पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

शेतकऱ्याने पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी हे निवेदन काल पाठवलं आहे. शेतकऱ्याच्या या अजब निवेदनामुळे सरकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. पेरणीचे दिवस जवळ आल्यानं पीक कर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यानं दिला आहे.

    बुलडाणा : महाराष्ट्रात आता पावसाचं आगमन झालं आहे. सर्व शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या बियाणांची खरेदी देखील चालू झाली आहे. बियाणांसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यांनी आता बँकेचा रस्ता धरला आहे. नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका तिसलट करत असल्याचं चित्र समोर येत आहे.

    दरम्यान अशीच एक घटना बुलडाण्यातील एका शेतकऱ्यासोबत घडली आहे. बँकाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बुलडाण्यातील मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्याने आता त्याची किडनी विकायला काढली आहे. पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून त्याने बँकेत कर्जासाठी धाव घेतली होती. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला त्रास दिला. त्यानंतरही पैसे मिळवण्यासाठी त्यानं धावाधाव केली परंतू अखेर त्याच्या पदरी निराशाच पडली आहे.

    त्यामुळे त्याने आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याने पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी हे निवेदन काल पाठवलं आहे. शेतकऱ्याच्या या अजब निवेदनामुळे सरकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. पेरणीचे दिवस जवळ आल्यानं पीक कर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यानं दिला आहे.

    दरम्यान, लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच, यापूर्वी झालेली अतिवृष्टी, नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना यावर्षी मागील कर्ज फेडता आलं नाही. त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांना आणखी कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत.