चॉकलेटच्या रॅपरमधून गांजाची तस्करी; आरोपीची कल्पना जाणून पोलिसही चक्रावले

बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये किटकॅट चॉकलेटच्या रॅपरमध्ये प्रति प्रमाणे दोन किलोचे एक पाकिट असे एकूण २० पाकिटे आढळून आले. या गांजाची किंमत अंदाजे ७ हजार प्रति किलो प्रमाणे असे एकूण २ लाख ७५ हजार ४०० रुपये आहे.

    बुलढाणा (Buldhana) : गांजा तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवत किटकॅट कंपनीच्या चॉकलेटच्या रॅपरमध्ये गांजाचे पाकिटे तयार करुन गांजा तस्करी (smuggle marijuana) करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या गुजरात राज्यात राहणाऱ्या एका आरोपीला बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील (Buldana City Police) पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव (Sub Inspector Amit Jadhav) यांच्या सतर्कतेने ०२ सप्टेंबरच्या रात्री चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिर समोरील प्रवासी निवाऱ्यातुन ताब्यात घेतले त्याच्याकडून एकूण ४० किलो गांजा जप्त करण्यात आला असून या गांजाची किंमत एकूण २ लाख ७५ हजार ४०० रुपये इतकी आहे.

    बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव यांना रात्रीच्यावेळी चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिर समोरील प्रवासी निवाऱ्यात बॅग घेवून संशयास्पद उभा असलेला एक व्यक्ती दिसून आला. यावेळी त्याला विचारपूस करुन बॅगेची झाडाझडती करीत असतांना सदर इसमाने घटनास्थळावरुन पळ काढला.

    याबाबतची माहिती जाधव यांनी ठाणेदार प्रदिप साळुंखे यांना दिल्यानंतर घटनास्थळी पंचासह पथक पोहचले. बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये किटकॅट चॉकलेटच्या रॅपरमध्ये प्रति प्रमाणे दोन किलोचे एक पाकिट असे एकूण २० पाकिटे आढळून आले. या गांजाची किंमत अंदाजे ७ हजार प्रति किलो प्रमाणे असे एकूण २ लाख ७५ हजार ४०० रुपये आहे.

    पोलिसांनी सदर गांजा ताब्यात घेवून आरोपीचा शोधासाठी तपासचक्रे फिरवत आरोपीला जयस्तंभ चौक या ठिकाणच्या लक्झरी बसेसच्या बुकिंग सेंटरवरुन मुंबईतील ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या गुजरात राज्यातील वलसाड तालुक्यातील बिल्ली मोहरा येथे राहणाऱ्या बारकु शंकर पटेल वय 42 यास अटक केली आहे.

    या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.