injured cricketers

देश आणि क्लब यांच्यासाठी खेळण्याच्या अधिक “वर्कलोड”मुळे खेळाडू जायबंदी होण्याचे प्रमाण वाढले आहे. खेळाडूंना किंवा त्यांच्या शरीराला अत्यावश्यक असलेली विश्रांती मिळतच नाही. मानवी शरीर हे हाडामासाचे आहे; मशिन नाही, यंत्र नाही. जेव्हा खेळाडूंच्या शरीरावरील “वर्कलोड”चा अतिरेक होतो तेव्हा शरीर हार खाते. आज कोणताही खेळाडू आयपीएलमध्ये मिळणाऱ्या पैशांवर पाणी सोडायला तयार नाही.

भारतीय क्रिकेटमध्ये जागतिक पातळीवरील गुणवत्ता फोफावली. अचानक या वैभवाला दृष्ट लागली. महंमदशामी, जसप्रीत बुमरा, महंमद सिराज, उमेश यादव, हार्दिक पंड्या, हर्षल पटेल, कुलदीप सेन, आवेश खान, चहर, प्रसिद्ध कृष्णा ही अलिकडच्या काळातील वेगवान जायबंदी गोलंदाजीची यादी वाढतच गेली. भारतीय कप्तानाला दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा एकत्रित तोफखाना कधीच मिळाला नाही. दुसरीकडे अष्टपैलू- फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजा मोडला आणि भारतीय संघाचा समतोलच बिघडला. अजिंक्य रहाणेच्या जागी मधली फळी सावरण्यासाठी निवडण्यात आलेला श्रेयस अय्यर फिट झाला आणि चालू कसोटीदरम्यानच पुन्हा जायबंदी झाला. यामुळे भारतीय संघातील खेळाडूंसाठी नियुक्त केलेल्या वैद्यकिय तज्ज्ञांच्या कार्यक्षमतेबाबतच प्रश्न निर्माण होतो.
आणखी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते; ते म्हणजे बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट ॲकॅडमीचे. खरं तर क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी ही ॲकॅडमी सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्षात तेथे क्रिकेटचे धडे कमी गिरविले जातात; जायबंदी खेळाडूंसाठी तेथे टाकलेल्या खाटा पाहिल्या की ते “रिहॅब सेंटर”च अधिक वाटते. खेळाडू मोडला की त्याची रवानगी तेथे होते. क्रिकेटचे तंत्र कोण, कोठे आणि कधी शिकविणार?

गेल्या दोन वर्षातील भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास पाहिला की या जायबंदीग्रस्त खेळाडूंमुळे भारतीय संघ कधीही “सेटल” संघ वाटला नाही. प्रत्येक कप्तानांची ती डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे बीसीसीआयला या समस्येचे मूळ आताच शोधणे गरजेचे आहे.

प्रत्यक्षात बीसीसीआय खेळाडूंच्या वैद्यकिय सुविधांवर प्रचंड पैसे खर्च करतो. महागडे डॉक्टर्स, फिझिओ आणि अन्य सपोर्ट स्टाफ खेळाडूंसाठी तैनात केलेला आहे. तरीही खेळाडू जायबंदी होत आहेत. दुखापतीतून बरे होण्यासाठीच्या कालावधीनंतरही फिट ठरत नाहीत. हा दोष कुणाचा मानायचा?चुकीच्या उपचारांचा? दुखापतींच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम न पाळणाऱ्या खेळाडूंचा? मैदानावर पूर्ण फिट नसतानाही पुन्हा उतरणाऱ्या खेळाडूंचा? त्यांना फिट नसतानाही फिट ठरविणाऱ्या डॉक्टरांचा? की दुखापतीमधून बाहेर येऊन, पुन्हा स्वत:च्याच चुकांमुळे जायबंदी होणाऱ्या खेळाडूंचा?

