विज्ञानाची सांगोपांग जाणीव करून देणारे लेखरंग

सांप्रत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात अंदाज बांधून भविष्यातील जनमानसावर त्याचा काय परिणाम होईल? तो समाज, त्या काळातील व्यवस्था कशी असेल? मानवी व्यवहार, संबंध कसे असतील याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञानकथा.

  विज्ञान साहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झाला. आपल्याकडे विज्ञानकथेची सुरुवात सर्वप्रथम १९०० मध्ये कृष्णाजी आठवले यांच्या ‘ज्यूल्स व्हर्न’च्या कादंबरीच्या ‘चंद्रलोकची सफर’ या नावाने केलेल्या अनुवादाने झाली. स्वातंत्र्योत्तर काळात अनुवादित विज्ञानकथा व कादंबऱ्यांचे लेखन विस्तारत गेले. डॉ. जयंत नारळीकर यांच्या ‘कृष्णविवर’ या कथेपासून विज्ञानकथा अधिकाधिक वाचकाभिमुख झाली. १९५० नंतर अनुवादित विज्ञानकथा, कादंबऱ्या प्रकाशित होऊ लागल्या. याच काळात भा. रा. भागवत यांच्या कथा साहसकथा-चार्तुयकथा असल्यातरी त्या विज्ञानकथाही होत्या. ‘उडती तबकडी’ या त्यांच्या विज्ञानकथासंग्रहाने लक्ष वेधून घेतले. पुढे निरंजन घाटे, डॉ. बाळ फोंडके, डॉ. लक्ष्मण लोंढे, डॉ. सुबोध जावडेकर, शुभदा गोगटे आदी लेखकांनी विज्ञानकथांचे दालन समृद्ध केले.

  विज्ञानसाहित्यात स्वतःच्या शैलीचा वेगळा ठसा उमटविणारे एक नाव म्हणजे जोसेफ तुस्कानो. विज्ञानविषयक विपुल लेखन करणारे आघाडीचे लेखक. आजवर त्याची शंभरावर पुस्तके मराठीत व काही इंग्रजीत प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश’, ‘विश्वकोश’, राज्य संस्कृती मंडळाचा ‘बालसाहित्य कोश’, विज्ञानभारतीचा ‘शिल्पकार कोश’ इ.च्या लेखनात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

  ‘निवडक जोसेफे तुस्कानो : विज्ञानकथा लेखरंग’ हा त्यांच्या लेखांचा संग्रह. मुखपृष्ठकार, संपादक कै. मनोज आचार्य यांनी संपादित केला आहे. या पुस्तकात १६ विज्ञानकथा, ४ अनुवादित विज्ञानकथा, १९ वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे लेख, २७ निसर्ग आणि विज्ञानाचा समन्वय सांगणारे लेख आहेत. त्यांच्या साध्या, सोप्या, सरळ भाषेतील हे सर्वच लेख वाचकाला समजेल व उमजेल असे आहेत.

  विज्ञानकथा लेखनाची काही वैशिष्ट्ये आहेत. वाचकांची डोळसवृत्ती विकसित करणे, विज्ञानविषयक विविध प्रश्नांच्या निराकरणाचे समाधान करणे, आजूबाजूस घडणाऱ्या घटनांच्या मुळांचा क्रमबद्ध, विश्लेषणात्मक शोध वाचकांना उलगडून सांगणे. हे सांगत असताना ललित कथांशी जवळीक साधून कथाप्रकाराचा फॉर्म घेऊन ही कथा स्वतंत्र शैलीत मांडणे. त्यामुळेच विज्ञानकथा ही कथाप्रकाराची एक स्वतंत्र शैली ठरते.

