मातृत्व आणि परिचारिका दिन

खरं तर रुग्णाचा डॉक्टरपेक्षाही जास्त संबंध येतो तो परिचारिकेशी. तीन पाळ्यांमध्ये ड्युटी करताना रुग्णाशी, रुग्णाच्या नातेवाईकांशी आपुलकीचे नाते जोडले जाते. त्यामुळे काहीजण घरच्या अडचणीही आपलं माणूस समजून या परिचारिकांना सांगून आपलं दुःख हलकं करतात.

  नुकताच जगभरात मातृदिन साजरा झाला आणि समाजमाध्यमं मातृदिनाच्या संदेशांमध्ये चिंब भिजून गेली. आईचं स्थानच मुळी प्रत्येक प्राणिमात्राच्या आयुष्यात अबाधित आहे. असंच एक नातं आहे ते म्हणजे रुग्ण आणि परिचारिकेचं. रुग्णालयात दुखापत, व्याधी, आजारपणा किंवा गर्भारपणाशी झुंजताना आईचं कर्तव्य पार पाडणारं. कारण परिचारिकेतही एक मातृहृदयच दडलेलं आहे.

  मातृदिनानंतर चारच दिवसांनी १२  मे रोजी येतो, तो म्हणजे जागतिक परिचारिका दिन. १८५४ मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. या दिनानिमित्ताने वेगवेगळ्या रुग्णालयांमधून ७ मे ते १२ मे हा पूर्ण आठवडा, परिचारिकांसाठी तसेच नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठीही विविध स्पर्धा घेऊन साजरा केला जातो. वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या परिचारिकेचा गौरव केला जातो. तसेच नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवी प्रमुख परिचारिकांकडून मार्गदर्शन केले जाते.

  खरं तर रुग्णाचा डॉक्टरपेक्षाही जास्त संबंध येतो तो परिचारिकेशी. तीन पाळ्यांमध्ये ड्युटी करताना रुग्णाशी, रुग्णाच्या नातेवाईकांशी आपुलकीचे नाते जोडले जाते. त्यामुळे काहीजण घरच्या अडचणीही आपलं माणूस समजून या परिचारिकांना सांगून आपलं दुःख हलकं करतात. त्यामुळे रुग्णाचं आणि परिचारिकेचं नातं हे जास्त जवळच होतं. ही परिचारिका आपलं घर, कुटुंब सांभाळून तेवढ्याच मायेने, तत्परतेने  रुग्णाची सेवा करते. रुग्णाच्या नातेवाईकांना धीर देते. हे सेवाव्रत तिने स्वमर्जीने स्वीकारलेलं असतं. खरं तर परमेश्वराने तिला दिलेलं हे एक वरदानच असतं. आपलं कर्तव्य चोखपणे बजावताना, परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा करताना प्रसंगी तिला मन खूप खंबीर करावं लागतं.

  पूर्वीच्या काळी समाजाचा नर्सिंग या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नव्हता. मात्र आता वैद्यकीय शिक्षणाबरोबरच समाजाची सेवा हा दृष्टिकोन ठेऊन ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलीही या क्षेत्राकडे वळताना दिसतात. मात्र हे शिक्षण इतर क्षेत्रातील शिक्षणासारखं नसल्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा लागतो. याविषयी जसलोक रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या परिचारिका प्रमुख रोहिणी घुमे म्हणाल्या की, “प्रत्येक परिचारिका ही आपल्या आयुष्यातील तीन वर्ष जे शिक्षण घेते ते अतिशय खडतरपणे घेते. नोकरीवर रुजू झाल्यावरही स्वतःचं किंवा कुटुंबाचं आयुष्य जगत असताना तीन पाळ्यांमधील ड्युटीमुळे आम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आम्ही आमचं शंभर टक्के योगदान रुग्णालयाला देतो. घरी आल्यावरही त्या तणावातच आम्ही काम करतो. आताच्या आजारांमध्ये बऱ्याचशा परिचारिकांना खूप त्रासाला सामोरं जावं लागलं. तरीही आपलं कर्तव्य आम्ही निष्ठेनं बजावलं. त्यामुळे आमच्याही सुरक्षेकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. सरकारी रुग्णालयामधून परिचारिकांना त्यांच्या नियुक्तीप्रमाणे मानधन मिळतं. आदर मिळतो. परंतु खाजगी रुग्णालयांमध्ये मात्र परिचारिकांकडे आदराने पाहिलं जातं नाही. आपली काळजीवाहू सेविका असल्यासारखं त्यांना वागवलं जातं.  मुख्य म्हणजे मानधनापेक्षाही आदर खूप महत्त्वाचा आहे आणि तो मिळालाच पाहिजे.”

  कोरोना काळात तर स्वतःचं खाजगी आयुष्य पणाला लावून कोरोनाशी खरी लढाई लढली ती या परिचारिकांनी. टीव्हीवर जगभरात चाललेला कोरोनाचा उद्रेक, होत असलेली जीवितहानी बघताना एक माणूस म्हणून भीती वाटणं साहजिकच होतं. पण कोणत्याही परिस्थितीत न डगमगता मोठ्या धीराने या परिचारिकांनी कोरोनाशी लढा दिला. या अनुभवाविषयी परेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात गेली २५ वर्षं सेवा बजावणाऱ्या वरिष्ठ परिचारिका प्राची वेंगुर्लेकर म्हणाल्या,”कोरोनाचा काळ हा खूप भयावह आणि कायम लक्षात राहील असा काळ होता. रेल्वे बंद असल्यामुळे कामगार वर्गही कमी होता. अटीतटीची वेळ होती. लसीकरण करण्यासाठी माझी पहिल्याच बॅचमध्ये ड्युटी लागली. त्यावेळी घाबरून न जाता आपण लसीकरण करतोय म्हणजे काहीतरी महत्वाची सेवा करतोय याचं खूप समाधान होतं. लस घेण्यासाठीही लोकांना प्रवृत्त करावं लागत होतं. त्याकाळात ऑक्सिजनचा खूप तुटवडा होता. म्हणून मला खरंच सांगावंसं वाटतं की, कोरोना काळात या कारणामुळे ज्यांनी ज्यांनी आपली माणसं गमावली त्यांनी शक्य असेल तर एक तरी झाड जरूर लावावं. तसेच पुन्हा अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजीही नक्कीच घ्यायला हवी.”

  ग्रामीण भागातून, खडतर परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून येणाऱ्या मुलींना होस्टेलमध्ये राहण्याची सोय, त्यांना पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनाची सोय याकडे शासनाने लक्ष देणं आवश्यक आहे. परिचारिका म्हणून या सेवाभावी क्षेत्राकडे वळल्यावर, पुढेही स्वतःचं आयुष्य जगताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागणार हे माहीत असूनही मानवतेची ही उदात्त सेवा त्या स्वीकारतात. अशा डॉकटर आणि रुग्ण यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असलेल्या सन्माननीय परिचारिकांना कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा.

  – अनघा सावंत