खेळाडूंच्या या दुखापतीला जबाबदार असलेला आणखी एक मोठा खलनायक आहे. हा खलनायक आहे आयपीएल स्पर्धेचे संघ, फ्रॅन्चायझी. फेब्रुवारी महिना आला की प्रश्न निर्माण होतो, देशासाठी खेळणे महत्त्वाचे की आपली निष्ठा आयपीएल फ्रॅन्चायझींच्या चरणी ठेवणे महत्त्वाचे?याचे अलिकडचे उदाहरण, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पाचवी मॅन्चेस्टर येथील कसोटी आपण ‘कोरोना’चे कारण सांगून खेळायचे टाळले. तेच खेळाडू पुढे दुबईत खेळले. तेथेच पुढे झालेल्या आयपीएलच्या एका टप्प्यासाठी लंगडी घालतही खेळले. त्यावेळी ही गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवली. देशापेक्षाही अधिक पैसा, जाहिराती देणाऱ्या लिग खेळाडूंसाठी अधिक महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत.

देश आणि क्लब यांच्यासाठी खेळण्याच्या अधिक “वर्कलोड”मुळे खेळाडू जायबंदी होण्याचे प्रमाण वाढले आहे. खेळाडूंना किंवा त्यांच्या शरीराला अत्यावश्यक असलेली विश्रांती मिळतच नाही. मानवी शरीर हे हाडामासाचे आहे; मशिन नाही, यंत्र नाही. जेव्हा खेळाडूंच्या शरीरावरील “वर्कलोड”चा अतिरेक होतो तेव्हा शरीर हार खाते. आज कोणताही खेळाडू आयपीएलमध्ये मिळणाऱ्या पैशांवर पाणी सोडायला तयार नाही. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचे “खेळाडू” इंजेक्शन्स घेऊन फिट ठरताहेत.” हे विधान त्यामुळे अधिक गंभीर वाटते. तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच रहातो. उत्कृष्ट दर्जाच्या वैद्यकिय सोई-सुविधा मिळूनही क्रिकेटपटू निर्धारित, डॉक्टरांनी निश्चित केलेल्या कालावधीत फिट का होत नाहीत?या प्रश्नाचे उत्तर क्रिकेटपटूंच्या शारीरिक सक्षमतेचे काम गेली दोन दशके करणारे ट्रेनर-प्रशिक्षक अमोघ पंडित यांनी अचूक दिले आहे.

अमोघ पंडित म्हणतात, “वर्कलोड फक्त क्रिकेट खेळण्यापुरता नसतो. अपेक्षांच्या ओझ्याचा मानसिक वर्कलोड खूप मोठा असतो. हा मानसिक ताणतणावाचा वर्कलोड जर आपण कमी करू शकलो तर दुखापती कमी होतात. दुखापत बरी होण्यास मदत होते. सिम्फथेटिक नर्व्हस सिस्टिम आणि पॅरा सिम्फथेटिक नर्व्हस सिस्टिम या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिल्या प्रकारात खेळाडू सक्रिय असतो. दुसऱ्या प्रकारात खेळाडू विश्रांती घेतो (रेस्ट अँड डायजेस्ट) या अवस्थेत असतो.

क्रिकेटपटूंवर संघात येण्याचे, कायम राहण्याचे, मैदानावर चांगली कामगिरी करण्याचे प्रचंड दडपण असते. जेव्हा तो हॉटेलवर येतो तेव्हाही तो तणावाखालीच वावरत असतो. तो कायम पहिल्या अवस्थेतच असतो. त्यावेळी रक्तप्रवाह हृदय, मेंदू आणि स्नायूंकडे असतो. या अवस्थेतून त्याने दुसऱ्या अवस्थेत येण्याची गरज असते. तरच त्याला विश्रांती मिळेल. त्याने घेतलेली औषधे, उपचार, प्रथिने त्याचा शरीराला उपयुक्त ठरू शकतील. दुर्दैवाने सध्याच्या स्पर्धात्मक जगात क्रिकेटपटू दुसऱ्या अवस्थेत सहजासहजी येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या दुखापती बऱ्या होण्यासही अधिक वेळ लागतो.
खेळाडूंना विश्रांती मिळत नाही.

