dr william james

  मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे संरचनावादावर चांगल्यापैकीच टीका केली गेली. त्याच वेळेस इतर काही विचारवंतही मानसशास्त्राविषयी आडाखे बांधत होते, विचार करीत होते आणि अर्थातच मनाचे नेमके स्वरूप कसे आहे ? याविषयीचे चिंतन करीत होते.

  अशा विचारकांपैकी एक अतिशय ठळक नाव म्हणजे ‘डॉ. विल्यम जेम्स’. डॉ. विल्यम जेम्स हे एक अतिशय अभिजात विचारवंत म्हणावे लागतील. अमेरिकन विचारवंतांमध्ये तसेच संपूर्ण जगभर आधुनिक काळातील एक बहुआयामी आणि बहुपेडी विचारक म्हणून त्यांची ओळख आहे. एकीकडे ते धर्मचिंतनकार आहेत, ते पेशाने डॉक्टर होते तसेच खूप मोठे मानसशास्त्रज्ञही होते. मानवी मनाचा, जीवनाचा, मानवी व्यवहारातील धर्माचा तसेच मानवी मनाशी असलेला श्रद्धेचा संबंध, अशा नानाविध विषयांवर त्यांनी विपुल आणि अत्यंत मूलगामी विचार मांडले आहेत. अजून एक त्यांची महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांनी शिक्षकांना दिलेली व्याख्याने. आजही त्यांचा वैचारिक ठेवा फार मौल्यवान समजला जातो. त्यांनी एकूणच शिक्षणाविषयी व त्याहूनही शिकवणे व शिकणे (Teaching and Learning) या प्रक्रियेविषयी तसेच या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींविषयी, व्यक्तीच्या मनावर होणाऱ्या परिणामांविषयी खूपच सुंदर विवेचन केले आहे. डॉ. विल्यम जेम्स खूप विनोदी शैलीने बोलायचे. त्यांची अशीच एक प्रख्यात विनोदी टिप्पणी म्हणजे ते मंडळींना विचारायचे, ‘तुम्हाला माहितीये का? अमेरिकेमध्ये मानसशास्त्रावरील पहिले व्याख्यान (Lecture) मी कोणाचे ऐकले?’ आणि त्यावर स्वतःच उत्तर देऊन खळखळून हसायचे, ते म्हणायचे ‘अमेरिकेमध्ये आधुनिक काळात विल्यम जेम्स यांचे पहिले व्याख्यान मी (माझेच) ऐकले आहे.’

  ‘प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी’ हा खूप महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. डॉ. विल्यम जेम्स यांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे ‘अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता, अतिशय चांगली कौटुंबिक बैठक तसेच जीवनातील अनेक गोष्टींवर असलेले त्यांचे प्रेम आणि रस’ असे सर्व काही असूनही, विल्यम जेम्स यांना अधून-मधून अवसादाचे व नैराश्याचे (frustration) तीव्र झटके येत असत. त्यांनी याबाबत त्यांच्या स्वानुभवातून लावलेला शोध म्हणजे अशावेळेस ज्याला मानसिकदृष्टया असंतुलित (Mentally Disturbed) असे म्हणता येईल, अशा मंडळींशी बोलल्याने किंवा त्यांना मार्गदर्शन केल्याने, आपल्याला आपल्याच नैराश्यावर वर मात करण्यास मदत होते. त्यावेळेस समुपदेशन किंवा कौन्सिलिंग हा शब्द फारसा प्रचलित नव्हता, परंतु बोलण्याने माणसांना आराम मिळतो व ते मोकळे होतात, हा शोध मात्र विल्यम जेम्स यांनी आवर्जून नमूद करून ठेवला होता. तसेच ते अतिशय धार्मिक, सुसंस्कृत कुटुंबातील होते त्यामुळेच सतत धर्माविषयी, इतर अनेक गोष्टींविषयी, चर्चांविषयी तत्कालीन उत्तम मंडळी, त्यांच्या घरी येत असत. बौद्धिकरित्या संपन्न अशा वातावरणात विल्यम जेम्स मोठे झाले. त्यांनी ‘श्रद्धा किंवा विश्वास’ या मनाच्या क्षमतेबद्दलही एक सिद्धांत मांडला. त्यांच्यामते श्रद्धा मनुष्याला प्रचंड बळ देते, त्यांचे म्हणणे असे होते की, ‘ईश्वर आहे नाही, असल्यास कसा आहे ? त्याची सिद्धता करता येईल का ? वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टीत न पडता आपण जर का केवळ श्रद्धेवर लक्ष केंद्रित केले तर मानवी जीवन नक्कीच सुकर होऊ शकेल.’

