रेमडेसिवीर काळाबाजारप्रकरणी गुन्हे नोंदवा; डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील फायर ऑडिटला प्राधान्य द्या, असे सांगून सध्या सुरू असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजारावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

    बुलढाणा (Buldhana).  जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील फायर ऑडिटला प्राधान्य द्या, असे सांगून सध्या सुरू असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजारावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधितावर गुन्हे दाखल करा. तसेच जिल्ह्यातील पाचही ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करा, असे आदेश दिले.

    कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत डॉ. शिंगणे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. तेव्हा ते बोलत होते. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, उपजिल्हाधिकारी अहिरे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. खामगाव, सिंदखेडराजा, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद येथे मान्यता देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती युद्धपातळीवर करण्यात यावी. तसेच खासगी व शासकीय रुग्णालयाला लागणाऱ्या ऑक्सिजन साठ्यासंदर्भात वेळेवर मागणी न करता प्रत्येक तहसील स्तरावर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्याकडून मागणी नोंदवावी, असे आदेशही डॉ. शिंगणे यांनी दिले.

    जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार काही लोक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून खासगी रुग्णालयात रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यावर रिकाम्या बॉटलवर त्या रुग्णांचे नाव टाकण्याच्या सूचना देण्यात याव्या व त्याचे ऑडिट करावे. जे रुग्णालय याचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी देखील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी लसीकरण, स्वॅब तपासणी व लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा देखील आढावा घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरण गरजेचे आहे. त्यामुळे लोकांनी लस घ्यावी. तसेच पोलिस विभागाने कडक अंमलबजावणी करावी. जिल्ह्याच्या सीमेवर बंदोबस्त ठेवावा. विनाकारण जिल्ह्याबाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेशही डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

    गैरकृत्य करणाऱ्यांची गय करू नका
    सध्याची गंभीर परिस्थिती असूनही काही लोक चुकीच्या पद्धतीने फायदा करून घेण्यासाठी फपापलेले दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, गैरकृत्य करणाऱ्यांची मुळीच गय करू नका, असेही डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले. गैरप्रकार त्वरित थांबवा याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.