saif ali khan

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा लवकरच ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.रामायण या पौराणिक कथेवर आधारित हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येईल अशी घोषणा सैफ अली खानने केली होती. या वादग्रस्त वक्तव्यामुळे सैफवर जोरदार टीका झाली. अखेर आता सैफने त्याचे विधान मागे घेतले आहे.

‘एका मुलाखतीदरम्यान माझ्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला. मी अनेकांच्या भावना दुखावल्या असल्याची मला जाणीव झाली. माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मी सर्वांची माफी मागतो आणि माझे विधान मागे घेतो’ असे सैफ म्हणाला आहे.  एका मनोरंजन न्यूज एजन्सीला सैफने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रभू रामचंद्र हे माझ्यासाठी नेहमीच शौर्याचे प्रतीक आहेत. सर्व वाईट गोष्टींवर मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करणे म्हणजे आदिपुरुष. कोणतीही विकृती न दाखवता हा चित्रपट सादर करण्यासाठी संपूर्ण टीम एकत्र काम करत असल्याचेही सैफ यावेळी म्हणाला.