suyash tilak in khalipeeli

तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता सुयश टिळक(suyash tilak) बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करत आहे. ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘खाली पीली’ या चित्रपटात(khali peeli movie) सुयश एका गुंडाची भूमिका साकारत आहे.

पहिलाच बॉलिवूड चित्रपट असल्याने तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नाही, याची खंत यावेळी सुयशने व्यक्त केली. माझा पहिला बॉलिवूड चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची खूप इच्छा होती. मोठ्या पडद्यावर पाहण्याची एक वेगळीच मजा असते. ते माझे स्वप्न होते. त्यासाठी मी खूप उत्सुक होतो. सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही. याची खंत वाटतेय, असे तो म्हणाला. मालिका, चित्रपटानंतर सुयशने वेबसिरीजमध्येही काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याविषयी तो म्हणाला, वेबसीरिजमध्ये काम करायला मला नक्की आवडेल. कुठल्याही भूमिकेच्या चौकटीत मला कधीच राहायचे नाही. मला सगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला आवडतील.

ही भूमिका कशी मिळाली याबद्दल सांगताना तो म्हणाला,  कुठल्या तरी मालिकेत त्यांनी मला पाहिले होते आणि माझा लूक आवडल्याने त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावले. तीन ऑडिशन्स आणि लूक टेस्ट दिल्यानंतर माझ्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले. या चित्रपटात सुयश नकारात्मक भूमिका साकारत आहे. मंग्या नावाच्या गुंडाची ही भूमिका आहे. चित्रपटाचे शूटिंग सलग झाले नव्हते. काही महिने शूटिंग सुरू होते आणि त्या संपूर्ण वेळेत मला माझे वजन आणि लूक तसाच ठेवायचा होता. त्यात साहसदृश्ये खूप होती, खूप धावपळ होती. लूक आणि वजनामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे होते. ते जास्त आव्हानात्मक होते. पण चित्रपटाच्या संपूर्ण टीमने यात मदत केली, असं तो म्हणाला.

ईशान आणि अनन्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता याविषयी त्याने पुढे सांगितले की, ईशानला अभिनयावर फार प्रेम आहे. सेटवर त्याचे लक्ष पूर्णपणे  कामावर केंद्रीत असायचे. सर्वांची दृश्ये तो आवर्जून पाहायचा. माझा पहिला सीन शूट होत असताना ईशान सेटवर माझे काम पाहण्यासाठी आला होता. मला त्याचे फार अप्रूप वाटते. शूटिंग संपल्यावर तो मला भेटला आणि काम चांगले झाल्याचे सांगत त्याने कौतुक केले. पहिलाच बॉलिवूड चित्रपट आणि त्यात भाषेचा फरक यांमुळे सुयशवर थोडे दडपण होते. मात्र ईशानने संपूर्ण शूटिंगदरम्यान फार मदत केल्याचे त्याने सांगितले. अनन्या पांडेसोबतही काम करण्याचा अनुभव चांगला होता. कुठलेही टँट्रम नव्हते. जयदीप अहलावत यांच्यासोबत माझी काही दृश्ये होती. एका सीननंतर त्यांनी मला येऊन मिठीच मारली, अशा शब्दांत सुयशने त्याचा अनुभव सांगितला.

सुयशची नवीन मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतून सुयश आणि सायली संजीव ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.