या बाईला आई म्हणायचं की कैदासीण; चिमुकल्याला गरम तव्यावर उभे करून दिले चटके

बुलडाणा : एका सावत्र आईने नऊ वर्षाच्या मुलाला गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यात घडली आहे. विशेष म्हणजे यावेळी चिमुकल्याचे वडिलही उपस्थित होते. मात्र, त्याने मुलाला आईच्या तावडीतून वाचवले नाही. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

पीडित मुलाच्या जन्मदात्या आईचे तो लहान असतानाच निधन झाले. यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र, सावत्र आई त्याचा छळ करत होती. अखेर तिने क्रुरतेचा कळस गाठला.

मुलाचे हातपाय पकडून तिने त्याला गरम तव्यावर उभे करून चटके दिले. त्याने आरडाओरड करू नये म्हणून त्याचे तोंडही दाबले. यात त्याला गंभीर जखमा झाल्या.

मुलगा दोन दिवसांपासून घराबाहेर पडला नसल्याने शेजाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी बोरोखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, तपासानंतर पुढील करवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.