रक्तदानासाठी पुढे यावे ! डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे जनतेला आवाहन

कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन तसेच विविध विकारांनी ग्रस्त रुग्णांची रक्ताची गरज दूर व्हावी म्हणून रक्त संकलनाची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील रक्तपेढ्यांत सध्या पाच सहा दिवस पुरेल एवढेच रक्त शिल्लक असल्याने रक्तदानासाठी पुढे या, असे आवाहन राज्याचे अन्न व औषधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

  बुलढाणा (Buldhana).  कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन तसेच विविध विकारांनी ग्रस्त रुग्णांची रक्ताची गरज दूर व्हावी म्हणून रक्त संकलनाची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील रक्तपेढ्यांत सध्या पाच सहा दिवस पुरेल एवढेच रक्त शिल्लक असल्याने रक्तदानासाठी पुढे या, असे आवाहन राज्याचे अन्न व औषधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

  विविध महाविद्यालये, आयटी सेक्टर तसेच अन्य उद्योग क्षेत्रामध्ये रक्तदान शिबिरे घेऊन रक्त गोळा करण्यात येत असते. परंतु सध्या बहुतांश महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद असल्याने तसेच बहुतांश सेवा क्षेत्राचे वर्क फ्रॉम होम पद्धतीनुसार काम सुरू असल्याने मोठी रक्तदान शिबिरे घेता येत नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे पुन्हा रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

  रक्ताची कमतरता लक्षात घेऊन संकलनाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आपल्या विभागात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. जनतेनेही रक्तदानासाठी पुढे यावे व रक्तदान करावे, असे आवाहन देखील डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

  जनतेचा प्रतिसाद महत्वाचा
  नागरिकांनी रक्ताची निकड भरुन काढण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यावेळीही लोक रक्तदानासाठी पुढे येतील आणि झिज भरुन काढतील, असा विश्वास डॉ. शिंगणे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी रक्तदान करावे व इतरांचे जीवन सुंदर बनवावे, असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.

  रक्तदानाची चळवळ प्रभावी व्हावी
  गावागावामध्ये रक्तदानाचे कार्य करणा-या सामाजिक संस्था आहेत. रक्तपेढ्यांच्या माध्यमातूनही रक्त संकलन केले जाते. शासकीय तसेच खासगी रक्तपेढ्यांचा त्यात सहभाग असतो. त्यामुळे यावेळी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन रक्तदानाची चळवळ अधिक प्रभावी व्हावी याकड़ेही डॉ. शिंगणे यांनी संबंधिताचे लक्ष वेधले आहे. गेल्यावर्षी प्रमाणे याहीवेळी चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.