Contractors and officials on the Samrudhi Highway rose to the roots of the farmers
समृद्धी महामार्ग फोटो

  • शेतकरी बाबाराव मुंढे यांचा आत्मदहनाचा इशारा

लोणार (जि.बुलढाणा) (Lonar). बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खळेगाव येथील ५० वर्षे जुना पाझर तलाव समृध्दी महामार्गावरील ठेकेदार व बेजबाबदार अधिकारी यांच्या सगंनमताने बुजविण्यात आला आहे. हा पाझर तलाव पूर्वरत सुरू न केल्यास २० सष्टेबर रोजी पाझर तलावावर आत्मदहन करण्याचा इशारा खळेगाव येथील शेतकरी बाबाराव मुंढे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका निवेदनाव्दारे दिला आहे.

खळेगाव येथून समृध्दी महामार्ग जात असून येथेच ई-क्लासची ६० एकर जमीन खाली असून याच जमिनीमध्ये शासनाने ५० वर्षापूर्वी लाखो रूपये खर्च करून रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सालदारा नावाचा पाझर तलाव खोदून परिसराचा कायापालट केला. या भागामध्ये पूर्वी पाण्याचा कुठलाही स्रोत नव्हता, पाण्यासाठीसुद्धा जनावरांना भटकंती करावी लागत होती. या गंभीर बाबीची दखल तत्कालीन शासनकर्त्यानी घेत पाझर तलाव निर्माण केला. पण सद्यस्थितीत समृध्दी महामार्गावरील ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने कुठलीही शासकीय परवानगी,ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र नसताना तसेच पाझर तलावामध्ये तुंडुब पाणी असताना १५ हजार ब्रास मुरूम व माती टाकून अर्धा पाझर तलाव बुजवला.

ही बाब शेतक-यांना समजली तेव्हा आम्ही संबंधित अधिकारी व ठेकेदारास मुरूम व माती उचलून घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी आमची विनंती झुगारुन पाझर तलाव बुजवणे सुरूच ठेवले. याबाबत लोणार तहसील कार्यालयाला ८ सष्टेबर रोजी लेखी निवेदन दिले. तहसीलदारांनी खळेगाव येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांना चौकशीचे ओदश दिल्याने त्यांनी पाहणी करत पाझर तलावातील मुरूम व माती काढून घेत पाझर तलाव पूर्ववत करण्यास संबधीत ठेकेदार व अधिकारी यांना सांगितले. तरीही बुजवण्याचे काम सुरूच आहे. २० सप्टेंबरच्या आत सदर काम थांबले नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला असुन होणा-या परिणामाची जबाबदारी शासन, समृध्दी महामार्गाचे अधिकारी, ठेकेदारावर राहील असेही निवेदनात नमूद आहे.