खासगी तत्त्वावर पहिला ऑक्सिजन प्रकल्प खामगावात; जिल्हावासियांना मिळणार दिलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत येथील गोयनका ग्रुपने ब्रिजगंगा ऑक्सी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिला खासगी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

    खामगाव (Khamgaon).  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत येथील गोयनका ग्रुपने ब्रिजगंगा ऑक्सी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिला खासगी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन नंदकिशोर गोयनका व परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दीड महिन्याच्या आत प्रकल्पातून ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.

    जनुना शिवारात एक एकरावर प्रकल्प उभारला जाणार असून ऑक्सिजनची टंचाई दूर होणार आहे. गोयनका ग्रुपने युनिर्व्हसल बोसी प्रकल्पासाठी 5 ते 6 कोटींची तरतूद केली आहे. मशिन राजस्थानच्या भिवाडी येथून मागवली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज सात क्युबिक मीटर निर्मिती होणार असून शहरातून जिल्ह्याला 500 ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल.

    या प्रकल्पामुळे जिल्ह्याची गरज भरून निघेल. सध्या 700 सिलेंडरची गरज भासत आहे. ती उणीव भरून निघेल, असे नंदकिशोर गोयनका म्हणाले. शहराला अकोला, जालना, जळगाव खांदेश येथून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. परंतु प्रकल्प सुरू होत असल्यामुळे अन्यत्र पाहण्याची गरज नाही.

    जिल्ह्याची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
    शासकीय स्तरावर ऑक्सिजन प्लांटसाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आनंदाची बाब म्हणजे खासगी स्वरुपातही उद्योजक पुढे येत असल्याने जिल्हा ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांची होणारी हेळसांड दूर होईल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.