संस्थेसमोर असलेले प्रश्न, आर्थिक परिस्थिती, मानसिक भूमिका हे त्याचे कारण आहे का. सातत्याने जनसंपर्काची सवय असलेल्यांवर अचानक, जबरदस्तीने ओढवलेले एकटेपण हे त्यामागचे कारण आहे का, असे अनेक वेगळे प्रश्न उभे राहिले आहेत. शीतल आमटेंच्या निधनाने सामाजिक कार्यात असणाऱ्या सगळ्यांची कमी अधिक प्रमाणातील मनस्थिती व्यक्त केली आहे का खलनायक कोण हे ठरविणारे, त्यासाठी उतावीळपणा करणारे, सतत लगेचच निष्कर्षावर येण्याची घाई असणारे आणि त्याची समाजमाध्यमांवर खुलेआम चर्चा करणारेच तर या कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांतील एक नाहीत ना ?