आठवडी बाजारात १२ दुकाने जळून खाक; रात्री उशीरा आग आटोक्यात

येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीतील दुकानांना आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. आगीमध्ये सुमारे 12 दुकाने जळून खाक झाली. यामुळे लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

    खामगाव (Khamgaon). येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीतील दुकानांना आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. आगीमध्ये सुमारे 12 दुकाने जळून खाक झाली. यामुळे लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

    भाजी मंडीत भाजीपाल्याची हर्रासी होत असल्याने व्यावसायिकांनी सुका आणि ओल्या भाजीपाल्याची साठवणूक करण्यासाठी दुकाने उभारली आहेत. यातील एका दुकानाला रात्री आठ वाजेदरम्यान आग लागली. त्यानंतर एका पाठोपाठ दहा बारा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. जगदंबा क्रीडा मंडळाच्या टँकरने सुध्दा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहकार्य केले.

    आगीमध्ये हाजी बुढन, बोदडे ट्रेडर्स, सागर मिरची भंडार, राखोंडे ट्रेडर्स, सादिक बागवान ट्रेडर्स, बळीराम निमकर्डे, नशीब फ्रुटस्, गोलू ट्रेडर्स, शोहरत खान, सचिन भुसांडे, नौशाद भाई, मोतीराम बाबा ट्रेडर्स आदींची दुकाने व गोदाम जळून खाक झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने धुराचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. रात्री उशीरा आग आटोक्यात आली. परंतु आग नेमकी कशामुळे लागली या बाबत माहिती घेण्यात येत आहे.