  अशा बहुपेडी ओळख असलेल्या थोर विचारवंताने, तत्कालीन मानसशास्त्रातील घडामोडींबद्दल अर्थातच वाचले होते, माहिती घेतलेली होती. यातूनच त्यांनी संरचनावादाची समीक्षा केली. त्यांचे म्हणणे असे की, अनुभवाचे किंवा मनाचे घटक (elements) किंवा मूलद्रव्य समजल्याने, आपल्याला मनाविषयीचा फारसा बोध होतच नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर, “पाणी हे एच-टू-ओ या संयोगाने झालेले आहे. म्हणजेच काय तर, हायड्रोजन, ऑक्सिजन हे पाण्याचे घटक आहेत, मूलद्रव्ये आहेत. यावरून आपल्याला खरे म्हणजे पाणी नेमके काय करू शकते हे अजिबात समजत नाही. पाणी म्हणजे नदी, ही नदी गाव वसवते, गाळ वाहून नेते, बागा फुलवते, शेत फुलवते, नावेला तारुन नेते आणि बरेच काही. नुसत्या एच-टू-ओ ने आपल्याला नदीच्या कार्याचे अजिबातच आकलन, महत्व कळत नाही. हेच तर्कशात्र थोडे पुढे न्यायचे झाल्यास, विल्यम जेम्स असे म्हणतात की, त्याचप्रमाणे आपल्या मनाची, अनुभवाची, नुसते घटक (elements) किंवा मूलद्रव्य शोधून आपल्याला मनाच्या कार्याची अजिबातच कल्पना येत नाही. मन नेमके काय करू शकते ? त्याच्या कोणत्या क्षमता आहेत ? हेही आपण समजू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी मनाची तुलना अखंड वाहणाऱ्या चेतनेशी अथवा संज्ञा-प्रवाहाशी केली आहे. मानवी चेतना (Consciousness) हा एक अत्यंत गतिमान आणि अखंड वाहणारा जणू संज्ञा-प्रवाह आहे, अशी मांडणी डॉ. विल्यम जेम्स यांनी केली. या संज्ञा-प्रवाहाचा अभ्यास करणे हाच खरे म्हणजे मानसशास्त्राचा गाभा आहे. हा अभ्यास करण्यासाठी मात्र त्यांनी पुन्हा आत्मपरीक्षण व निरीक्षण यावरच खूप भर दिला. शास्त्रीय निरीक्षणातून तसेच आत्मपरीक्षणातून आपण हा संज्ञा-प्रवाह काही प्रमाणात जाणू शकतो. संज्ञा-प्रवाह प्रचंड कार्यरत असतो, गतिमान असतो हे त्यांनी पुन्हा पुन्हा आवर्जून सांगितले.

  डॉ. विल्यम जेम्स यांचे चिंतन वाचत असताना एक गोष्ट लक्षात येते ती अशी की, डार्विनचा उत्क्रांतीवादाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. डार्विन यांनी मांडलेल्या दोन संकल्पना त्यांनी इथे प्रारंभ बिंदू म्हणून घेतलेल्या दिसतात व त्या म्हणजे, ‘Survival of the fittest and natural selection of the traits.’ डॉ. विल्यम जेम्स यांच्या मांडणीनुसार, ज्या गोष्टींमुळे एखादी प्रजाती प्रबळ होत जाते, त्याची वैशिष्टये, निसर्ग त्या प्रजातीला बहाल करीत राहतो किंवा त्याची निवड केली जाते. या तत्त्वानुसार मानवी मनाचे अनोखेपण, ज्यामध्ये सामावले ती चेतना संज्ञा आहे. संज्ञा, भावना संयोजन (Combination) किंवा विचार ही सगळी जी वैशिष्ट्ये आहेत, ती प्रजाती उत्क्रांतीमध्ये प्रबळ ठरली आहेत. त्यामुळेच या संज्ञेच्या, प्रवाहाचा या चेतनेचा विचार व अभ्यास होणे खूप महत्त्वाचे आहे. डॉ. विल्यम जेम्स यांचे मानसशास्त्रामधील अजून एक महत्त्वाचे योगदान म्हणजे, त्यांनी मांडलेली मानवी भावनेविषयीची उत्पत्ती. एकाच वेळेस डेन्मार्कमधील कार्ल लँग (Carl Lang) यांनीही अशीच उपपत्ती मांडली, म्हणून मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये ‘James-Lange Theory’ अशा नावाने ती खूप प्रसिद्ध झाली. यांच्या मतानुसार बाहेरच्या उद्दीपकामुळे आपल्या शरीरामध्ये बदल होत जातात. उदाहरणार्थ घाम येणे, दम लागणे, हृदयाचे ठोके वाढणे, इत्यादी त्याचवेळेस या शारीरिक बदलांची जाणीव होणे म्हणजेच आपल्या भावना. अर्थात पुढे कॅनल आणि बार्ड या मानसशास्त्रज्ञांनी ही उत्पत्ती खोडून काढली.

