बस फेऱ्या कमी झाल्याने एकाच बसमध्ये प्रवाशांची गर्दी; कोरोनाचा धोकाही वाढला

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरी अडचणीत आलेली एसटीची सेवा रविवारी डिझेल संपल्यामुळे अडचणीत सापडल्याची चर्चा होती. ऐनवेळी नव्वद टक्के बसफे-या रद्द करण्यात आल्या.

  बुलढाणा (Buldana).  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरी अडचणीत आलेली एसटीची सेवा रविवारी डिझेल संपल्यामुळे अडचणीत सापडल्याची चर्चा होती. ऐनवेळी नव्वद टक्के बसफे-या रद्द करण्यात आल्या. याचा फटका प्रवाशांना बसला. बसफे-या बंद केल्यामुळे एकाच बसवर प्रवाशाची गर्दी झाल्याचे दिसले. मात्र, त्यामुळे फिजीकल डिस्टसिंगची ऐेशीतैशी झाली. तर डिझेल अभावी बसफे-या बंद करण्यात आल्या नसून प्रवासी नसल्यामुळे बसफे-या रद्द करण्यात आल्याचे आगार प्रमुख रवींद्र मोरे यांनी सांगितले.

  कोविडमुळे मागे लावलेल्या लॉकडाऊनचा फटका
  प्रवाशांसह एसटी महामंडळाला बसला होता. एसटीची चाके जागेवरच थांबल्यामुळे महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले. असंख्य चालक व वाहकांना रोजगार मिळणे कठीण झाले होते. याला पर्याय म्हणून एस.टी महामंडळाने माल वाहतूक सुरू केली होती. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शासनाने पन्नास टक्के क्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करण्याची मुभा एसटी महामंडळाला दिली होती. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यात एसटी धावू लागली होती. त्यानंतर स्थिती सुधारल्याने बस सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला होता.

  मोठ्या शहरांशी जोडलेली बस सेवा
  बुलडाणा येथून मुंबई, पुणे, अकोला,अमरावती,नागपूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, ब-हानपूर यासह अनेक जिल्ह्यासाठी लांब पल्याच्या बसेस धावत आहेत. परंतु रविवारी आगारातील डिझेल संपल्यामुळे नव्वद टक्के बस फे-या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे गर्दी वाढली आणि बसमध्ये चढण्यासाठी लोक एकत्र आल्याने फिजीकल डिस्टसिंगची वाट लागली.

  या गर्दीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वाहक व चालक सेवेवर आले असता त्यांना बसफे-या रद्द झाल्याची माहिती मिळाली.

  प्रवाशांनुसार धावताहेत बसेस
  प्रवाशांची उपलब्धता पाहून बसेस सोडण्यात येत आहेत. सध्याची स्थिती पाहता बससेवेवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे आम्हाला शेड्यूल ठरवताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागत आहे, असे एसटीच्या अधिका-यांनी सांगितले. एखाद्यावेळी प्रवाशांची गर्दी होते परंतु ही स्थिती सारखीच राहत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.