tennis

टेनिसमध्ये (Tennis) तशा अनेक स्पर्धा होत असल्या तरी सर्वात जास्त महत्त्वाच्या असतात त्या चार स्पर्धाच. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open), फ्रेंच ओपन (French Open), विम्बल्डन (Wimbledon) आणि अमेरिकन ओपन (American Open). याला ग्रँड स्लॅम असंही म्हटलं जातं. नावानुसार या स्पर्धा ग्रँड असतात. जगभरातले दिग्गज टेनिसपटू चॅम्पियन होण्यासाठी झुंज देतात. येत्या आठवड्याभरात पॅरीसमध्ये फ्रेंच ओपन (French Open 2022) ही मानाची स्पर्धा सुरू होत आहे. यंदा कोण हॉट फेव्हरेट आहे? कोणत्या खेळाडूंकडून फॅन्सना अपेक्षा आहेत? नवे नियम कोणते आहेत आणि त्याचा काय परिणाम होईल? या प्रश्नांचा हा आढावा...

  ऑस्ट्रेलियन ओपननंतर (Australian Open) अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे होणारी दुसरी ग्रँड स्लॅम म्हणजे फ्रेंच ओपन (French Open). पॅरीसच्या रोलँ गॅरो इथं मातीच्या कोर्टवर ही स्पर्धा होत आहे. चारही ग्रँडस्लॅममध्ये (Grand Slam) जिंकायला सर्वात कठीण मानली जाणारी ही स्पर्धा. अन्य तीन ग्रँडस्लॅममध्ये कोर्ट हे टणक असतं. मॅट किंवा हार्ड कोर्टवर चेंडू उसळतो. विम्बल्डनमध्ये हार्ड कोर्ट नसलं तरी गवत असल्यामुळे खालची माती घट्ट असते. त्यामुळे चेंडू उसळळवण्यासाठी जास्त ताकद लावावी लागत नाही. मात्र पॅरीसचं तसं नाही. सैल माती असल्यामुळे चेंडू तितकी उसळी घेत नाही. शिवाय खेळाडूंचे पायही घसरतात. त्यामुळे अधिक सावध खेळावं लागतं. आतापर्यंत या क्ले कोर्टचा बादशाह असलेला राफाएल नदाल यंदाही खेळणार असला तरी आता त्याचं वय झालं आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नदालनं दिलेली प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांसाठी काहीशी निराशाजनक आहे.

  राफाचं ‘जुनं यंत्र’

  राफाएल नदालच्या नावावर विक्रमी २१ ग्रँडस्लॅम आहेत. जानेवारीपर्यंत त्याची रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविचशी बरोबरी होती. मात्र त्या स्पर्धेत दोघंही खेळले नाहीत आणि फायनलमध्ये डॅनिल मेद्वेदेवला पराभूत करत राफानं विक्रम रचला. क्ले कोर्ट हे तर नदालचे फेव्हरेट! मात्र त्यानंतर तो दुखापतींशी झगडत आहे. त्याला ६ आठवडे प्रॅक्टिस करता आलेली नाही. इटालियन ओपनपूर्वी त्यानं आपल्या शरिराचं वर्णन ‘ओल्ड मशिन’ असं केलं आहे. “तुम्हाला ६ आठवडे रॅकेटला स्पर्श करता आला नसेल, हालचाल करता आली नसेल तर… माझं शरीर हे जुन्या यंत्रासारखं आहे. त्याला पुन्हा कामाला लावण्यास वेळ लागणार आहे. तुम्ही १९ वर्षांचे असता तेव्हा गोष्ट वेगळी असते. ३६ वर्षांचे असता तेव्हा वेगळी असते.” आता नदालला खरोखर असं वाटतंय की तो केवळ स्पर्धकांना गाफील ठेवण्यासाठी असं बोलतोय, हे त्याचा खेळ बघितल्यावरच समजेल. कारण त्याला नवे विक्रम खुणावताहेत आणि त्यावर त्याची अर्थातच नजर असेल.

  नदालला खुणावतायत ‘मैलाचे दगड’

  राफाएल नदाल त्याच्या फेव्हरेट क्ले कोर्टवर उतरेल तो काही मैलाचे दगड पार करण्याचा इरादा ठेवूनच… एकतर त्यानं ही स्पर्धा जिंकली तर ते त्याचं २२वं विक्रमी ग्रँड स्लॅम असेल. फायनलपर्यंत धडक दिली तर नादाल ग्रँड स्लॅममध्ये ३० मेन्स सिंगल्स फायनल खेळणारा तिसरा खेळाडू ठरेल. आतापर्यंत ही कामगिरी फेडरर आणि जोकोविचनं केली आहे. या दोघांनीच सर्व ग्रँडस्लॅममध्ये अनुक्रमे ३६९ आणि ३२३ मॅचेस जिंकल्या आहेत. नदालनं पहिले २ राऊंड जिंकले तर तोदेखील ‘३०० विन क्लब’मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना आणि विशेषतः जोकोविचला गाफील ठेवण्यासाठी नादालनं स्वतःच्या मर्यादांचा जाहीर उल्लेख केलेला असू शकतो. पण कोणत्याही मोठ्या स्पर्धेआधी प्रतिस्पर्ध्यांमध्ये असले ‘माईंड गेम’ खेळले जातातच. स्वतः जोकोविचही यात मागे नाही.

  जोकोविचचा ‘माईंड गेम’

  ‘माईंड गेम’ दोन पद्धतीनं खेळला जातो. एकतर प्रतिस्पर्धी संघ किंवा खेळाडू हे आपल्यासाठी कसे क्षुल्लक आहेत असं वारंवार बोलून त्यांचं मानसिक खच्चीकरण करायचं किंवा मग त्यांच्यासमोर आपण म्हणजे काहीच नाही असं सांगून दबाव वाढवायचा. सध्या जोकोविच आणि वर्ल्ड नंबर ६ असलेला स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांच्यामध्ये हाच खेळ सुरू आहे. ताज्या दमाचा कार्लोस हा यंदाच्या फ्रेन्च ओपनचा फेव्हरेट आहे, असं जोकोविचनं सांगून टाकलंय. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्थातच कार्लोसवर दबाव टाकण्याचं हे तंत्र आहे. मात्र कार्लोसनंही आपण नंबर १ आणि नंबर ६ यात भरपूर अंतर आहे आणि जोकोविचच्या पातळीवर जायला आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे, असं सांगत पुन्हा जोकोविचच्या खांद्यावर भार टाकून दिला आहे. जोकोविच कार्लोसची स्तुती करत असला तरी या विजयाची त्याला गरज आहे.

  बरोबरी आणि बरंच काही !

  फ्रेंच ओपनचा गतविजेता जोकोविच यंदाची पहिली ग्रँड स्लॅम खेळत आहे. ऑस्ट्रेलियन ओपनवेळी कोविड लस घेतली नसल्यामुळे त्याला मेलबर्न विमानतळावरून परत पाठवण्यात आलं होतं. मात्र सगळ्या युरोपप्रमाणे फ्रान्सनंही लसीकरणाबाबत नियम आता शिथिल केले आहेत. त्यामुळे जोकोविचच्या पॅरीस-वारीचा अडसर दूर झाला आहे. मात्र यंदाच्या कॅलेंडर वर्षात तो केवळ ५ स्पर्धांमध्ये खेळला आहे. त्याचे मॅनेजर आणि कोच यांनी याबाबत सावध केलं आहे. स्पर्धा जिंकण्यासाठी स्पर्धांमध्ये खेळत राहणं आवश्यक असतं. त्यामुळे जोकोविचसाठी फ्रेंच ओपन खेळणं आणि शक्यतो जिंकणं गरजेचं आहे. एकतर यामुळे तो नादालच्या २१ ग्रँडस्लॅमची बरोबरी करू शकेल. शिवाय खेळलेली पहिलीच ग्रँड स्लॅम जिंकल्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढणार आहे. पण त्याला नदालबरोबरच काही तरुण खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे.