  डॉ. विल्यम जेम्स यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी भावनेला खूप महत्त्व दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भावना संयोजन (Combination) यासोबतच माणसाची असलेली इच्छाशक्ती, ही सुद्धा मानवाला मिळालेली अतिशय अद्वितीय अशी देणगी आहे. इच्छाशक्ती किंवा इच्छा, मनामध्ये निर्माण झाल्यावर तिचे रूपांतर ठराविक मज्जातंतू उत्तेजित होण्यात होते, त्यातून मेंदूद्वारे स्नायूंकडे विशिष्ट संदेश पाठवण्यात येतात व स्नायूंची आणि अवयवांची पाहिजे तशी हालचाल होऊन, मनुष्य इच्छापूर्ती करीत असतो. हे शारिरीकदृष्या असलेले स्पष्टीकरण जरी डॉ. विल्यम जेम्स यांनी दिले असले तरी, पुढे जाऊन त्यांच्या धर्मचिंतनामध्ये पुन्हा एकदा आपल्याला या मानवी इच्छा शक्तीचा एक अनोखा आविष्कार बघायला मिळतो आणि ते म्हणजे मानवी मनामध्ये निर्माण होणारी होऊ शकणारी श्रद्धा. या श्रद्धेद्वारे मनुष्य खूप काही गोष्टी करू शकतो, खूप काही मिळवू शकतो. अनेक मनोव्याधीचे उपचार तसेच अनेक नवनवे सिद्धांत किंवा एन.एल.पी, आर.ई.बी.टी. अशी संज्ञानात्मक उपचार तंत्रे आपल्याला मानसशास्त्रामधून मिळाले आहे आणि त्यांचा उगम अर्थातच कुठेतरी डॉ. विल्यम जेम्स यांच्या विवेचनामध्ये आपल्याला सापडतो. स्वतःच्या प्रकृती अस्वास्थ्याशी लढा देत, १८७०-८० च्या सुमारास मोकळेपणे, स्वतःच्या अवसादाची, नैराश्याची, त्रासाची मनमोकळी कबुली देत, डॉ. विल्यम जेम्स यांनी मनाविषयी इतके मोठे काम तसेच मूलगामी, सुंदर विवेचन करून ठेवले त्याबद्दल खरेच मानसशास्त्र त्यांचे ऋणी राहील. संज्ञा-प्रवाहाची संकल्पना मांडल्यानंतर, ही संकल्पना केवळ मानसशास्त्रातच नव्हे तर वाङ्मयामध्ये आणि जगभरातील अनेक भाषांच्या वाङ्मय समीक्षेमध्ये एकदम रूढ झालेली आपल्याला दिसते. अर्थात डॉ. विल्यम जेम्स यांनी कितीही मूलगामी विवेचन दिलेले असले तरी, तो काळच मानसशास्त्रासाठी अतिशय कोलाहलाचा (Turmoil) काळ होता. अनेक विचारवंत, मानसशास्त्रज्ञ मनाच्या संकल्पनेचा उहापोह करीत होते आणि त्यामुळेच हे कार्य जोवर सुरू होते तोवर मानसशास्त्राची गाडी थांबून न राहता, इतर अनेक शाखा निर्माण होत गेल्या. त्याविषयी पुढे बोलू.

  – डॉ. सुचित्रा नाईक
  naiksuchitra27@gmail.com