  या निवडकसंग्रहात एकूण १६ विज्ञानकथा आहेत. त्यांची शीर्षके ‘ऑक्सिजन’, ‘थॅलियम’, ‘शोध’, ‘शास्त्रज्ञ’, ‘रंग रक्ताचा’, ‘हायड्रोजन मोनोऑक्साईड’ वगैरे. या कथांमधून विज्ञानाची सांगोपांग जाणीव वाचकांना करून दिली आहे. ‘ऑक्सिजन’ या कथेत प्रकाशसंश्लेषणाचे महत्त्व पटवून दिले आहे. झाडांच्या सान्निध्यात सतत राहिल्याने माणसांशी निसर्गाचे नाते दृढ होते हे ‘श्याम व वणशा’च्या छोट्याशा कथेतून सांगितले आहे. झाडांशी बोला, त्यांच्याकडे पाहा, हितगुज करा अन्यथा तीही माणसांप्रमाणेच वाईट वाटून घेतात असा या कथेचा आशय आहे.

  ‘लाल कोळी’ या कथेत ‘लोमोनिया डिमिडियाटा’ नावाचा लाल रंगाचा कोळी टॉयलेटच्या सीटखाली लपून बसलेला असतो. माणूस टॉयलेटला गेला की तो हळूहळू आपला कार्यभाग साधतो. टॉयलेटच्या सीटखालची जागा त्याच्या खास पसंतीची असते. हा कीटक लालसर स्नायूंमुळे लालरंगी दिसतो व त्याच्या शरीरातील विष तो संक्रमित करतो. सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट वापरताना अन्य संसर्गाप्रमाणे अशा कीटकांचाही धोका संभवू शकतो हे या कथेत सांगितले आहे.

  ‘थॅलियम’ हा एक अत्यंत विषारी धातू आहे. तो माणसाच्या शरीरात गेला की त्याचा मृत्यू होतो. केवळ प्रतिथॅलियम औषध देऊन त्याला शरीरातून हाकलून लावता येते. ही गोष्ट जुईचा आजार प्रचंड औषधोपचारानंतरही कमी होत नाही यावर विचार करताना नर्सला अगाथा ख्रिस्ती या इंग्रजी लेखिकेच्या ‘पेल होर्स’ या कादंबरीतील खुनी आठवतो. ती ही गोष्ट डॉक्टरांना सांगते. डॉक्टर प्रतिथॅलियमची औषधे जुईला देतात व ती बरी होते.

  ‘वातानुकूलित’ या कथेत निवृत्त कलाबाई अंधाराला घाबरतात. भीतीमुळे मेणबत्ती पेटवून झोपतात. रूममध्ये एसी चालू असल्याने मेणबत्तीला पेटण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन वायू मिळत नाही. अर्धवट ज्वलनाने कार्बन मोनॉक्साईट तयार होतो. एसीमुळे तो रूममध्ये पसरतो. श्वसनावाटे तो शरीरात जाऊन गुदमरून कलाबाईंचा मृत्यू होतो.

  ‘शोध’ कथेमध्ये संशोधन करीत असलेल्या शास्त्रज्ञानाच्या अतिश्रमामुळे आणि नवनिर्मित पदार्थाचा संशोधनात संपर्क आल्याने त्याला स्वत:ला एखादा जीवघेणा आजार कसा होऊ शकतो याची जाणीव या कथेत आहे. ‘शास्त्रज्ञ’ या कथेत संशोधनाचे वेड घेतलेल्या व नवीन काहीतरी लोकांना सांगू इच्छिणाऱ्या संशोधकाचे श्रेय संचालक घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र शोधाला नवीन वळण देणाऱ्या शास्त्रज्ञाच्या चांगुलपणाचे दर्शन घडल्यावर खजील होतो याचे चित्रण आहे.

  ‘रंग रक्ताचा’ या कथेत एका प्रयोगात मानवाच्या रक्तातले हिमोग्लोबीन आणि वनस्पतीच्या हिरव्या पानातील क्लोरोफील यांच्या संकराने तयार झालेल्या क्लोरोगोबीनमुळे लाल रक्त हिरवे कसे होऊ शकते हे पटवून देतानाच हा प्रयोग करण्याच्या उत्साहात क्लोरोगोबिनयुक्त हिरव्या रक्तगटाची छाननी करण्याचे संशोधकाकडून राहून गेले तर काय घडू शकते याची जाणीव या कथेत दिली आहे. या व अशा छोट्या कथांमधून गप्पांच्या ओघात विज्ञानाचे महत्त्व लेखक पटवून देतात.

  वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे लेख’ या विभागात वीस लेख आहेत. लॅटेक्स या ॲमेझॉनच्या खोऱ्यात सापडणाऱ्या वनस्पतीत पेंटाइन नावाचे हायड्रोकार्बन असते, त्याच्या शुद्धीकरणातून पेट्रोल मिळते याबाबतची माहिती ‘पेट्रोलियम पर्याय’ या लेखात वाचायला मिळते. ‘मोबाईल मनोऱ्याचे धोके’मध्ये मानवाला होणाऱ्या विकारांबाबत उपयुक्त माहिती मिळते; तर तेलतवंगामुळे अनेक देशांचे कशा प्रकारे नुकसान झालेले आहे, हे ‘तेल तवंगांचा हाहाकार’ लेख वाचल्यावर कळते.

  नागरी कचऱ्याचे व्यवस्थापन करते ही नगर व्यवस्थापकांपुढील सर्वात मोठी समस्या आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावताना हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. सल्फर डायऑक्साइडचा धूर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड तसेच कणीय पदार्थ हवेत मिसळून त्याचे परिणाम व संभाव्य धोके याची चर्चा ‘डपिंग ग्राउंड नव्हे गुप्त ज्वालामुखी’ या लेखात आहे. प्लॅस्टिक कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा हा पर्यावरणासाठी भविष्यातील धोक्याचा इशारा आहे याचीही जाणीव लेखक करून देतात.

  माणसाच्या वाढत्या चंगळवादामुळे हवेचे प्रदूषण होत आहे. प्रदूषित हवेत श्वसन केल्याने दुर्धर रोग जडू शकतात. हवेच्या प्रदूषणाच्या परिणामांबाबतचा सखोल अभ्यास शास्त्रज्ञ कसे करत आहेत याची माहिती निसर्ग आणि विज्ञानाचा समन्वय विभागातील लेखांमधून मिळते.

  विज्ञानकथांचे मूळ उद्दिष्टच वैज्ञानिक ज्ञानार्जनाची आस निर्माण करणे, त्यातून प्राप्त होणारे तार्किक, कल्पनारम्य आणि मनोरंजक परिणाम तसेच प्राप्त निष्कर्ष समजावणे हा असतो या दृष्टीने या संकलनातील लेख विज्ञानाचे कुतुहल वाढवायला मदत करतात. विज्ञानकथेत ज्ञात वैज्ञानिक तथ्य किंवा शोध आणि त्याचा काल्पनिक विस्ताराचा उपयोग केला जातो. या दृष्टिकोनातून पहिल्या भागातील निवडक १६ कथा रंजक वाटतात.

  या निवडक लेखरंगाला सुप्रसिद्ध कादंबरीकार अनंत सामंत यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी जोसेफ तुस्कानो यांच्या व्यक्तिमत्त्वावर दृष्टिक्षेप टाकला आहे. कुतुहल, धाडस, उत्कटता, इर्षा यांतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. बायोकेमिस्ट्रित पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तुस्कानो यांना गिरणी कामगारांच्या संपाचे चटके आपल्या ऐन उमेदीच्या काळात सहन करावे लागले. बेरोजगार झालेल्या जोसेफ यांनी बिट्राच्या तंत्र-विज्ञान लायब्ररीतील ग्रंथांचा अभ्यास केला.

  या पुस्तकातील निवडक लेख वाचत असताना विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांचे अस्तित्व जाणवत. या अर्थाने विज्ञानाची सांगोपांग जाणीव करून देणारे हे लेख आहेत असे म्हणता येईल.

  निवडक जोसेफ तुस्कानो
  विज्ञानकथा – लेखरंग
  संपादन : मनोज आचार्य
  प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, बोरीवली.
  पृष्ठ : ३२८, मूल्य : रु. ४८५/-

  raghunathshetkar0@gmail.com

  – प्रा. रघुनाथ शेटकर