  तरुण तुर्क…

  जेनिक सिनर या तरुण खेळाडूनं आतापर्यंत ५ एटीपी टायटल्स जिंकले आहेत. २००७मध्ये नोवाक जोकोविचनंतर कमी वयात ही कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. जोकोविच ज्याला ‘फेव्हरेट’ म्हणतोय त्या कार्लोस अल्कराझनं १९व्या वर्षी अनेकांचं लक्ष वेघून घेतलंय. नुकतंच त्यानं जोकोविच आणि नदालला पराभूत केलं आहे. या दोघांखेरीज टेलर फ्रिट्झ, ऑस्ट्रेलियाचा थानासी कोकिनाकिस यांच्याकडेही टेनिस फॅन्सचं लक्ष असेल. वुमेन्स सिंगल्स प्रकारातही ईगा स्विआटेक, दिरिया साविले, ईमा राडुकानू, क्लारा टॉसन या तरूण खेळाडू चाहत्यांच्या फेव्हरेट आहेत. पण चाहते दोघींना मिस करतील हे नक्की…

  द मिसिंग फॅक्टर्स

  ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर अॅश बार्टीनं अचानक निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला. त्यामुळे बार्टी आपल्याला क्ले कोर्टवर दिसणार नाही. तर २ दशकं टेनिस कोर्टवर राज्य करणारी सेरेना विल्यम्स अद्याप दुखापतींमधून सावरलेली नाही. त्यामुळे ही टेनिस सम्राज्ञीदेखील पॅरीसमध्ये दिसणार नाही. युक्रेन युद्धामुळे फ्रान्सनं रशियाच्या खेळाडूंना बंदी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनचा फायनलिस्ट डॅनिएल मेद्वेदेवदेखील यावेळी नसेल. अर्थातच रॉजर फेडररची कमतरताही त्याच्या चाहत्यांना जाणवणार आहेच…

  जाता-जाता नव्या नियमाबद्दल

  यंदा फ्रेंच ओपनमध्ये प्रथमच पाचव्या सेटमध्ये टायब्रेकर होणार आहेत. आतापर्यंत केवळ या ग्रँड स्लॅममध्ये पाचवा सेट हा २ गेमचा फरक पडेपर्यंत खेळला जात होता. आता सहाव्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली तर १० पॉइंट्सचा टायब्रेकर खेळवला जाईल. म्हणजे २ पॉइंटच्या फरकानं जो खेळाडू आधी १० पॉइंट जिंकेल तो पाचवा सेट आणि त्याबरोबर मॅचही जिंकेल. अन्य तीन ग्रँड स्लॅम्सनी यापूर्वीच सहाव्या सेटसाठी टायब्रेकर केले आहेत. मात्र आता सर्व स्पर्धांमध्ये हीच पद्धत राबवली जाईल. त्यामुळे आता २००९ मधील फेडरर आणि अँडी रॉड्रिक्स यांच्यातल्या प्रदीर्घ फायनलसारखी मॅच बघायला मिळणार नाही. विम्बल्डनमध्ये २०१०साली जॉन इझनेर आणि निकोलस माहूत यांच्यात झालेली ११ तास ५ मिनिटांची ऐतिहासिक मॅचही पुन्हा होणार नाही.

  या नव्या नियमासह आणि काही नव्या आणि काही जुन्या-जाणत्या टेनिसपटूंसह २२ तारखेला पॅरीसचा रणसंग्राम सुरू होईल. तर ४ जूनला विमेन्स सिंगल्स आणि ५ तारखेला मेन्स सिंगल्सची अंतिम फेरी होईल. त्याआधी दोन्ही गटांमधील प्रत्येकी १२८ खेळाडू तिथे पोहोचण्यासाठी दोन हात करतील. कोरोनाच्या संकटातून बाहेर आल्यानंतर गेल्या २ वर्षांत मोकळेपणानं होणारी ही पहिलीच ग्रँड स्लॅम आहे. यात तरुण ‘तुर्क जिंकतात’ की पुन्हा ‘म्हातारेच अर्क’ याचं उत्तर दीड महिन्यानं मिळेल.

  – sportswriterap@gmail.com