स्नायूवरील ‘लोड’ वाढत जातो. मग अतितणावामुळे व अतिवापर झाल्याने ते फाटतात. म्हणजे “मायक्रो ट्रॉमा” अवस्था उद्भवते. त्या अवस्थेत जर उपचार कामी आले तरच दुखापत बरी होते, अन्यथा ती अधिक बळावते. खेळाडू प्रत्यक्ष खेळतात तेवढाच वर्कलोड त्यांच्यावर नसतो. सराव, फिझिकल ट्रेनिंग, कंडिशनिंग या गोष्टींचाही वर्कलोड खेळाडूंवर वाढत असतो. तो ‘वर्कलोड’ ज्याला व्यवस्थित हाताळता येतो तो कमी दुखापतग्रस्थ होतो. त्यासाठीच ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी रोटेशन पॉलिसी तयार केली, जेणेकरून ठराविक खेळाडूंवरच भार पडणार नाही. त्यांना मध्ये विश्रांती मिळत जाईल.भारतीय संघाने याउलट केले आहे. त्यांनी २० जणांचा ग्रुप करून त्यातूनच खेळाडू खेलविण्याचा प्रयोग केला आणि तो आत्ता अंगलट आला आहे. दुखापतीग्रस्त खेळाडू वाढले आहेत. आपल्या शरीरावर अनेक प्रकारच्या तणावांचे (स्ट्रेस) दडपण असते. इमोशनल (मानसिक) तणाव तर असतोच. सायकोलॉजिकल स्ट्रेस, सामन्यातील स्ट्रेस, आध्यात्मिक तणाव. हे सारे तणाव आपले शरीर झेलत असते. त्यापासून शरीराला दूर ठेवणे महत्त्वाचे असते. स्ट्रेस मध्ये असल्यामुळे शरीरातील ॲड्रेनलीन हाय आहे. त्यामुळे आपण नर्व्हस आहेत. रात्री झोप येत नाही. भूक लागत नाही. खाल्लेले पचत नाही.

औषधे योग्य तो परिणाम करीत नाहीत. खेळाडूंचा वर्कलोड व स्ट्रेस फॅक्टर पाहिला की बहुतांशी क्रिकेटपटूंच्याबाबतीत हेच घडत असते. कोचला वाटत असते, माझी बेस्ट इलेव्हन खेळली पाहिजे. त्याच्यावर यशस्वी होण्याचे दडपण असते. तो आपले सर्वोत्तम खेळाडू निवडतो. त्यामध्ये ताण-तणावग्रस्त खेळाडूही असतात. जे नंतर या स्ट्रेसचे बळी ठरतात. मानसिक ‘स्ट्रेस’ जेवढा धोकादायक आहे, तेवढीच “स्ट्रेस फ्रॅक्चर” ही दुखापत भयानक आहे. ही दुखापत बरी होण्यासाठी अधिक कालावधी लागतो. प्राथमिक अवस्थेत कधीकधी ही दुखापत कळतही नाही. मात्र स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत बळावली की अधिक काळ घेते. म्हणजे फिझिकल स्ट्रेस आणि मेंटल स्ट्रेस हे दोन्ही स्ट्रेस खेळाडूंसाठी अपायकारक आहेत. मेंटल स्ट्रेस तर अधिक धोकादायक आहे. ज्याच्यावर मात करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. हीच गोष्ट खेळाडूंच्या दुखापती लवकर बऱ्या न होण्याचे कारण आहे.

म्युझिक थेरपीचा प्रयोगही यशस्वी
भारतीय क्रिकेट संघांसोबत, धोनी व कोहली कप्तान असताना मुंबईचे मानेकाकाही होते. त्यांच्यामते खेळाडू जेवढा तणावमुक्त असतो तेवढी चांगली कामगिरी करतो व दुखापतग्रस्त होत नाही. त्यासाठी आम्ही ड्रेसिंग रूममध्ये प्रसन्न व चांगले वातावरण निर्माण केले होते. म्युझिक थेरपीचा प्रयोगही यशस्वी ठरला होता.

