Maharashtra Rajpal Bhagatsing Koshyari
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीसह इतर मान्यवर

  • जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजभवनवर बैठक

बुलढाणा (Buldhana )जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधी व्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा या मागणीला राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यातील पाच हजार कोटी रूपयांवरील जे प्रकल्प पुर्णत्वाकडे गेले आहेत तसेच पर्यावरणाची परवानगी किंवा इतर काही कारणांमुळे प्रलंबित आहेत अशा प्रकल्पांची माहिती सादर करावी असे निर्देशही राज्यपालांनी दिले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विनंतीवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजभवनवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, आमदार राजेश एकडे उपस्थित होते. राज्यातील जलसंपदा प्रकल्पांना गती मिळावी या साठी काही प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करता येऊ शकतील काय याच्याही शक्यता तपासण्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी जिगांव प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी विशेष बाब म्हणून ४९०६.५० कोटी अतिरिक्त निधी लागणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.जिगांव प्रकल्पामुळे बुलडाणा जिल्ह्याची सिंचन क्षमता १९ टक्क्यावरून २५ टक्के एवढी वाढेल हा प्रकल्प राज्यासाठी महत्वपूर्ण ठरेल तसेच राज्यपालांनी याबाबत सकारात्मकता दाखविल्याबद्दल डॉ. शिंगणे यांनी आभार मानले. डॉ. शिंगणे यांनी राज्यपालांना जिजाऊचे तैलचित्र यावेळी भेट दिले. तसेच जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथील किल्ल्याला भेट देण्याचे दिलेले आमंत्रण राज्यपालांनी स्वीकारले.