अभ्यासिकेचे दोन तास वाढवून द्या; विद्यार्थ्यांची नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास मागणी

शेगांव शहरात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यातील काही विद्यार्थी घरी अभ्यास नीट होत नाही म्हणून अभ्यासिका लावतात, फी परवडत नसली तरी नाईलाजाने लावतात.

    शेगांव (Shegaon).  शहरात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यातील काही विद्यार्थी घरी अभ्यास नीट होत नाही म्हणून अभ्यासिका लावतात, फी परवडत नसली तरी नाईलाजाने लावतात. परंतु प्रशासनाने विद्यार्थ्यांना सोईपासून वंचित ठेवले आहे. तसे न करता विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन अभ्यासिकेचे तास वाढवून द्यावे, अशी मागणी संत तुकाराम महाराज अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी न. प. मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

    11 एप्रिल रोजी एमपीएससी परीक्षा असून त्या अनुषंगाने अभ्यासिकेची वेळ असणा-या वेळे व्यतिरीक्त दोन तास वाढवून द्या, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मौखिक स्वरूपात, ऑनलाईनव्दारे विनंती मान्य होत नसल्याने विद्यार्थी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना भेटले. लॉकडाऊनमध्ये शहरात अनेक अभ्यासिका चौदा पंधरा तास सुरू आहेत. त्यात नगरपरिषदेचे वाचनालय सुद्धा सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असते. परंतु, कोरोनाचे संकट संत तुकाराम महाराज अभ्यासिकेलाच आहे का? असा प्रश्न अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी केला.

    विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करा
    अभ्यासिकेच्या परिसरातील दुर्गंधी, कच-याचा ढिग व शेजारच्या स्वच्छतागृहा पासून होणा-या दुर्गंधीकडे लक्ष द्यावे. अभ्यासिकेत महिला कर्मचारी तसेच विद्यार्थीनी आहेत. त्यांच्या सोयीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. तसेच उपमुख्याधिकारी यांनी दिलेल्या वागणुकीचा विद्यार्थ्यांनी निषेध केला. वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी, असेही विद्यार्थी म्हणाले.