राखीव फळी निर्माण करण्याची दृष्टी आणि क्षमता निवड समितीत हवी: वेंगसरकर
खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्या सध्या वाढल्या आहेत. जायबंदी झाल्यानंतर क्रिकेटपटू लवकर मैदानावर परतत नाहीत. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. याबाबत भारताचे माजी कप्तान व राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांना काय वाटते? वेंगसरकर म्हणतात, “क्रिकेटचा “वर्कलोड” वाढला की असं व्हायला लागते. त्यासाठी योग्य आखणी करणे गरजेचे असते. त्याच खेळाडूंवर अतिक्रिकेटचा ताण येऊ नये यासाठी तुमची राखीव फळीही सक्षम, सज्ज असणे आवश्यक असते. ती राखीव फळी तयार करण्यासाठी योग्य योजना हवी. ‘व्हिजन’ (दृष्टीकोन) हवा. ती दृष्टी येण्यासाठी निवड समिती आणि निर्णय घेणारेही सक्षम हवेत. सध्याच्या निवड समितीतील सदस्यांची लोकांना माहिती देखील नाही. कारण ते मोठ्या दर्जाचे फारसे क्रिकेटही खेळलेले नाहीत.
राखीव फळी किंवा “बेंच स्ट्रेंथ” निर्माण करण्याचे काम या निवड समिती सदस्यांचे असते. त्यासाठी त्यांच्याकडे योजना हवी. अनुभव हवा. ही राखीव फळी कुठून उभारता येईल त्याचे ज्ञान हवे. ‘इंडिया ए’ किंवा २२ वर्षाखालील क्रिकेट संघांतील गुणवत्ता हेरण्याची दृष्टी या निवड समिती सदस्यांकडे हवी. तेथूनच भारताच्या पुढच्या पिढीचे क्रिकेटपटू मिळणार आहेत. त्यांच्यावर मेहनत घेतली तर ती फळाला येऊ शकते.

मागे आपण इंडिया ए संघांचा कप्तान शिखर धनवला केले होते. शिखर धवनने वयाची तिशी कधीच ओलांडली आहे. तो आपला ‘फ्युचर’ क्रिकेटपटू आहे का? ‘इंडिया ए’ संघांची निवड करतानाही ते खेळाडू पुढील किमान १० वर्षे तरी भारतीय संघांची सेवा करू शकतील असे असावेत. तरच तुम्हाला ज्येष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीनंतर समस्या उद्भवणार नाहीत. किंवा प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर त्यांच्या जागी खेळण्यायोग्य खेळाडू राखीव फळीत सज्ज असतील.

भारतात सध्या क्रिकेट प्रचंड वाढले आहे. खेड्यात दुर्गम भागातही क्रिकेट आता खेळले जाते. मात्र तेथवर जाऊन तेथील गुणवत्ता हुडकण्याचे काम करावे लागणार आहे. मात्र असे खेळाडू ओळखण्यासाठीही ‘नजर’ हवी. तुमच्याकडे अनुभवही हवा. कोहली, धोनी, पार्थीव पटेल यांच्यासारखे खेळाडू आम्ही जगमोहन दालमिया यांच्या काळात “टी.आर.डी.ओ.” म्हणजे टॅलन्ट रिसर्च डिस्ट्रीक्ट ऑफिसर या योजनेअंतर्गत शोधले. मी आणि माझे सहकारी देशात सर्वत्र फिरलो. त्यावेळी लपलेली गुणवत्ता नजरेसमोर आली. योग्य त्या खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तरच तुमच्याकडे राखीव खेळाडूंची फळी तयार होईल. नाहीतर आज याला तर नंतर दुसऱ्याला संधी देण्याचा संगीत खुर्चीचा खेळ सुरू राहील.

– विनायक दळवी
vinayakdalvi41@gmail.com