nitin shegaonkar article

अशोकाच्या या क्रांतीनंतर संपूर्ण समाज मनावर बुद्ध तत्त्वज्ञानाचे गारुड भारले गेले होते. कारण या प्रबुद्ध भारताच्या साम्राज्यात आईवडिलांसह ज्येष्ठांचा आदर, प्राणिमात्रांवर दया, फाशीच्या शिक्षेसह कठोर शिक्षेला विरोध, आई-वडिलांचा सन्मान आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशोकाने युद्धात उगारलेली तलवार म्यान करणे अर्थात युद्धबंदी. याच काळात ‘युद्ध नको बुद्ध हवे’ ही म्हण कदाचित रुजली असावी. ती आज तुमच्या-आमच्या तोंडी असतेच असते.

  • -धम्मचक्र प्रवर्तनदिन

जगाच्या इतिहासात अनेक क्रांती घडून आल्या आहेत. प्राचीन इतिहासापासून तर आतापर्यंत अभ्यास केला तर वारंवार रक्तरंजित क्रांती पुढे येत असते. ग्रीकची क्रांती असो, रशियन क्रांती असो, की इतर कोणत्याही देशात घडून आलेली क्रांती असो. मात्र भारताच्या इतिहासात प्राचीन ते आधुनिक काळात राजकीय आणि धार्मिक अशा दोन क्रांती घडून आल्या आहेत. त्या क्रांती भारतीय इतिहासाच्या पानावर स्वर्णांकित करण्यात आलेल्या आहेत. आणि वाचावे, लिहावे तेवढे अधिकच रंजक होत असते. यातील पहिली क्रांती म्हणजे प्रबुद्ध भारतातील अर्थात महान सम्राट अशोकाच्या काळात स्वतः अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारून राजकीय आणि धार्मिक क्रांती घडवून आणली. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारून आपले संपूर्ण राज्य बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारीत राहून चालवले. ते राज्य लोकांचे राज्य होते.

अशोकाच्या या क्रांतीनंतर संपूर्ण समाज मनावर बुद्ध तत्त्वज्ञानाचे गारुड भारले गेले होते. कारण या प्रबुद्ध भारताच्या साम्राज्यात आईवडिलांसह ज्येष्ठांचा आदर, प्राणिमात्रांवर दया, फाशीच्या शिक्षेसह कठोर शिक्षेला विरोध, आई-वडिलांचा सन्मान आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशोकाने युद्धात उगारलेली तलवार म्यान करणे अर्थात युद्धबंदी. याच काळात ‘युद्ध नको बुद्ध हवे’ ही म्हण कदाचित रुजली असावी. ती आज तुमच्या-आमच्या तोंडी असतेच असते.

सम्राट अशोकाने स्वीकारलेली बौद्ध धम्माची शिकवण म्हणजेच ‘अशोक विजयादशमी’. याच अशोक विजयादशमीचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १६५६ रोजी दुसरी रक्तविहीन क्रांती घडवून आणली होती. या घटनेला ‘धम्मचक्र प्रवर्तनदिन’ किंवा ‘धम्मचक्र अनुप्रवर्तनदिन’ असेही म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ही धम्मक्रांती लोभस आहे. वैचारिक आहे. तत्वशिल आहे. यात चिंतन, मनन आहे. सुमारे पाच लाख अनुयायांच्या साक्षीची या घटनेला सांगड आहे. एक विश्वास आहे.


यालाच ‘नवयान बौद्ध धर्म’ असेही म्हणतात. आज या घटनेला ६४ वर्षे झाली असून नागपूर नगरीतील दीक्षाभूमी हे त्या घटनेची पवित्रस्थळ आहे. हे पवित्रस्थळ बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली बौद्ध संघाची भूमी होय. ही भूमी विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायांनी फुलून येत असते. देश भरातीलच नव्हे तर जगभरातील निळे पाखरं येथे येऊन विसावत असतात. आणि परतत असताना बाबासाहेबांच्या विचारांचा ठेवा आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वसा सोबत घेऊन जातात. तेच विचार आणि तत्वज्ञान गेली ६४ वर्षांपासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली जात आहे. परंतु गेली ६४ वर्षे अविरतपणे या भूमीवर नतमस्तक होण्यासाठी येणारी पावले आज थबकणार आहेत. कारण, त्याचा प्रभाव वाढलेला असताना येथे होणारी गर्दी बघता यंदाचे ‘धम्मचक्र प्रवर्तनदिन’ प.पू.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रद्द केल्याचे जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे त्या निळ्या पाखरांमध्ये थोडी का होईना निराशा पसरली आहे. यंदा आपल्या दैवतांच्या पुढे नतमस्तक होणार नाही. तसेच या पावनभूमीचा स्पर्श करता येणार नाही. त्यामुळे ती पाखरं थोडी खजील असतील. परंतु समितीने घेतलेला हा निर्णय योग्य असून यामागे सुरक्षितता हा एकमेव उद्देश आहे. आज स्वत:सह इतरांची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी निराश होऊन कसे चालेल? बुध्दा, बाबासाहेबांचा तो वसा व वारसा पुढे न्याचा असून खजील होऊन चालणरर नाही. गत ६४ वर्षाची ही परंपरा खंडित झाली असली तरी पुन्हा ही संधी येणारच आहे. तुर्तास समस्त नवबौद्धाना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा.

नितीन शेगावकर