रेमडेसिवीर वाजवी दरात मिळणार; डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती

बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन 1110 ते 1400 रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

    बुलडाणा (Buldana).  कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्ह्यामध्ये 1110 ते 1400 रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन घ्यावे लागत आहे.

    परंतु काही औषधी दुकानदार रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी किंमत कमी झालेली असताना एमआरपी दराने विकून ग्राहकांची आर्थिक लूट करीत असल्याची बाब निर्दशनास येताच दर कमी कसे होतील यासाठी प्रयत्न सुरू केले.

    आज त्यांनी बुलडाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासून रेमडेसिवीरच्या खरेदी किमतीवर फक्त 10 टक्केच मार्जिन घेऊन ग्राहकांना विक्री करावी, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत औषधी दुकानदारांनी देखील जिल्ह्यामध्ये 1110 ते 1400 रु. पर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दर्शविली. तसेच लवकरच संबंधित कंपनीशी चर्चा करून सर्व विक्रेत्यांना एकाच दरात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात येणार आहे.

    त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील सर्व रुग्णांना हे इंजेक्शन फक्त 1110 रुपयात मिळणार असून त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अन्न व औषध प्रशासन विभागाचे बर्डे, गिरके व बुलडाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.