Witchcraft-Prevention-Act

मिरज तालुक्यातील म्हैशाळसारख्या छोट्याशा गावात गुप्तधनाच्या लालसेतून एकाच कुटुंबातील नऊ जणांचे हत्याकांड झाल्यानंतर भोंदूबाबांनी महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा हा लिंबू मिरची बांधलेल्या दोऱ्यात गुंफून टाकला असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. हे हत्याकांड करणाऱ्या दोघा भोंदूच्या मुसक्या आवळण्यात आल्या असल्या, तरी भोंदूबाबा आणि त्यांचे हस्तक आढळणार नाहीत, असे एकही गाव महाराष्ट्रात आढळणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्याविषयी भय आणि दहशत वाढेल असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आलेली आहे.

    भोंदूबाबा आणि त्याचा हस्तक या दोघांनी चहातून जहाल विष टाकून डॉक्टर माणिक वनमोरे यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना एकाच वेळी त्यांना प्यायला देऊन साऱ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारे भीषण हत्याकांड केले. महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे हत्याकांड असून दुर्दैवाने महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे त्यावर फारशी चर्चा झाली नाही. प्रसारमाध्यमांनी तसेच समाज माध्यमांनी या हत्याकांडाऐवजी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाला महत्त्व आणि प्राधान्य दिले.

    आपल्या पुरोगामी विचारांसाठी महाराष्ट्रातच नव्हे देशभर प्रसिद्ध असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचे सध्या राज्यभर स्मृती शताब्दी वर्ष म्हणून पाळले जात आहे. या स्मृती शताब्दी वर्षातच भोंदूबाबांनी म्हैशाळमध्ये नऊ जणांची हत्या करून पुरोगामी विचारांचासुद्धा मुडदा पाडलेला आहे.

    पुत्रप्राप्तीसाठी बीड जिल्ह्यातील मानवत येथे सरपंचाकडून लहान मुलींचे बळी देण्याचे सत्र सुरू करण्यात आले होते. दहापेक्षा अधिक मुलींचा पुत्रप्राप्तीसाठी भोंदूबाबांच्या सांगण्यावरून बळी दिला गेला होता. हे प्रकरण देशभर गाजले होते. त्यानंतर याच कारणासाठी बाभूळतारा या गावांमध्ये‌ लहान मुलींचे बळी देण्याचे सत्र सुरू झाले होते. या हत्याकांडातील काही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती. आणि काही वर्षांनंतर १९८७ च्या आसपास या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

    अलीकडच्या काळात पैशाचा पाऊस पाडणारे भोंदूबाबा अनेक जिल्ह्यात तयार झाले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गदरम्यानच्या एका जंगलामध्ये पैशाचा पाऊस पडतो म्हणून फसवून आणलेल्या लोकांची हत्या केली जात होती. या खून मालिकेतील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली असून हे नराधम सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी गेटमध्ये सडत पडलेले आहेत.

    नागमणी देतो, गुप्तधन काढून देतो, पैशांचा पाऊस पाडतो, पुत्रप्राप्ती करून देतो, अशा विविध कारणातून महाराष्ट्रात कितीतरी व्यक्तींचा बळी बाबांनी घेतलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या सततच्या आंदोलनातून महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू केल्यानंतर म्हैशाळ येथे घडलेले हे सर्वात मोठे हत्याकांड आहे. आता या घटनेमुळे पोलिसांच्या रडारवर भोंदूबाबा, तांत्रिकबाबा त्यांचे हस्तक आलेले आहेत.

    महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आल्यानंतर या कायद्याअंतर्गत भोंदूबाबांना कठोर शिक्षा झालेली आहे, असे ऐकिवात नाही. मुळातच या कायद्याअंतर्गत पोलिसांनी स्वतः पुढे होऊन भोंदूबाबांवर कारवाई केली आहे, असे एकही उदाहरण सापडत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या नाही. यासंदर्भात एखादी तक्रार आली तर पोलीस कारवाई करतात.

    वास्तविक आपल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोणी भोंदूबाबा आहेत का! मांत्रिक बाबा आहेत का! त्यांच्याकडून करणीधरणी केली जाते आहे का! याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी किंवा गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात तसे काही घडताना दिसत नाही.

    म्हैसाळसारख्या छोट्याशा गावात अब्बास मोहम्मद अली बागवान त्याचा हस्तक धीरज चंद्रकांत सुरवसे हे दोन अनोळखी लोक गावात येतात आणि गावातील लोकांना त्यांच्याविषयी संशय येत नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण उगाच कुणाच्या मध्यात पडायचे अशी भूमिका या गावातील काही मंडळींनी घेतली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    गेल्या काही दिवसांपासून या गावात गुप्तधन मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खबर मिरज पोलिसांनाही लागू नये ही बाब दुर्दैवी आहे. गुप्तधनाच्या बदल्यात या भोंदूबाबांनी डॉक्टर वनमोरे यांच्याकडून मोठी रक्कम घेतली असण्याची शक्यता आहे. या भोंदूबाबांना त्यांनी मागितलेली मोठी रक्कम देण्यासाठी म्हणून डॉक्टर वनमोरे कुटुंबियांकडून खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले असावे, आपल्याला हवे तितके पैसे मिळालेले आहेत आणि आपण काही गुप्तधन मिळवून देऊ शकत नाही म्हणून या भोंदूबाबांनी पळ काढला होता. नंतर आपले हे भोंदूकांड उघडकीस येऊ नये म्हणून या दोन नराधमांनी डॉक्टर वनमोरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांची हत्या केली. एक हसत खेळत घर उद्ध्वस्त केलं.

    पोलिसांनी सुरुवातीला वीस ते पंचवीस खाजगी सावकारांना या प्रकरणात अटक केली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून पोस्टमार्टमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीला वेग आला आणि त्यातूनच सोलापूरच्या या दोन भोंदूबाबांनी या कुटुंबाला काळ्या चहातून जहाल विष घालून ठार मारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाढत चाललेल्या अंधश्रद्धेविषयी समाजात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

    दीपक घाटगे

    dipak.ghatage@gmail.com