विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई; २ लाखांचा दंड वसूल

शहरात सकाळी ११ वाजेनंतर विनाकारण वाहनांवर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे़ मागील पंधरवाड्यात शहर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून हजारावर वाहनचालकांकडून दोन लाखांचा दंड वसूल केला.

    खामगाव (Khamgaon).  शहरात सकाळी 11 वाजेनंतर विनाकारण वाहनांवर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. मागील पंधरवाड्यात शहर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून हजारावर वाहनचालकांकडून दोन लाखांचा दंड वसूल केला.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे़ संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन प्रयत्न करीत आह़े़ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे़ लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे़ दरम्यान शहर पोलिसांकडून शेगाव रोड, बाळापूर नाका, जलंब नाका, टॉवर चौक, शहर पोस्टेसमोर, अग्रसेन चौक, सरकी लाईन आदी ठिकाणी नाकाबंदी करून शहरात फिरणाऱ्या नागरिकांची आणि वाहनचालकांची चौकशी करून विनाकारण फिरताना दिसल्यास दोनशे रु. दंड केला जात आहे़.

    कारवाई सुरू राहील : ठाणेदार अंबुलकर
    शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी शहरात न फिरता घरात सुरक्षित राहणे गरजेचे आहे़ मात्र, वारंवार सूचना देऊनही विनाकारण फिरताना दिसत आहेत. संचारबंदीदरम्यान केवळ दवाखाना आणि मेडिकलसाठीच बाहेर पडण्याचे निर्देश आहेत़ त्यामुळे शहरातील विविध चौकात दररोज नाकाबंदी करून रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांची चौकशी करून दंड आकारत आहोत. कारवाई सुरूच राहील, असे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी सांगितले.

    ९८ हजारांची दंडात्मक वसुली
    कोविड नियमांचे दुकानदारांकडून उल्लंघन होत असल्याचे दिसते. अनेक जण मास्क न लावताच बाहेर फिरतात. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. परवानगी नसतानाही काही दुकानदार चोरून दुकाने सुरू ठेवतात. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द न.प. प्रशासनाने 1 ते 28 एप्रिल दरम्यान विनामास्क फिरणारे 53 जणांकडून प्रत्येकी 200 रु. प्रमाणे 10,600 रु. दंड वसूल करण्यात आला. तसेच विनापरवाना दुकाने सुरू ठेवणे, वेळेनंतर दुकान सुरू ठेवणे, दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे अशा 15 दुकानदारांकडून 87,500 रु. दंड वसूल करण्यात आला.