नात्याला काळिमा फासणारी घटना – अल्पवयीन मुलीवर सख्ख्या मेहुण्याने केला बलात्कार, २१ दिवसापासून आरोपी फरार

चिखली(Chikhli) शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आपल्या सख्ख्या मेहुण्याने अतिप्रसंग (Buldhana Rape Case) करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २१ दिवस उलटूनही अद्यापर्यंत आरोपी मेहुण्याला अटक करण्यात आली नसून तो सध्या फरार आहे.

    बुलडाणा(Buldhana) जिल्ह्यातील चिखली(Chikhali) शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आपल्या सख्ख्या मेहुण्याने अतिप्रसंग (Buldhana Rape Case) करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २१ दिवस उलटूनही अद्यापर्यंत आरोपी मेहुण्याला अटक करण्यात आली नसून तो सध्या फरार आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर चिखली पोलीस ठाण्यात(Chikhali Police Station) नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी आरोपीला तात्काळ अटक करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

    चिखली शहरात एक १७ वर्षीय मुलगी २० ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या आई व वडिलांसोबत घरीच होती. यावेळी दुपारी १२ वाजेदरम्यान त्याचा जालन्यावरून मेहुणा अचानक घरी आला. जावई घरी आल्यामुळे कुटुंबियांनी त्याचे चांगले स्वागत केले. २५ ऑगस्ट रोजी पीडित मुलीचा वाढदिवस असल्याने ते कारण पुढे करत मेहुण्याने तिला वाढदिवसानिमित्त कपडे खरेदी करून देतो म्हणत घरच्यांना तिला सोबत घेऊन जाण्यासाठी विनंती केली. जावई असल्याकारणाने घरच्या लोकांनीही या आग्रहाला नकार न देता जावयाला परवानगी दिली. जावयाने आपल्या मोटारसायकलवर बसवून मुलीला शहरातील एका रेडिमेड कापडाच्या दुकाना नेऊन कपडे सुद्धा खरेदी करून दिले.

    यावेळी कपडे खरेदी करून झाल्यावर घरी जाण्यासाठी मोटारसायकलच्या मागे बसलेल्या मुलीला कळले की, आपण घरच्या मार्गावर नसून दुसऱ्याच मार्गाकडे निघत आहोत. याबाबत मेहुण्याला विचारल्यावर त्याने सांगितले की, आपण एकदा दर्ग्यावर जाऊन येऊ. तिने याला नकार दिला तर मेहुण्याने आग्रह केला की, आपण दर्ग्यावर जाऊन लगेच येऊ. मोटारसायकल सरळ जुन्या मेहकर रोडवर जाऊन थांबली. यावेळी अगोदर पासूनच एक पांढरी कार हजर होती. मोटारसायकल तिथेच उभी करून मेहुण्याने मुलीला गाडीत धक्का मारून बसवण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यावर तिचा कंठ दाबून तिला मारायची धमकी देत गाडीत कोंबले. ही गाडी मेहकर फाट्याच्या दिशेने जात होती. नंतर कोणत्या दिशेने ती गाडी जात होती मुलीला कळले नाही. यावेळी अल्पवयीन मुलीवर मेहुण्याने गाडीतच दोन वेळा अतिप्रसंग केला.

    मेहुण्याने पीडितेला धमकी दिली की,तुझ्या बहिणीला आणि घरच्यांना जर का काही सांगितले तर तुला आणि तुझ्या बहिणीला मारून टाकेन. तुझे व्हिडिओ माझ्याकडे असून ते व्हायरल करून तुला बदनाम करून टाकेन. २१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ३ वाजता सदर मुलीला मेहुण्याने आपल्या घराबाहेर सोडून पळ काढला. तिची तब्येत पूर्णपणे बिघडली होती. ती बहिणीच्या घरी गेली असता तिथे तिच्या आई बाबांसह सर्व नातेवाईक अगोदर पासूनच तिच्या शोधात तिथे एकत्रित होते. या सर्वांसोबत ती घरी आली.आपल्या बहिणीचा नवरा असल्याने फार विचार आणि हिम्मत करून तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बहिणीला आणि घरच्या लोकांना सारी हकीकत सांगितली.यामुळे २३ ऑगस्टच्या सकाळी पीडित मुलगी, मोठी बहीण आणि आई, वडील शहरातील आणि समाजातील काही प्रतिष्ठित लोकांना सोबत नेऊन चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.यावरून आरोपी मेहुण्याविरुद्ध  कलम ३६३, ३६६-ए ३७६, १०९, १०२, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण पास्को अधिनियम २०१२ चे कलम  ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपी मेहुणा फरार आहे.